धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निर्णय

मुंबई – धर्म पालटल्याने जात पालटत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला. न्यायालयाने समितीचा आदेश रहित करत जन्मजात धर्मामुळे पालटत नसल्याचे सांगितले.

१. अमरावती येथील प्राची सुधीर नेटके (वय २० वर्षे) या अभियांत्रिकी विद्यार्थिनीने ‘वाणी’ या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती; मात्र तिच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात ‘सैतवाल जैन’ अशी जातीची नोंद असल्याचे कारण देत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तिचा दावा फेटाळला. ‘जैन वाणी’चा राज्याच्या ओबीसी सूचीत समावेश नसल्याचेही समितीने नमूद केले होते. यासाठी प्राची नेटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

२. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपिठाने प्रकरणाची सुनावणी करत समितीचा आदेश रहित केला. न्यायालयाने म्हटले की, शाळेच्या दाखल्यातील धर्मासंबंधी उल्लेखाला महत्त्व देण्यात आले आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

३. दक्षता पथकाच्या अहवालातही प्राची नेटके यांचे कुटुंब ‘वाणी’ समाजातील असल्याचे स्पष्ट झाले होते. ‘कुटुंब जैन धर्माचे पालन करत असले, तरी त्यामुळे त्यांची जन्मजात असलेली जात पालट नाही’, असे न्यायालयाने अधोरेखित केले. यानंतर न्यायालयाने संबंधित समितीला ४ आठवड्यांच्या आत प्राची नेटके यांना ‘वाणी’ समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.