Anurag Dhankar Found Dead : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड हे पोलीस मुख्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले !

आत्महत्येचा संशय व्यक्त

पोलीस महासंचालक अनुराग धनखड

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड यांचा मृतदेह आगरतळा येथील पोलीस मुख्यालयात आढळल्याने एकच खळबळ उडाली. अनुराग धनखड हे त्यांच्या कार्यालयीन कक्षात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह आगरतळा येथील ‘जीबी’ रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.

१. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी कार्यालयाचा परिसरात प्रवेश बंद करून अन्वेषण चालू केले.

२. या घटनेची माहिती मिळताच त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. (डॉ.) माणिक साहा तात्काळे पोलीस मुख्यालयात पोचले.

३. मुख्य सचिव जे.के. सिन्हा यांच्यासह गृह विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी पोलीस फौजफाट्यासह ‘जीबी’ रुग्णालयात पोचले.

कोण होते अनुराग धनखड?

अनुराग धनखड हे वर्ष १९९४ च्या तुकडीचे ‘आय.पी.एस्.’ अधिकारी होते. त्यांनी २०२५ मध्ये त्रिपुराच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सांभाळली होती. अनुराग धनखड यांनी ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण विभाग) मध्ये असतांना पसार उद्योगपती नीरव मोदी प्रकरणाच्या अन्वेषणाचे नेतृत्व केले होते. तसेच त्यांनी वर्ष १९८४ मधील शीख विरोधी दंगलीच्या अन्वेषणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘एस्.आय.टी.’चेही (विशेष अन्वेषण पथकचेही) नेतृत्व केले होते.