नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी
सांगली, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्या कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने काळजी हीच त्यावरील लस आहे. प्रशासन वारंवार कोरोनाच्या संदर्भातील आचारसंहितेचे पालन करा, असे सांगत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सिद्ध आहे. याचसमवेत सांगलीकर नागरिकांनी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,
१. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली असल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र कोरोना अद्यापही संपलेला नाही. दीपावलीत सामाजिक अंतराचे उल्लंघन झाले आहे. निदान यापुढील काळात तरी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. आगामी काळात थंडी लक्षात घेता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागानेही व्यक्त केली आहे.
२. ऑगस्ट-सप्टेंबर मासात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये ४ सहस्र २०० खाटा सिद्ध करण्यात आल्या, आता दुसर्या लाटेसाठी १० टक्के खाटा वाढवण्यात येणार आहेत. यांसाठी ३६ रुग्णालये सज्ज आहेत.
३. रुग्णांची संख्या वाढताच तात्काळ सरकारी आणि खासगी रुग्णालयांत उपचार चालू करण्यात येतील. सध्या ‘अॅन्टीजेन’चे ४० सहस्र किट उपलब्ध आहेत.
४. ८ ठिकाणी ‘ऑक्सिजन टँक’ बसवण्यात आले आहेत. ऑक्सिजन सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात मधुमेह अन् रक्तदाब असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली आहे.
५. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सर्वेक्षणाचे काम चालूच ठेवले जाईल. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण शोधले जातील, कोरोनाविषयी संशयित वाटत असल्यास त्याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
६. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने सध्या प्रशासनाच्या अनुमतीने मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. हे करतांना संबंधितांना कोरोनाच्या आचारसंहितेचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतांना राजकीय पक्षांच्या मेळाव्यास प्रचंड गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार प्रविष्ट झाल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकार्यांनी दिली.