कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

‘१.७.२०२५ या दिवशी श्रीमती उषा अनंत बोकाडे (वय ८४ वर्षे) यांचे निधन झाले. २०.७.२०२६ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्या रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) उषा बोकाडे

१. श्री. मिलिंद बोकाडे (कै. (श्रीमती) उषा अनंत बोकाडे यांचा मुलगा), फोंडा, गोवा.

१ अ. आईच्या रुग्णाईत स्थितीत तिला होणारे त्रास पाहून वाईट वाटणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शन वाचून त्यावर मात करता येणे : ‘माझ्या आईला गेल्या ४० वर्षांपासून मानसिक त्रास होता. ती मानसोपचार तज्ञांनी दिलेली औषधे घेत होती. गेल्या काही वर्षांपासून ती पाठीतून पूर्ण वाकलेली होती, तरीही ती त्याच स्थितीत घरात चालत होती. ‘आईला चालतांना किंवा झोपतांना किती त्रास होत असेल ! ती सरळ उभे राहून कुणाकडेच पाहू शकत नाही. आई एक मानसिक रुग्ण आहे’, या गोष्टींमुळे आधी मला तिच्याकडे पाहून पुष्कळ वाईट वाटायचे. नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शन वाचून माझ्या लक्षात आले, ‘आई तिचे मागच्या अनेक जन्मांतील प्रारब्ध भोगत आहे, तसेच ‘मी तिला अशा स्थितीत सतत पहात रहाणे आणि तिची सेवा करणे’, हा माझ्या प्रारब्धाचा अन् आम्हा दोघांमधील देवाण-घेवाण हिशोब आहे. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तो हिशोब या जन्मात संपवत आहेत.’ या दृष्टीकोनामुळे मला आईविषयी वाईट वाटणे उणावले. मला तिची रुग्णाईत स्थिती स्वीकारता आली.

श्री. मिलिंद बोकाडे

१ आ. आईची सेवा करत असतांना ‘संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवणे : मी गुरुदेवांकडे प्रार्थना करत होतो, ‘आईला आणि मला प्रारब्ध सहन करण्याची शक्ती द्या.’ मी आईची सेवा करत असतांना ‘संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे माझ्यातील ‘भावनाशीलता आणि चिडचिडेपणा’ हे स्वभावदोष पुष्कळ प्रमाणात न्यून झाले.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्यांच्या कृपेने आईचे रक्षण होणे : आई घरात तोल जाऊन ३ – ४ वेळा पडली होती. त्यामुळे ‘मी घरी नसतांना जर आई पडली, तर काय होईल ?’, या विचाराने कुटुंबियांना ताण यायचा. मी बाहेर जातांना गुरुदेवांना प्रार्थना करत असे, ‘मी घरी येईपर्यंत गुरुदेवा, तुम्हीच आईचा सांभाळ करा’ आणि खरंच इतकी वर्षे गुरुदेवांनी तिचा सांभाळ केला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

१ ई. आईच्या पायाचे शस्त्रकर्म होतांना आरंभी ताण येणे आणि गुरुकृपेमुळे नामजप चालू होऊन स्थिर रहाता येणे : माझी आई ६.६.२०२५ या दिवशी घरी तोल गेल्याने पडली. सुदैवाने त्या वेळी मी घरीच होतो. तिला चालता येत नसल्याने रुग्णालयात न्यावे लागले. आरंभी माझ्या मनावर ताण होता; पण नंतर गुरुकृपेने मला स्थिर रहाता आले. तिचे पायाचे शस्त्रकर्म करायचे ठरले. तिचे शस्त्रकर्म होत असतांना मी नामजपादी उपाय करत होतो. त्या वेळी मला स्थिर रहाता आले.

१ उ. रुग्णालयात नामजपादी उपाय केल्यामुळे स्थिर रहाता येणे : आईचे शस्त्रकर्म झाल्यावर चौथ्या दिवशी आईला तिच्या पायावर मलमपट्टी लावण्यासाठी आणि तिच्यावर भौतिक चिकित्सा (फिजिओथेरपी) करण्यासाठी एका ‘केअर सेंटर’ (देखभाल केंद्र) मध्ये नेले. तिथे मी तिच्या उशीखाली गुरुदेवांचे मोठे छायाचित्र उपायांसाठी ठेवले होते. मी आईला ‘प्रतिदिन विभूती लावणे, तिच्याजवळ भ्रमणभाषवर हळू आवाजात नामजप लावून ठेवणे, गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करणे’, असे उपाय चालू केले होते. आईसाठी वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने मला स्थिर रहाता आले.

१ ऊ. ‘पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी प्रार्थना कशी करायची ?’, याविषयी सांगणे आणि भावाच्या स्तरावर आईची सेवा करता येणे अन् मनावरचा ताणही न्यून होणे : आईला तिथे विविध शारीरिक त्रास चालू झाले. पू. (श्रीमती) सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी मला ‘प्रार्थना कशी करायची ?’, याविषयी सांगितले. त्यांनी ‘आई लवकर बरी होऊ दे’, या ऐवजी ‘देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडू दे’, अशी प्रार्थना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे माझ्याकडून सतत प्रार्थना होऊ लागली. त्यामुळे माझ्या आईविषयी असलेल्या अपेक्षा न्यून झाल्या. माझ्यावरील ताण न्यून होऊन मला हलके वाटू लागले. आईला होत असलेले त्रास पाहून मी काही वेळा भावनिक होत होतो. मी रुग्णालयात ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा ‘साधना’ म्हणून कशी करावी ?’, हा सनातनचा लघुग्रंथ वाचला. त्यामुळे ‘आईची सेवा भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, हे मला शिकता आले. त्यामुळे माझ्या मनावरचा ताण न्यून झाला.

१ ए. ‘केअर सेंटर’ म्हणजे आश्रम आहे आणि तेथील कर्मचारी साधक आहेत’, असा भाव ठेवणे अन् ताण येण्याचे प्रमाण न्यून होणे : आईच्या निधनाच्या ३ दिवस आधीपासून मी तिला अधूनमधून गुरुदेवांचे छायाचित्र दाखवत होतो आणि ‘आपल्याला त्यांच्याकडे जायचे आहे’, असे सांगत होतो. आईला गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार करायला सांगितल्यावर ती लगेच तशी कृती करत होती. मी त्या ‘केअर सेंटर’ मध्ये प्रतिदिन प्रवेश करतांना ‘आश्रमात प्रवेश करत आहे, तसेच तेथील कर्मचारी म्हणजे साधक आहेत’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मला ताण येण्याचे प्रमाण न्यून झाले.

१ ऐ. आईच्या निधनानंतर

१. आईच्या १० व्या दिवशी पिंडदानाच्या वेळी २ मिनिटांत पिंडाला कावळा शिवला.

‘ही सर्व सूत्रे गुरुदेवांनी माझ्याकडून लिहून घेतल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. सौ. मनीषा बोकाडे (कै. (श्रीमती) उषा अनंत बोकाडे यांची सून) फोंडा, गोवा.

अ. ‘सासूबाईंचे निधन झाल्याचे समजल्यावर आणि त्यांचा पार्थिव देह दुसर्‍या दिवशी घरी आणल्यावर मला देवाच्या कृपेने स्थिर रहाता आले.’

३. श्री. मोहित बोकाडे (कै. (श्रीमती) उषा अनंत बोकाडे यांचा नातू), फोंडा, गोवा.

अ. ‘आजी रुग्णालयात असतांना मी तिच्याजवळ अधूनमधून थांबत होतो. तिची रुग्णाईत स्थिती पाहूनही मला देवाच्या कृपेने स्थिर रहाता आले.

आ. आजीचे निधन झाल्याचे समजल्यावर ती परिस्थिती स्वीकारून मला शांत रहाता आले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक