श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे १.४.२०२६ या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रात आगमन झाले. ४.४.२०२६ दिनांकपर्यंत त्यांचे मंगळुरू सेवाकेंद्रात वास्तव्य होते. त्यामुळे सेवाकेंद्रातील सर्व साधकांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दिव्य सान्निध्य लाभले. या वेळी त्यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन केले, ते येथे दिले आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘आपण सृष्टीतील ईश्वराच्या अस्तित्वाप्रती किती कृतज्ञ आहोत ?’, याचा विचार करा ! 

‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सर्व साधकांचे प्राणप्रिय आहेत. त्यांनी आपल्याला सर्वकाही दिले आहे. आपल्याला ८४ लक्ष योनींतून फिरल्यानंतर हा मनुष्यजन्म मिळाला आहे आणि त्यातही ‘आपल्याला गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळाले आहे’, ही मोठी ईश्वरी कृपा आहे. साधकांनी ‘आपण सृष्टीतील ईश्वराच्या अस्तित्वाप्रती किती कृतज्ञ आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे.

२. आनंदप्राप्ती हे आपले ध्येय आहे. त्याबद्दलची जाणीव आपण सतत जागृत ठेवली पाहिजे. त्यासाठी निरंतर प्रयत्न करायला हवेत.

३. ‘स्वतःसह इतरांचाही वेळ वाया जाणार नाही’, याची काळजी घ्या ! 

आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो केवळ साधनेसाठीच वापरला पाहिजे. कुठेही वेळ वाया घालवू नका. गुरुदेव स्वतः एक मिनिटही वाया घालवत नाहीत. ‘आपल्यामुळे इतरांचाही वेळ वाया जाणार नाही’, याची काळजी घेतली पाहिजे.

४. सनातनचे आश्रम म्हणजे साक्षात् श्रीविष्णूच्या अमृतकुंभातून पडलेले अमृतबिंदू आहेत ! 

श्रीमती अश्विनी प्रभु

पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांपैकी केवळ काही साधकांनाच गुरुदेवांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्याची आणि साधना करण्याची संधी मिळाली आहे. त्यातही आणखी भाग्य म्हणजे काही जणांना आश्रमात राहून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. सनातनचे आश्रम म्हणजे साक्षात् श्रीविष्णूच्या अमृतकुंभातून पडलेले अमृतबिंदू आहेत. महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे हे अमृतबिंदू जिथे जिथे पडले आहेत, तिथे सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे बनली आहेत. त्यामुळे ‘या पवित्र भूमीबद्दल आपल्या मनात किती कृतज्ञता आहे ?’, हे अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे.

५. ‘आपण करत असलेल्या सेवेतून आनंद मिळतो का ?’, हे सतत पाहिले पाहिजे ! 

गुरुदेव स्वतः शिकतात आणि साधकांनाही शिकवतात. एक साधक पूजेसाठी फुले तोडत असतांना गुरुदेवांनी पाहिले की, तो साधक पुढच्या रांगेतील फुले सोडून मागच्या रांगेतील फुले तोडत आहे.  गुरुदेवांनी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘पुढची फुले येणार्‍या-जाणार्‍यांना आनंद देतात; म्हणून मी मागची फुले तोडतो.’’ देवाला फुले अर्पण करतांना ‘मार्गावरून जाणार्‍यांनाही आनंद मिळावा’, असा विचार साधकाने करणे, ही त्याची खरी सेवा आहे. ‘आपण जी सेवा करतो, त्यातून आपल्याला आनंद मिळतो का ?’, हे सतत पाहिले पाहिजे.

६. मन गुरूंच्या चरणी पूर्णपणे अर्पण केल्यावरच खरी साधना होते ! 

आपण कुंभाराच्या हातातील मातीच्या गोळ्याप्रमाणे असले पाहिजे. कुंभार म्हणजे गुरुदेव ! ‘आपल्याला कोणता आकार द्यायचा ?’, हे त्यांच्यावर सोडून दिले पाहिजे. जेव्हा आपण आपले मन पूर्णपणे अर्पण करतो, तेव्हाच आपली खरी साधना होते.’

संग्राहक : श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६० वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (१९.४.२०२६)