वर्षारंभी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला पाहिजे. भाषा, बोली आणि लेखन या तिन्ही संदर्भात मराठी भाषेची सद्यस्थिती किती केविलवाणी झाली आहे, हे घरीदारी उच्चारल्या जाणार्‍या मराठीवरून कोणाच्याही लक्षात येईल. भाषाशुद्धी हा राष्ट्रहिताचा आणि स्वत्वरक्षणाचा असा विषय आहे की, जो प्रत्यक्षात आणतांना रक्तही (तन) सांडावे लागणार नाही वा द्रव्यही व्यय होणार नाही. त्यासाठी केवळ मनोनिग्रह हवा !

मराठी मायबोलीतील शुद्ध आघातजन्य उच्चारातील शब्दशक्ती ही मन आणि बुद्धी यांच्यातील रज-तमात्मक धारणांना नष्ट करून चित्तावर चांगले विचार आणि आचार यांचे संस्करण करते. भाषाशुद्धीने समाज घडतो. समाजात विकसनशील मन आणि बुद्धी यांचा संयोग असेल, तरच राष्ट्र घडते. भाषाशुद्धीचे व्रत अंगीकारणे, म्हणजेच प्रत्येक जिवाने योग्य, म्हणजेच शुद्ध भाषाउच्चारांसह स्वतः भाषेतील देवरूपी चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करून वायूमंडलाची परिणामी समाजाची शुद्धी साधणे. शुद्ध भाषा उच्चारूनच जिवात हळूहळू चैतन्याचे बीज रोवले जाऊन ईश्‍वरी गुणांचे संवर्धन होऊ लागते. यासाठी इंग्रजी, फारसी, अरबी, उर्दू इत्यादी परकीय भाषांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कृतीशील व्हा !