श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर !
मुंबई – हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने भारताला धर्मनिरपेक्ष घोषित करून अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना, हज यात्रा, इफ्तार, मौलानांचे वेतन यांच्यावर सहस्रो कोटी रुपये खर्च केले, एक रुपयाही कुठल्या मंदिराला दिला नाही, तसेच प्रभु श्रीराम काल्पनिक आहेत असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करून रामसेतू नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, असे सांगून रामसेतू तोडण्याचे षड्यंत्र आखले, त्या हिंदूविरोधी काँग्रेसला हिंदूंच्या मंदिराशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा केवळ मंदिरांतील धन आणि सोने यांच्यावर त्यांचा डोळा आहे. मागील ७० वर्षे देशात काँग्रेसची सत्ता असतांना बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, कॉमनवेल्थ खेळ, अशा अनेक घोटाळ्यांत जनतेचे ४ लाख ८२ सहस्र कोटी रुपये लुटल्याचे आकडेवारी सांगते. या भ्रष्टाचाराची, काळ्या धनाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी का केली जात नाही ? मंदिरांतील सोने घेण्याअगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेचे लुटलेले हे धन अगोदर परत करावे. हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र स्वरूपात विरोध केला जाईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यात श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की,
१. आज भारतात संरक्षण आणि रेल्वे मंत्रालय यानंतर सर्वाधिक भूमीची मालक चर्च संस्था आहे. त्यानंतर अनुमाने ७ लाख एकर भूमीचा मालक वक्फ बोर्ड आहे. अजमेर दर्गा आणि निजामुद्दीन दर्गा येथे कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा होतो. काँग्रेसचे नेते त्यांच्या भूमी कह्यात घेण्याची मागणी करणार आहेत का ?
२. आज एफ्.सी.आर्.ए.च्या माध्यमातून विदेशांतून सहस्रो कोटी रुपयांचे धन भारतातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांना येत आहे. आम्ही एप्रिल मासात सरकारला पत्र पाठवून हे सर्व धन कोरोना आपत्तीत लढण्यासाठी वापरण्याची विनंती केली आहे.
३. आज देश भीषण परिस्थितीमध्ये असतांना आमच्या मंदिरांनी सर्वांत मोठे काम केलेले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपयांचे धन मंदिरांनी दिलेले आहे. लाखो लोकांसाठी विनामूल्य अन्नदान केले जात आहे. हे सर्व मंदिरांच्या माध्यमातून चालू असतांना चर्च आणि मशिदी यांना काही न बोलता, हिंदु मंदिरांतील सोन्यावर डोळा ठेवून काँग्रेसने त्यांचा हिंदूविरोध स्पष्ट केला आहे. काँग्रेसला आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की, जर मंदिरांचे धन किंवा सोने घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल.