उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला वारकरी पाईक संघाचा विरोध

विधान परिषदेच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय 

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कार्तिकी वारीसाठी वारकर्‍यांना बंदी असेल तर आमचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला विरोध राहील, तसेच येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी सांगितले. कार्तिकी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाने संचारबंदीसह अन्य काही निर्बंध घातले आहेत. २१ नोव्हेंबर या दिवशी पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी येथील वासकर महाराज मठात वारकरी पाईक संघाची बैठक पार पडली.

या वेळी भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापूरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, चैतन्य महाराज देहूकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते.