शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर या दिवशी आठवा स्मृतीदिन छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर साजरा करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. सकाळपासूनच शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या सर्व शिवसैनिकांना ‘मास्क’ वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांसह इतर पक्षांचे नेते आणि मंत्री यांनीही या प्रसंगी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करू नका, स्वत:च्या घरातूनच त्यांना अभिवादन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वांना केले होते. स्मृतीस्थळाच्या ठिकाणी अधिक लोकांना प्रवेश देऊ नका, अशी सूचनाही मुंबई पोलिसांना देण्यात आली होती.

आवश्यकता पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन उपस्थित राहील ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

आमचे हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची आवश्यकता नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू. आम्हाला कुणाकडून प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचे राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे आवश्यकता पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन उपस्थित राहील,’ असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वेळी व्यक्त केले.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करूया ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, बाळासाहेब यांनी नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व यांच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेचा हक्क यांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणी यांसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करूया, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी ट्वीट केले आहे. फडणवीस यांनी बाळासाहेबांचे एक छायाचित्र ट्वीट केले आहे. ‘आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी कोटी कोटी अभिवादन’, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ महापौर बंगल्याच्या ठिकाणी होणार असून ते सामान्यांसाठी कधी खुले करणार ?’, असा प्रश्‍न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी ते म्हणाले की, वर्ष २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली होती आणि नंतर सत्तांतर झाले होते. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र रहावी, असे बाळासाहेबांचे स्वप्न होते, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा.

राजेश क्षीरसागर यांनी घेतले शिवसेनाप्रमुखांच्या दादर येथील स्मृतीस्थळाचे दर्शन

शिवसेनाप्रमुखांच्या दादर येथील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतांना श्री. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मृतीस्थळ येथे जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.