महिलांना साहाय्य करण्यासाठी गोव्यात पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन

पणजी, २३ नोव्हेेंबर (वार्ता.)-  सध्या समाजात महिलांना विनयभंग, बलात्कार, छेड काढणे, तसेच घरात छळ होणे, अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी बळी पडलेल्या महिलांचे म्हणणे ऐकून घेणे, तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीविषयी त्वरीत कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुतेक महिला ‘स्मार्टफोन’चा वापर करतात. या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या सुरक्षतितेसाठी आणि साहाय्यासाठी कालपासून ७८७५७५६१७७ हा अतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

संकटात सापडलेल्या महिलांना साहाय्य करण्यासाठी पोलीस राज्य नियंत्रण कक्षाचा हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक २४ घंटे चालू असेल. संकटात असलेल्या महिलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप सुविधा २४ घंटे उपलब्ध करणे, तसेच पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून कारवाई करणे, तसेच महिलांना त्यांच्या परिस्थितीनुरूप असलेल्या प्रश्‍नांविषयी माहिती पुरवणे, हे या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनचे उद्देश आहेत.