US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत

तेहरान (इराण) – इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतियांनी शक्य तितक्या लवकर आपल्या मायदेशी परतावे, असे आवाहन इराणमधील भारतीय दूतावासाने २० जुलै या दिवशी समाजजिक माध्यमांद्वारे केले. यासह ‘कुठल्याही कारणास्तव इराणला भेट देण्याची योजना आखणार्‍या भारतियांनी इराणमधील सुरक्षेची परिस्थिती सुधारेपर्यंत तेथे जाण्याचा विचार पुढे ढकलावा’, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचा वणवा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय दूतावासाने पुढे म्हटले आहे, ‘‘वेळोवेळी सद्यःस्थितीची माहिती घेण्यासाठी बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि देशाचा दक्षिण किनारा यांसारख्या सैन्य हालचाली अधिक असलेल्या भागांना भेट देणे टाळावे. इराणमधील ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे स्वतःची माहिती नोंदवलेली नाही, त्यांनी ती त्वरित नोंदवावी आणि पुढील अद्ययावत माहितीसाठी दूतावासाचे संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमे यांवर नियमितपणे लक्ष ठेवावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.’’ या आवाहनानंतर इराणमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भारतियांनी मायदेशी परतण्यास आरंभ केल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध चालू झाल्याच्या आणि अमेरिकेकडून इराणमधील अनेक भागांवर आक्रमण केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही ८ एप्रिल रोजी दूतावासाने इराणमधीत भारतीयांसाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या होत्या.