१. भृगु महर्षींनी भृगु जीवनाडीपट्टी वाचक श्री. सेल्वमगुरुजी यांच्या माध्यमातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अग्निहोत्र करायला सांगणे
‘दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे श्री. सेल्वमगुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अग्निहोत्र करायला सांगितले होते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दैवी प्रवासात असतांना जेव्हा जेव्हा त्यांना शक्य होते, तेव्हा अग्निहोत्र करतात. काही साधकांच्या घरी गेल्यावर वास्तू आणि साधक यांचे रक्षण व्हावे, यांसाठीही त्या अग्निहोत्र करतात.
२. अग्निहोत्रातील विभूती पाण्यात घातल्यास ती पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढवत असल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णास बरे होण्यास ती साहाय्यभूत होऊ शकणे
सध्या संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. असे लक्षात आले की, अनेक ठिकाणी कोरोना झालेल्या रुग्णांना वैद्य क्षार अधिक असलेले पदार्थ (ALKALINE FOODS) देतात. याविषयी अग्निहोत्रातील काही जाणकार व्यक्तींनी सांगितले आहे की, जर आपण पाण्यात अग्निहोत्राची थोडी विभूती घातली, तर पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. (संदर्भ : http://homatherapy.org/agnihotra-ash-and-alkaline-water/) ‘अग्निहोत्राची विभूती घातलेल्या पाण्यातील जंतू दूर होतात’, असेही लक्षात आले आहे. (संदर्भ : www.agnihotra.org/2017/07/01/purification-of-water-by-agnihotra/) ‘असे क्षार वाढलेले पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग नष्ट होतो’, असे आता काही जणांच्या लक्षात आलेले आहे.
३. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना लाभ होण्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अग्निहोत्राची विभूती रामनाथी आश्रमात पाठवणे
भृगु महर्षींनी सांगितल्यापासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अग्निहोत्र करत आहेत. ‘आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना अग्निहोत्राची विभूती देता येईल’, या उद्देशाने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ही विभूती रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे पाठवतात. आजपर्यंत अनेक साधकांना या अग्निहोत्राच्या विभूतीचा लाभ झाला आहे.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (२५.७.२०२०)
अग्निहोत्राविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वेळोवेळी सांगितलेली सूत्रे
‘सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व जग त्रस्त असल्याने जगात अनेक जणांनी अग्निहोत्राला आरंभ केला आहे. अग्निहोत्र करणार्या अशा अनेक जणांसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली खालील सूत्रे मार्गदर्शक आहेत. एखादे कर्म करतांना त्याविषयीचे ज्ञान असल्यास भावजागृती होते आणि कर्माला पूर्णत्व येते.
१. सूर्य आणि अग्नि हे अनुक्रमे आकाश अन् पृथ्वी यांवरील तेजतत्त्वाचे प्रतीक असणे
तेजतत्त्वाचे आकाशातील प्रतीक, म्हणजे ‘सूर्य’ आणि तेजतत्त्वाचे पृथ्वीवरील प्रतीक, म्हणजे ‘अग्नि.’ सूर्याचे कार्य दिवसा असते आणि अग्नीचे कार्य सूर्यास्तानंतर आरंभ होते; म्हणून सूर्योदयाच्या वेळी अग्निहोत्र करतांना ‘सूर्याय स्वाहा ।’, असे मंत्रात म्हटले आहे, तर संध्याकाळी अग्निहोत्र करतांना ‘अग्नये स्वाहा ।’, असे म्हटले जाते.
२. अग्निदेवाच्या ‘स्वाहा’ आणि ‘स्वधा’ या दोन शक्ती असून त्या अनुक्रमे देवलोक अन् पितृलोक येथे आहुती पोचवण्याचे कार्य करत असणे
एकदा साधक पुरोहित केतन शहाणे यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुढील माहिती सांगितली होती. ‘अग्निदेवाच्या दोन शक्ती आहेत. एक ‘स्वाहा’ आहे आणि दुसरी ‘स्वधा’ आहे. ‘स्वाहा’ अग्नीमध्ये दिलेली आहुती देवलोकापर्यंत, तर ‘स्वधा’ पितृकर्म करतांना पितरांना अर्पण केलेला हविर्भाग, अन्नादी गोष्टी पितृलोकापर्यंत पोचवते. ‘स्वाहा म्हणण्याचा अधिकार वेदमूर्ती आणि संत यांना आहे. इतरांनी स्वाहाच्या ऐवजी ‘नम: ।’ म्हणावे’, असे शास्त्र आहे. स्वाहा आणि स्वधा या ‘पोस्टमन’सारखे कार्य करतात. त्या मनुष्याने पृथ्वीवर अग्नीला अर्पण केलेली आहुती त्या त्या पत्त्यावर (ठिकाणी) पोचवण्याचे कार्य करतात.’
३. अनुभूती
एकदा अग्निहोत्राच्या वेळी ‘स्वाहा’ म्हटल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘अग्नीमध्ये एक छोटा हात दिसून तो आहुती घेऊन जात आहे’, असे दिसले.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (२५.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |