‘गुरुपौर्णिमा’ हा शब्‍द मनात आल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना आर्तभावाने केलेली आळवणी !

‘हे गुरुदेवा, ‘गुरुपौर्णिमा’ हा शब्‍द जरी मनात आला, तरी माझे मन तव चरणांवर लीन होऊन भावविभोर होते. देवा, या जीवनात तुझ्‍याविना माझे कुणीच नाही. मायेतील सर्व नात्‍यांत ‘मी आणि तू’ हे एकच नाते खरे आहे’, याची तू मला जाणीव करून दिलीस ! यासाठी माझ्‍या मनी कृतज्ञता दाटून येते. या भावक्षणांत तू या जिवाकडून जे लिहून घेतलेस, ते तव चरणी समर्पित करतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेचा दिनू असे चैतन्‍याचे भंडार ।

दिवस असे आषाढ शुक्‍ल पौर्णिमेचा ।
‘गुरु-शिष्‍य’ या नात्‍याचे स्‍मरण करण्‍याचा ॥ १ ॥

श्री. अविनाश जाधव

विधात्‍याने निर्मिलेले गुरु-शिष्‍याचे नाते ।
त्रिभुवनात सर्वाधिक श्रेष्‍ठ असे हे नाते ॥ २ ॥

शिष्‍यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ असे ठेवा चैतन्‍याचा ।
समर्पण आणि कृतज्ञता यांची जाणीव होण्‍याचा ॥ ३ ॥

आस असे शिष्‍यास सदोदित गुरुदर्शनाची ।
अन् गुरूंचे गुणगान क्षणोक्षणी करण्‍याची ॥ ४ ॥

मनात एकच असावे, गुरुचिंतनाविना अन्‍य काही न उमगावे ।
‘गुरुचरण अन् गुरुचरण’ या एकाच ध्‍यासाने मनी रुजावे ॥ ५ ॥

या लुळ्‍या-पांगळ्‍याला गुरुकृपेचा आधार मिळाला ।
दिशाहीन जीवनातील घोर प्रारब्‍धाचा मार्ग सुकर झाला ॥ ६ ॥

गुरुसान्‍निध्‍यात आता जीवन व्‍यतित व्‍हावे ।
गुरुचरणांची धूळ बनून आपुल्‍या चरणी रहावे ॥ ७ ॥’

– श्री. अविनाश जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक