भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !

अमेरिकेतील विद्यापिठांतून कथित संशोधनाच्या नावाखाली हिंदु धर्मातील तत्त्वांवर, तसेच पर्यायाने हिंदुत्वाच्या विचारसरणीवर वैचारिक आघात करण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली काही दशके चालू आहे. हिंदूबहुल भारताला तोडण्याचे भयंकर काम अमेरिकेतील विद्यापिठांच्या माध्यमातून होत आहे, हे आपण पहिल्या लेखात पाहिले. ‘वेंडी डोनिगर’ यांनी ‘फ्रॉईड’चे लैंगिक मापदंड लावून हिंदु धर्माचे अत्यंत विकृत विश्लेषण केले, हे दुसर्‍या लेखात पाहिले. ‘वेंडी डोनिगर’ यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हिंदुद्वेषाची विकृती जगभर कशी पसरली आहे, हे तिसर्‍या लेखात पाहिले.

या लेखामध्ये शेल्डन पॉलॉक या अमेरिकेतील प्राध्यापकांनी साम्यवादी सिद्धांत लावून संस्कृत भाषा आणि हिंदु धर्मग्रंथ यांचे कसे चुकीचे अर्थ लावले, त्याचप्रमाणे जगद्गुरु शंकराचार्यांच्या शृंगेरीपीठाला हाताशी धरून, त्यांचाच निधी वापरून हिंदु धर्मग्रंथांचे विकृत अर्थ लावण्याचे कसे महाभयंकर षड्यंत्र रचले, ते पाहू. या सर्वांना भारतीय आस्थापने कसे साहाय्य करत आहेत, हेही यातून लक्षात येईल.          

(भाग ४)

या लेखाचा भाग 3  वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1060497.html

१. कोण आहेत शेल्डन पॉलॉक ?

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापिठात प्राध्यापक म्हणून काम केलेले शेल्डन पॉलॉक (वय ७८ वर्षे) हे भारतीय धर्मग्रंथ, इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा अभ्यास करणारे संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त आहे. कोलंबिया विद्यापिठामधील ‘संस्कृत अँड इंडियन स्टडीज्’ (संस्कृत आणि भारतीय अभ्यास) विभागाचे ते ख्यातनाम माजी प्राध्यापक होते. भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी विचारसरणीतून अत्यंत चुकीचे अर्थ लावून त्यांनी हिंदु धर्मावर एकप्रकारे आक्रमणच केले !

२. ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’चे शस्त्र वापरून संस्कृतमधील धर्मग्रंथांचे अधर्मीकरण करणारे शेल्डन पॉलॉक !

यापूर्वी आपण पाहिले की, वेंडी डॉनिगर यांनी ‘फ्रॉईड’चा चष्मा वापरून हिंदु देवतांचे अश्लीलीकरण केले, तसेच शेल्डन पॉलॉक यांनी याहून अधिक सूक्ष्म; परंतु तितकेच घातक असे अस्त्र उचलले, ते म्हणजे ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’चे ! (‘सांस्कृतिक मार्क्सवाद’, म्हणजे साहित्य, कला, धर्म, माध्यमे, शिक्षण, सामाजिक मूल्ये यांच्या माध्यमातून साम्यवादी विचारांचा प्रसार करणे आणि त्या माध्यमातून संस्कृती पालटण्याचा प्रयत्न करणे) प्राचीन भारतीय संस्कृत धर्मग्रंथांचा विस्तृत अभ्यास असणारे आणि बाह्यतः एक समर्पित संस्कृतप्रेमी विद्वान म्हणून दर्शवणारे (किंवा ओळखले जाणारे) पॉलॉक यांच्या संशोधनाचा गाभा उलगडला, तर मात्र एक अत्यंत वेगळे अन् भारताच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक चित्र समोर येते !

पॉलॉक यांच्या संपूर्ण संशोधनाची पायाभरणी मार्क्सवादी सिद्धांतावर आहे. या सिद्धांतानुसार धर्म, भाषा अन् साहित्य या सगळ्या गोष्टी सत्ताधारी वर्गाने दुर्बलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या असतात. त्यानुसार पॉलॉक यांनीही संस्कृत भाषेतील सर्वव्यापी आणि अत्युच्च स्तरावरील ज्ञानधारा असणार्‍या धर्मग्रंथांना अत्यंत खालच्या पातळीवरील विकृत जातीयवादी स्तरावर आणून ठेवण्याचे महापाप केले. हिंदूंच्या पवित्र धार्मिक ग्रंथांचे अधर्मीकरण केले.

३. (म्हणे) ‘रामायण आणि महाभारत ही उच्चवर्णियांनी दलितांवर सत्ता गाजवण्यासाठी केलेली काव्ये !’

हिंदुद्वेषी शेल्डन पॉलॉक या कथित विद्वानांनी हिंदु धर्माकडे केवळ एक ‘राजकीय साधन’ म्हणून पाहिले. ‘रामायण आणि महाभारत यांसारखी महाकाव्ये ही केवळ नैतिक मूल्ये शिकवण्यासाठी नसून ती उच्चवर्णियांनी दलित किंवा वंचित यांवर सत्ता गाजवण्यासाठी निर्माण केलेली ‘राजकीय शस्त्रे’ (पॉलिटिकल इन्स्ट्रूमेंट्स) आहेत’, असा मार्क्सवादावर (साम्यवादावर) आधारित सिद्धांत त्यांनी मांडला.

४. (म्हणे) ‘रामायण हे इतरांना दुय्यम लेखण्याचे साधन !’

पॉलॉक यांच्या मते रामायण हे ‘इतरांना दुय्यम लेखण्या’चे (‘आदरिंग’चे) मूलभूत साधन’ आहे. रामायणात रावण आणि राक्षस यांना ‘परके, अनैतिक, लैंगिकदृष्ट्या विचलित’ म्हणून चित्रित करून त्यांना आसुरी संबोधले. असेच चित्रण मध्ययुगीन काळात भारतातील राजांनी मुसलमान आक्रमकांचे केले, असे पॉलॉक सांगतात, म्हणजे ज्या श्रीरामाला हिंदु आदर्श पुरुष मानतात, त्याच रामकथेला ते जातीय आणि धार्मिक द्वेषाचा प्रवर्तक ठरवतात ! हा दावा इतका अतार्किक आहे की, डॉ. कोनराड एल्स्ट यांच्यासारख्या पाश्चात्त्य विद्वानांनीही पॉलॉक यांच्या या विश्लेषणाला अतिशयोक्ती करण्यात आली आहे (हेव्हीली ओव्हर इंटरप्रिटेड) म्हणून फेटाळले आहे.

५. संस्कृत : एक ‘सत्ता नियंत्रणाचे साधन’

अ. सांस्कृतिक मार्क्सवादाच्या विचारसरणीच्या चौकटीतून पॉलॉक म्हणतात, ‘संस्कृत वॉज द प्रिन्सिपल डिस्क्र्यूसिव्ह इन्स्ट्रूमेंट ऑफ डॉमिनेशन इन प्रीमॉर्डन इंडिया’, म्हणजे पूर्व-आधुनिक भारतात संस्कृत हे सामािजक आणि सांस्कृतिक वर्चस्व टिकवून ठेवण्याचे प्रमुख माध्यम होते.’ त्यांच्या मतानुसार ‘संस्कृत ही ब्राह्मण आणि राजे यांनी दलित, स्त्रिया अन् वंचित यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी वापरलेली भाषा होती. ती मोक्षाचे माध्यम नव्हे, तर अत्याचाराचे एक साधन होती.’

आ. ‘ग्राम्स्की’ यांच्या ‘कल्चरल हेजिमनी’ (सांस्कृतिक वर्चस्व) या मार्क्सवादी सिद्धांतानुसार ‘सत्ताधारी वर्ग जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कायदा वापरत नाही, तर संस्कृती आणि भाषा हेसुद्धा हत्यार म्हणून वापरतात.’ पॉलॉक हा सिद्धांत संस्कृत भाषेलाही लावतात आणि म्हणतात, ‘संस्कृत भाषेलाही राज्यकर्त्यांनी जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली.’ त्यांच्या वर्ष २००६ च्या ‘द लॅग्वेज ऑफ द गॉडेस इन वर्ल्ड ऑफ मेन’ या ग्रंथात त्यांनी ‘संस्कृत कॉस्मोपॉलिस’ ही संकल्पना मांडली. यात ते म्हणतात, ‘राजे आणि ब्राह्मण यांनी मिळून संस्कृत भाषेला ‘राजकीय सत्तेचे वाहन’ म्हणून जाणीवपूर्वक विकसित केली.’ हा अर्थ लावतांना त्यांनी संस्कृतमधील वेद, उपनिषदे आणि आध्यात्मिक ज्ञान परंपरा यांना मुद्दाम बाजूला सारले. (ब्राह्मणांनी वेद, उपनिषदे यांची मौखिक परंपरा प्राचीन काळापासून जपली आणि प्राचीन राज्यकर्त्यांनी त्यांना आश्रय दिला. – संकलक)

पॉलॉक यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अर्थ लावण्याविषयी रचलेले महाभयंकर कटकारस्थान

शृंगेरी पीठ, म्हणजे आद्यशंकराचार्यांनी स्थापन केलेले हिंदूंचे सर्वोच्च आध्यात्मिक केंद्र आहे. पॉलॉक यांनी या पीठाशी एक ‘सामंजस्य करार (एम्.ओ.यू.)’ करण्याचा प्रयत्न केला. त्याचे बाह्य उद्दिष्ट होते, ‘संस्कृत ग्रंथांचे संरक्षण, ‘डिजिटायझेशन’ (संगणकीकरण) आणि प्रसार’; परंतु अंतर्गत उद्दिष्ट भयंकर आणि हिंदु संस्कृती उद्ध्वस्त करणारे षड्यंत्र होते. त्यांनी कोलंबिया विद्यापिठात ‘शंकराचार्य अध्यासन’ निर्माण करून त्यावर पीठाचे परंपरावादी प्रतिनिधी ‘सल्लागार’ म्हणून रहातील, असे नियोजन केले. सल्लागार समितीवर पीठाच्या परंपरावादी प्रतिनिधींचा समावेश; परंतु त्यांची भूमिका केवळ ‘सल्लागार’ म्हणून राहील, असे ते नियोजन केले. प्रत्यक्षात ‘शैक्षणिक (ॲकॅडमिक) समितीवर पॉलॉक आणि त्यांच्या वर्तुळातील पाश्चात्त्य कथित विद्वान यांच्याकडे सर्व अधिकार रहातील’, असे नियोजन करण्यात आले, म्हणजे शंकराचार्य यांचे पीठाचे नाव अन् प्रतिष्ठा यांचा वापर होणार, त्यामुळे हिंदूंना त्याच्याकडून प्रसारित होणारे विचार हे त्यांच्या सर्वाेच्च धर्मगुरूंकडून आले आहेत, असे वाटणार; पण प्रत्यक्षात मात्र निर्णयाचे अधिकार केवळ पाश्चात्त्य विद्वानांकडे रहाणार ! कालांतराने या माध्यमातून पीठाची भूमिका ‘केवळ निधी पुरवणारे’ इतकीच मर्यादित होणार होती, तर संस्कृत ग्रंथांचे अर्थ लावण्याचा अधिकार सर्वस्वी पाश्चात्त्य विद्यापिठांकडे जाणार होता. ज्या आध्यात्मिक परंपरेचे ते बाहेरून अधर्मीकरण करतच होते, त्या परंपरेच्या सर्वोच्च संस्थेला आतून पूर्णतः नष्ट करण्याचा हा कट होता !

राजीव मल्होत्रा यांनी षड्यंत्र उघड करणे !

वरील सर्व कट अमेरिकेत रहाणारे हिंदुत्वनिष्ठ राजीव मल्होत्रा यांनी उघड केले, म्हणून हे भयंकर षड्यंत्र समोर आले आहे.

– श्री. नागेश जोशी

६. संस्कृत आणि नाझीवाद : सर्वांत विषारी आरोप

पॉलॉक यांचे सर्वाधिक वादग्रस्त विधान, म्हणजे त्यांनी वर्ष १९९३ मध्ये लिहिलेल्या ‘ओरिएंट्यालिझम’ या लेखात म्हटले आहे, ‘संस्कृत साहित्याने जर्मन राष्ट्रवादाला, म्हणजेच नाझीवादाला बौद्धिक खाद्य पुरवले.’ हा दावा अत्यंत धोकादायक आहे; कारण यामुळे संस्कृत भाषेला थेट नाझी विचारधारेशी जोडले जाते. याचा परिणाम स्पष्ट आहे तो, म्हणजे पाश्चात्त्य शैक्षणिक जगतात ‘संस्कृत आणि हिंदु परंपरा यांचे ‘नाझीवादाचे पूर्वज’ अशा आशयाचे चित्रण होऊ शकते.

७. हिंदु धर्मग्रंथांना ‘जातीय अत्याचाराची साधने’ ठरवणारे पॉलॉक

खरेतर अमेरिकेतील हिंदुत्वाचे अभ्यासक डॉ. राजीव मल्होत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे संस्कृतमधील ज्ञानपरंपरेचे २ स्तर आहेत. एक पौरुषेय, म्हणजे मानवनिर्मित, ऐतिहासिक, पालटणारे आणि दुसरा अपौरुषेय म्हणजेच शाश्वत, प्रमाणाधारित, पूर्णतः आध्यात्मिक. पॉलॉक केवळ पौरुषेय स्तरावर लक्ष केंद्रित करतात आणि अपौरुषेय परंपरेला, म्हणजे संस्कृतच्या आत्म्यालाच (मूळ ज्ञानपरंपरेला) जाणीवपूर्वक नाकारतात अन् संस्कृतला केवळ ‘जातीय अत्याचाराची साधने’ ठरवतात. यामुळे वेद, उपनिषदे, गीता आणि रामायण यांचे आध्यात्मिक मूल्य पूर्णतः झाकोळले जाते.

८. संस्कृतला सवर्णांची भाषा ठरवून द्वेषापोटी त्यातील आध्यात्मिक गाभा झाकोळणे

पॉलॉक यांच्या मते संस्कृत ही ‘मृतभाषा’ आहे आणि ‘ती केवळ अत्याचाराचे माध्यम होती.’ या दृष्टीकोनामुळे हिंदु धर्मातील आध्यात्मिक ज्ञानाचा अमूल्य गाभा अन् स्रोत पूर्णपणे काढला जातो. त्याला केवळ ‘जातीय संघर्षाचे’ (‘कास्ट कॉन्फ्लिक्ट’चे) तुच्छ स्वरूप दिले जाते. अशा प्रकारे हिंदु समाज हा कायमस्वरूपी विभाजित राहील, याची काळजी हे ‘सांस्कृतिक मार्क्सवादी’ घेत असतात.

९. ‘संस्कृत मृत’ म्हणणे, म्हणजे मोक्षाचा स्रोत नष्ट करणे

पॉलॉक यांचे आणखी एक कुख्यात विधान, म्हणजे ‘संस्कृत ही व्यावहारिकदृष्ट्या मृतभाषा आहे आणि सरकारकडून मिळणार्‍या साहाय्याने ती ‘क्वासी ॲनिमेशन’मध्ये ठेवली जात आहे.’ (म्हणजे जिवंत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे). असे म्हणून पॉलॉक यांनी मोक्ष मिळवण्याचे ज्ञानाचा स्रोत नष्ट करण्याचे षड्यंत्र आखले. (सध्या भारतात संस्कृतविषयीची वस्तूस्थिती वेगळी आहे. आज भारतात संस्कृत बोलण्याची (‘स्पोकन’ संस्कृत) चळवळ निर्माण झाली आहे. मत्तूरसारख्या गावांमध्ये सहस्रो विद्यार्थ्यांच्या वतीने ती जिवंत आहे, तसेच सध्या संस्कृत शिकवणार्‍यांची आणि शिकणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. – संकलक)

१०. संस्कृतवरील भारतियांचा अधिकार काढून तिला पाश्चात्त्यांच्या वर्चस्वाखालील दाखवण्याचे षड्यंत्र

पॉलॉक यांच्या या दाव्यामागचा उद्देश संस्कृतवरील हिंदूंचा नैतिक अधिकार काढून घेणे आणि तिला एक ‘शैक्षणिक संशोधनाची वस्तू’ बनवणे, हा आहे; जेणेकरून तिचे भवितव्य भारतीय परंपरेच्या हातात नव्हे, तर पाश्चात्त्य विद्यापिठांच्या हातात जाईल.

११. संपूर्ण संस्कृती अन् राष्ट्र यांवर भयानक मोठे आक्रमण !

पॉलॉक यांच्या विचारांचा प्रभाव केवळ कोलंबियाच्या वर्गखोल्यांपुरता मर्यादित नाही. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज जगभरातील विद्यापिठांमध्ये ‘संस्कृत स्टडीज्’चे (संस्कृत अध्यापनाचे) विभाग चालवत आहेत. रटगर्स प्रकरणात पाहिल्याप्रमाणे अमेरिकेतील विद्यापिठांमधून निर्माण होणारे ‘शैक्षणिक (अ)सत्य’ भारतातही ‘सत्य’ म्हणून स्वीकारले जाते. त्यामुळे ‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जे.एन्.यू.)’सारख्या भारतीय विद्यापिठांमध्ये संस्कृत ग्रंथांचे पॉलॉकवादी विश्लेषण शिकवले जाते.

१२. भारतीय साम्यवाद्यांनी पॉलॉक यांच्या ग्रंथांना ‘महत्त्वाचे संशोधन’ म्हणणे

भारतीय इंग्रजी माध्यमे त्यांच्या ग्रंथांना ‘महत्त्वाचे संशोधन’ म्हणून सादर करतात. देशातील पुरोगामी पॉलॉकच्या युक्तीवादांचा आधार घेऊन रामायण-महाभारतावर टीका करतात आणि हिंदुद्वेष पसरवतात.

१३. संस्कृत धर्मग्रंथ आणि ज्ञानपंरपरा यांचे विकृत अर्थ लावून ते नष्ट करू पहाणार्‍यांना ‘इन्फोसिस’चे अर्थसाहाय्य !

या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक, म्हणजे ‘पॉलॉक’ यांच्या कोलंबिया विद्यापिठामधील ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या प्रकल्पाला भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सुप्रसिद्ध ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे रोहन मूर्ती यांनी ५ मिलियन डॉलर्सचे (४१ कोटी ५० लाख रुपयांचे) भरीव अर्थसाहाय्य दिले. भारतीय मोठे उद्योगपती अशा विद्वानाच्या कार्याला पैसे देतात, जो हिंदुद्वेषी विद्वान संस्कृतला ‘मृत’ आणि रामायणाला ‘दुय्यम लेखण्याचे साधन’ म्हणतो. एवढेच नव्हे, तर ज्याने संस्कृत धर्मग्रंथांचा विकृत अर्थ लावून सनातन हिंदु संस्कृतीविषयी सर्वांच्या मनात विष कालवण्याचे षड्यंत्र रचले आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे ? भारतीय पैशाने भारतीय परंपरेवरच घाव घालण्याचे हे प्रायोगिक उदाहरण आहे.

(क्रमश:)

– श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती, पुणे.

हिंदु धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, साधक आणि वाचक यांना सूचना

हिंदु धर्मावर इतके आघात होत असतांनाही हिंदू अशा प्रकारचे लिखाण वाचून ठेवून देतात. त्याला कोणत्याही प्रकारे विरोध करत नाहीत, हे वास्तव आहे. इतर धर्माच्या संदर्भात असे काही झाले असते, तर आतापर्यंत दंगली झाल्या असत्या. हिंदूंच्या या अशा मनोवृत्तीमुळेच धर्मावर आघात होत आहेत. सध्याच्या पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीतून हिंदु धर्माच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार हा कडू औषधाच्या गोळीला साखरेचा मुलामा दिल्याप्रमाणे आहे. त्यामुळे हिंदूंनो, उद्या तुमची मुलेही या विचारसरणी मागे लागू शकतात. हे आघात आणि साम्यवाद्यांकडून हिंदु धर्म, देवता, ग्रंथ यांविषयी प्रसारित करण्यात येणारे विचार इतके भयावह आहेत की, त्यांना वैध मार्गाने रोखणे आणि सत्य जगासमोर मांडणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या नजीकच्या कार्यालयात कळवा.

– संपादक