नामाने वासना नाहीशी कशी होते ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एका नामधारकाने प्रश्‍न केला, ‘महाराज, नामाने वासना नाहीशी होते, असे आपण सांगता, तर ती कशी नाहीशी होते ?’

श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) म्‍हणाले, ‘अंधाराला स्‍वतंत्र अस्‍तित्‍व नाही. सूर्य नसणे, म्‍हणजे अंधार असणे. ‘नाम तेथे भगवंत आहे, मी नाही’, याची आठवण. भगवंत आहे तेथे ज्ञान आहे. ज्ञान आहे तेथे अज्ञान नाही. वासनेचा जन्‍म अज्ञानात आहे. अज्ञान नाही तेथे वासना नाही. भगवंत आहे तेथे अज्ञान नाही. नाम आहे तेथे भगवंत आहे; म्‍हणून नामाने वासना नाहीशी होते. वासनांच्‍या ४ पायर्‍या आहेत.

अ. पहिली पायरी : पापवासना मनात येताच क्षणी हातून वाईट कर्म घडणे.

आ. दुसरी पायरी : पापवासना मनात येते; पण हातून पापकर्म सहसा घडत नाही.

इ. तिसरी पायरी : मनात भगवंत भरल्‍यामुळे पापवासना येण्‍यास अवकाशच (वावच) उरत नाही.

ई. चौथी पायरी : नामाचा अभ्‍यास करणारा माणूस या सर्व पायर्‍या न कळत चढत जातो आणि सिद्धावस्‍थेला पोचतो.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)