पुरुषांच्या चेहर्‍यावरील दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे, यांमागील आध्यात्मिक कारण

‘काही मान्यतांनुसार पुरुषांच्या दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे चांगले नसते, तर अध्यात्मातील काही उन्नतांनुसार हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण असते. ही दोन्ही उत्तरे सत्य आहेत. वर्तमान कलियुगातील अधिकांश जिवांच्या दाढी-मिशींचे केस अल्प होणे किंवा नसणे असे पालट त्यांच्या प्राणशक्तीवहन संस्थेत असलेले विविध अडथळे किंवा वाईट शक्तींचे तीव्र त्रास यांमुळे होतात. याउलट साधना करत ८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठल्यावर जिवाची ईश्‍वराशी निर्माण होणार्‍या एकरूपतेमुळे त्याच्यातील देवत्वामध्ये वाढ होऊन ‘चेहर्‍यावरील दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे’, असे दैवी पालट होतात. या संदर्भातील शास्त्र पुढे दिले आहे.

श्री. निषाद देशमुख

१. दाढी-मिशींचे केस अल्प होणे किंवा नसणे यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

१ अ. पहिली विचारसरणी – सामुद्रिक शास्त्रानुसार

ज्या व्यक्तींच्या चेहर्‍यावर समान रूपात दाढी न उगवता विविध भागावर आणि वेगवेगळ्या प्रमाणात दाढी असते ते उच्छृंखल, धूर्त आणि अविश्‍वासू असतात. काही व्यक्तींच्या केवळ हनुवटीवर दाढी असते. अशा व्यक्ती करणी, भानामती, भूत-प्रेत यांसारखे रहस्यात्मक शास्त्रांचे ज्ञाता किंवा त्यांची आवड असणारे असतात. (संदर्भ : http://www.dilersamachar.com/if-you-or-your-friend-has-kept-a-bearded-beard-then-know-their-secret-56450.html

१ आ. दुसरी विचारसरणी – ईश्‍वरी ज्ञानानुसार

८० टक्क्यांहून अल्प पातळी असणार्‍या जिवातील दाढी-मिशीचे केस अल्प प्राणशक्ती आणि वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण यांमुळे अल्प होणे किंवा नसणे : सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांच्या तुलनेत वर्तमान कलियुगात रज-तमांचे प्रमाण आणि वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण अधिक आहे. कलियुगात जन्म घेणार्‍या अधिकांश जिवांची आध्यात्मिक क्षमता अत्यंत अल्प असून त्यांच्या मनावर स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जन्म घेणार्‍या जिवाला गर्भात प्रवेश केल्यापासून रज-तम आणि वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा जिवामध्ये तीव्र स्वभावदोष असतात. या स्वभावदोषांमुळे मनाकडून कार्य करण्यासाठी अधिक शक्ती वापरली जाते. मनाकडून प्राणशक्ती खेचली गेल्याने रज-तम आणि वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण यांचे तीव्र परिणाम जिवावर होतात. त्यामुळे जन्मापासून अनेक जिवांच्या प्राणशक्तीवहन संस्थेत विविध अडथळे निर्माण होतात. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे जिवाच्या शारीरिक विकासावर परिणाम होतात. यामुळे अनेक जिवांच्या चेहर्‍यावर दाढी-मिशांतील केस व्यवस्थितपणे येत नाहीत. जिवाची पातळी ८० टक्क्यांहून अधिक असल्यास ईश्‍वरी अनुसंधानाच्या माध्यमातून त्याला शक्ती मिळवता येते. यामुळे ८० टक्क्यांहून अल्प पातळी असलेल्या जिवांच्या चेहर्‍यावरील दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे, हे अल्प प्राणशक्ती आणि वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण यांमुळे असते.

२. ८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवामधील ‘देवत्वा’मध्ये वाढ झाल्यावर त्याच्या दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे

२ अ. देवत्वाची व्याख्या

ज्या वेळी जिवाच्या ईश्‍वरी अनुसंधानाचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक होऊन ईश्‍वरेच्छेने वागणे चालू होते, त्या वेळी त्याच्या स्थूल देहातील सर्व पेशींची शुद्धी होऊन देह चैतन्य प्रक्षेपण करण्याचे माध्यम बनतो. या आध्यात्मिक पातळीला जीव ईश्‍वरेच्छेने वागत असल्याने त्याची देहबुद्धी समष्टी कार्यासाठी मर्यादित प्रमाणात कार्यरत असते. या प्रक्रियेला ‘जिवात देवत्व निर्माण होणे’, असे म्हटले जाते. ही प्रक्रिया वायूतत्त्वाच्या अन्य पंचतत्त्वांवर होणार्‍या परिणामांशी निगडित असून केवळ समष्टी साधना करणार्‍या जिवांमध्ये प्राधान्याने आढळून येते. श्रीराम, श्रीकृष्ण आदी मनुष्य रूप असलेल्या अवतारांमधील हे गुणधर्म दाखवण्यासाठी सर्वसाधारणतः त्यांचे रूप रेखाटतांना त्यांना दाढी-मिशा दाखवल्या जात नाहीत.

२ आ. ८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या जिवामध्ये देवत्व निर्माण होणे

जिवाची आध्यात्मिक पातळी ८० टक्क्यांहून अधिक झाल्यावर त्याच्यातील तेजतत्त्वाची जागृती होते आणि त्याच्या वायूतत्त्वाशी निगडित साधनेला आरंभ होतो. या आध्यात्मिक पातळीला मन आणि बुद्धी यांचा लय होऊन चित्तशुद्धीची प्रक्रिया आरंभ होते. यामुळे जिवाच्या ईश्‍वरी अनुसंधानात वाढ होते. या पातळीला जिवातील तेजतत्त्वाची जागृती झाल्यामुळे जिवाच्या स्थूल रूपाला सौंदर्य प्राप्त होऊ लागते. यामुळे जिवाचे रूप तेजस्वी दिसते.

२ इ. सगुण देवत्व आणि निर्गुण देवत्व यांमुळे दाढी-मिशीचे केस अल्प होण्याची प्रक्रिया

८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांमधील दाढी-मिशीचे केस सगुण देवत्व आणि निर्गुण देवत्व या दोन्ही कारणांमुळे अल्प होतात.

२ इ १. सगुण देवत्व – जिवाचे रूप देवाप्रमाणे होत असल्याने त्याच्या दाढी-मिशीचे केस अल्प होणे : जिवाच्या विशिष्ट देवतेशी किंवा ईश्‍वरी रूपाशी असलेल्या अनुसंधानाचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक झाल्यावर त्याचे परिणाम त्याच्यातील तेजतत्त्वावर होतात. ८० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीला तेजतत्त्वाची जागृती झालेली असल्याने जिवाचे स्थूल रूप हळू हळू देवतेच्या रूपाप्रमाणे होणे चालू होते. त्यामुळे जसे देवतेचे रूप आहे, तसे काही प्रमाणात जिवाचे रूप स्थुलातून दिसण्यास आरंभ होते.

२ इ २. निर्गुण देवत्व – वायूतत्त्वात वाढ होऊन पंचतत्त्वांतील अन्य तत्त्वे अल्प झाल्याने दाढी-मिशीचे केस अल्प होणे : समष्टी साधना करत जिवाची वायूतत्त्वाशी एकरूपता वाढू लागते. यामुळे वायूतत्त्वाचा परिणाम सूक्ष्म माध्यम, उदा. ईश्‍वरी विचार, पूर्वसूचना, योग्य कृती इत्यादींसह त्याच्या स्थूल आणि प्राण या देहांवरही होतो. यामुळे जिवातील प्राणशक्तीचे प्रमाण वाढल्याने त्याला वाईट शक्तींचे सूक्ष्मातील तीव्रतम आक्रमण सहन करता येणे, दिवसरात्र जागरण करून कार्यपूर्ती करणे इत्यादी कार्ये करता येतात. वायूतत्त्वामुळे प्राणदेह सक्षम होत गेल्यावर तेज, आप आणि पृथ्वी यांचे प्रमाण अल्प होते अन् पेशीपेशींमधून होणारा प्राणशक्तीचा प्रवाह निर्विघ्नपणे होतो. वायूतत्त्वामध्ये झालेली वाढ आणि आप अन् पृथ्वी यांमध्ये झालेली घट यांमुळे दाढी-मिशी यांसारख्या माध्यमांची गरज भासत नसल्याने ती टप्प्याटप्प्याने अल्प होत जातात.

३. प्राचीन ऋषिमुनी यांचे दाढी-मिशीतील केस लांब असण्यामागील कारण

प्राचीन ऋषी-मुनी यांची आध्यात्मिक पातळी ८० टक्क्यांहून पुढे असतांनाही त्यांच्या दाढी-मिशीतील केस लांब असायचे. याचे कारण हे की, त्यांची सगुण देवत्वाशी असलेली एकरूपता. प्राचीन ऋषी-मुनी ईश्‍वराच्या ‘वैराग्य’ या गुणधर्माशी एकरूप होऊन स्थुलातून कार्य करायचे. वैराग्याच्या स्तरावर पंंचतत्त्व नियंत्रित स्वरूपात कार्य न करता स्वतंत्र स्वरूपात कार्य करतात. यामुळे प्राचीन ऋषी-मुनी यांच्यातील पृथ्वी आणि आप तत्त्व अल्प न होता वायूतत्त्वाच्या साहाय्याने कार्य करत असल्याने त्यांच्या दाढी-मिशीतील केस अल्प न होता त्यांच्यात वाढ व्हायची.

४. निष्कर्ष

हिंदु धर्मात सांगितलेल्या प्रत्येक स्थूल कृतीमागील सूक्ष्मस्तरीय कारणमीमांसा अंतर्भूत आहे. स्थूल कृती या पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतात. व्यक्तीची प्रकृती, काळ, योगमार्ग आणि उद्देश यांनुसार तिच्यावर होणार्‍या ईश्‍वरी तत्त्वाच्या परिणामानुसार तिच्या स्थुलातील कृतींच्या स्वरूपात सतत पालट होतात. ‘व्यक्तीच्या चेहर्‍यावरील दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे चांगले किंवा वाईट ?’, या पृथ्वीतत्त्वाशी निगडित स्थूल पालटाचे उत्तर जिवाची प्रकृती आणि पातळी यांनुसार पालटत असते. जिवात होणार्‍या पालटाचे मूळ कारण अध्यात्मातील उन्नत, गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु हेच सांगू शकतात. यामुळे प्रत्येक टप्प्यावर होणार्‍या विविध पालटांच्या संदर्भात गुरूंचे मार्गदर्शन घेण्याचे महत्त्व लक्षात येते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१९, दुपारी ३.३३)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक