पाकव्याप्त काश्मीरमध्ये ७ जून २०२६ पासून तेथील स्थानिक जनतेचे पाकिस्तानी सत्तेविरोधात आंदोलन चालू आहे. विविध ठिकाणी विशेषकरून रावळकोट या शहरात एकत्र येऊन आंदोलन करणारा मोठा समुदाय हे त्याचे प्रतिनिधिक रूप असून त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे आता जगभर झाली आहेत. २० जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आंदोलकांच्या मागण्या, पाक सत्ताधिशांची भूमिका, आंदोलनाच्या पाठीराख्यांची भारताकडून अपेक्षा; पाकव्याप्त काश्मीरवर ताबा, हा भारताचा न्याय्य हक्क आणि भारतियांनो, हे ऐतिहासिक सत्य विसरू नका !’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1063149.html

९. दोन भूमिकांची तुलना
थोडक्यात पाकव्याप्त काश्मीरची मूळ संस्कृती इस्लाम नाही, हे नक्कीच ! ती हिंदु सभ्यताच आहे. त्यामुळे हा भूभाग भारतातच असायला हवा आहे. त्यामुळे, तसेच फाळणीच्या कालखंडातील घटना यांमुळे या प्रदेशाचे भारतात येणे, ही ‘घरवापसी’ असून तो भारताचा न्याय्य अधिकार आहे. याउलट पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांना भारतात विलीनीकरण हवे आहे, ते सध्याच्या त्यांना भोगाव्या लागणार्या यातना जाऊन सुख-सुविधा मिळाव्यात यासाठी. हा भेद लक्षात घेणे का महत्त्वाचे आहे, हे पुढील माहितीवरून स्पष्ट होईल.

१०. फाळणीनंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांच्यावर अनन्वित अत्याचार
भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी आणि फाळणीच्या कालावधीत या प्रदेशात १५ टक्के लोकसंख्या हिंदु अन् शीख समुदायाची होती. अनुमाने दीड लाख हिंदु आणि शीख तेथे रहात होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४७ मध्ये विस्थापनामुळे आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदु आणि शीख लोकसंख्या जवळपास शून्य झाली.
अ. मिरपूरचे हत्याकांड (२५ नोव्हेंबर १९४७) : हा या फाळणीच्या काळातील सर्वांत क्रूर नरसंहार आहे. मिरपूर शहर आक्रमकांनी वेढल्यानंतर तिथे आश्रय घेतलेल्या अनुमाने १८ सहस्र ते २० सहस्र हिंदु अन् शीख बांधवांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सहस्रो महिलांना ओलीस ठेवण्यात आले, त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना रावळपिंडी अन् इतर बाजारपेठांमध्ये विकण्यात आले. स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी शेकडो महिलांनी विहिरीत उड्या घेऊन सामूहिक आत्महत्या केल्या. शहरात उरलेल्या अनुमाने ५ सहस्र हिंदु-शिखांना ‘अलिबेग’ येथील एका जुन्या गुरुद्वारामध्ये बंदी बनवून ठेवण्यात आले, जेथे उपासमार आणि छळामुळे अनेकांचा मृत्यू झाला. नंतर मार्च १९४८ मध्ये ‘रेड क्रॉस’च्या साहाय्याने यातील केवळ १ सहस्र ६०० वाचलेल्या लोकांना भारतात आणण्यात आले.
आ. निर्वासितांची सद्यःस्थिती : या भीषण हिंसाचारातून जे सुदैवाने वाचले, ते जंगले आणि डोंगर यांमधून पायी प्रवास करत जम्मू, पंजाब आणि देहली यांच्या दिशेने पळाले. या निर्वासितांना अनेक दशके पूर्ण भारतीय नागरिकत्वाचे हक्क मिळवण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. सरतेशेवटी वर्ष २०१९ मध्ये कलम ३७० रहित केल्यानंतर भारत सरकारने त्यांना मतदानाचा हक्क दिला ! वर्ष १९४८ पासून इतकी वर्षे ही मंडळी कशी ‘अधांतरीच’ होती, याची कल्पना करावी.

११. पाकव्याप्त काश्मीरमधील मंदिरे
फाळणीच्या वेळी सध्याच्या पाकव्याप्त काश्मीर क्षेत्रात अनेक लहान-मोठी मंदिरे आणि डझनभर ऐतिहासिक गुरुद्वारे अस्तित्वात होते. फाळणीपूर्वी हा प्रदेश हिंदु संस्कृतीचे एक मोठे केंद्र होता. मुझफ्फराबाद जवळील नीलम खोर्यात असलेले शारदा पीठ जगातील १८ महाशक्तीपीठांपैकी एक आणि प्राचीन काळातील ज्ञानाचे सर्वांत मोठे केंद्र होते. मिरपूर शहराच्या उत्तर भागात भव्य ‘सनातन धर्म मंदिर’, ‘मंगलादेवी मंदिर’, ‘बाणगंगा मंदिर’ आणि ‘शिवाला मंदिर’ होते. प्रताप मंदिर हे मोठे मंदिर होते.
१२. फाळणीनंतर काय झाले ?
ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४७ मधील आक्रमणाच्या कालावधीत कबाली आणि पाकिस्तानी सैन्याने बहुतांश मंदिरे अन् गुरुद्वारे यांची तोडफोड केली, तेथील सोने-नाणे लुटले आणि इमारती पेटवून दिल्या. अलिबेग गुरुद्वाराचे रूपांतर ‘महंमद याकूब शहीद सरकारी उच्च माध्यमिक मुलींची शाळे’मध्ये करण्यात आले आहे. मुझफ्फराबाद, पुंछ आणि कोटली येथील लहान-मोठी मंदिरे एकतर जाळण्यात आली किंवा नंतर उद्ध्वस्त करण्यात आली.
पाकिस्तानने जेव्हा मिरपूर भागात ‘मंगला धरण’ बांधले, तेव्हा जुने मिरपूर शहर पाण्याखाली गेले. यामुळे तेथील बहुतांश मंदिरे आणि गुरुद्वारा दमदमा साहिब कायमचे पाण्याखाली बुडाले. आजही धरणाचे पाणी ओसरल्यावर काही मंदिरांचे कळस दिसतात. उरलेली अनेक मंदिरे आणि गुरुद्वारे पाकिस्तानच्या ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ (ईटीपीबी)ने ताब्यात घेतली. स्थानिक लोकांनी या रिकाम्या धार्मिक स्थळांवर ताबा मिळवून तिथे दुकाने, उपाहारगृहे किंवा घरे थाटली आहेत. स्थानिक मुसलमानांपैकी काही ‘शारदापीठाचे पुनरुज्जीवन करावे’, अशी मागणी करतात; परंतु त्यामागे भारतातून तेथे श्रद्धाळू येतील अन् त्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळेल, हा हेतू आहे.
१३. स्थानिक मुसलमानांची भूमिका
२१ आणि २२ ऑक्टोबर १९४७ च्या रात्री जेव्हा कबालींनी मुझफ्फराबादवर आक्रमण केले, तेव्हा तेथील सीमेवरील पुलाचे रक्षण करणार्या जम्मू-काश्मीर सैन्यातील मुसलमान सैनिकांनी स्वतःच्याच हिंदु सहकार्यांवर गोळ्या झाडल्या आणि ते आक्रमक कबालींना जाऊन मिळाले. पुंछ आणि मिरपूर यांसारख्या सीमावर्ती भागातील काही स्थानिक मुसलमानांनी प्रारंभीला कबालींना आणि पाकिस्तानी सैन्याला भारताच्या विरोधात साथ दिली. कबाली जेव्हा बारामुल्ला आणि श्रीनगरच्या दिशेने जाऊ लागले, तेव्हा त्यांनी केवळ हिंदु-शिखांनाच नाही, तर स्थानिक काश्मिरी मुसलमानांनाही लुटले. त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांच्या घरांची तोडफोड केली. त्यानंतर अनेक स्थानिक मुसलमान त्यांच्या विरोधात गेले; मात्र श्रीनगर आणि काश्मीर खोर्यातील मुसलमान कबालींच्या विरोधात उभे ठाकले.
१४. पाकव्याप्त काश्मीरमधील मुसलमानांचा विस्थापित हिंदूंना परतण्यास विरोध
वर्ष १९४७ पूर्वी ज्या भागात हिंदु, शीख आणि मुसलमान शतकानुशतके एकत्र रहात होते, तिथे पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर धार्मिक द्वेष मोठ्या प्रमाणावर वाढला. जे हिंदु-शीख युद्धकाळात भारतात जाऊ शकले नाहीत, त्यांना एकतर सक्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले किंवा हा प्रदेश सोडण्यास प्रवृत्त केले गेले. ज्या इमारती शेष राहिल्या, त्या पाकिस्तानच्या ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ने स्थानिक मुसलमानांना भाड्याने दिल्या. आज तेथे दुकाने, गोदामे किंवा स्थानिक लोकांची घरे थाटण्यात आली आहेत. विस्थापित हिंदु आणि शीख बांधवांना परत वसवण्याच्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये तेथील स्थानिक मुसलमानांची कोणतीही सकारात्मक योजना किंवा भूमिका नाही. ७-८ दशकांनंतर हा विषय तिथे पूर्णपणे संपलेला मानला जातो. हिंदूंनी सोडलेली घरे, शेतभूमी आणि व्यावसायिक जागा यांवर आता स्थानिक मुसलमानांच्या पिढ्यान्पिढ्या रहात आहेत. त्यामुळे जर हिंदूंना परत वसवण्याचा विचार झाला, तर स्वतःची भूमी आणि घरे हातातून जातील, अशी तीव्र भीती स्थानिक लोकांमध्ये आहे. यामुळे ते अशा कोणत्याही कल्पनेला कडाडून विरोध करतात. तेथील नव्या पिढीने कधीही हिंदु किंवा शीख बांधवांना पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात मुसलमानेतर समुदायांना सामावून घेण्याची कोणतीही सामाजिक सिद्धता किंवा इच्छा नाही.
१५. पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आलेल्या हिंदूंना देशात काही ‘आवाज’ नाही !
वर्ष २०१९ मध्ये कलम ३७० रहित (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या निर्वासित कुटुंबांना जम्मू-काश्मीरमध्ये ७ दशकांनंतर पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार, नोकर्या आणि भूमी खरेदी करण्याचे पूर्ण नागरी हक्क मिळाले आहेत. यातच फाळणीपासून चाललेली त्यांची फरफट लक्षात घ्यावी. त्यांची संख्या अनुमाने दीड लाख इतकी नगण्य आणि विखुरलेली असणे, तसेच उर्वरित हिंदूंची कमालीची अनास्था म्हणून त्यांना जणू काही आवाजच नाही.
१६. पाकव्याप्त काश्मीरचे भारतातील विलीनीकरणाचा विचार करणार्या हिंदूंनी निश्चित मागण्या मांडाव्यात !
बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी जो भोळसटपणा भारताने आणि त्याहून अधिक भारतातील हिंदूंनी दाखवला, तो पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडायचा विचार करतांना टाळावा. आज भारताकडे साहाय्य मागणार्या पाकव्याप्त काश्मीरचा हिंदूंसंबंधीचा इतिहास पहावा. विलीनीकरणाची मागणी आल्यास ‘तेथील मंदिरांचे पुनरुज्जीवन, विस्थापित हिंदूंचे तेथे पुनर्वसन यांसाठी निश्चित सीमांचा आणि केंद्रशासित भूप्रदेश, त्यांना भारतात अल्पसंख्यांकांना जे लाभ मिळतात ते तेथे हिंदूंना मिळावेत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये उर्वरित भारतातील मंडळींना खासगी भूमी विकत घेण्याचा पूर्ण अधिकार असणे’, या धर्तीवर या मागण्या असाव्यात.
पाकव्याप्त काश्मीर तुटल्यास पाकिस्तान कमकुवत होईल, हा दुय्यम लाभ आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे. बांगलादेशाप्रमाणे नुसता स्वतंत्र प्रदेश करून ठेवणे, या पर्यायाकडे जाऊ नये. तो भारताचे अभिन्न अंग आहे आणि तो भारतात असणे, हे न्याय्य आहे.
(समाप्त)
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२६)
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले