साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘मी वाराणसी आश्रमात राहून साधना आणि सेवा करतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये मी वैयक्तिक कारणासाठी गोवा येथे गेलो होतो. त्या वेळी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. तेव्हा ‘गुरु साधकांना कसे घडवतात !’, याची मला प्रचीती आली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘स्वतःतील स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता न येणे 

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

मला अनेक दिवसांपासून ‘माझ्यातील काही स्वभावदोषांच्या संदर्भात प्रयत्न कसे करावे ?’, हे लक्षात येत नव्हते. मला वाराणसी आश्रमस्थित सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत नव्हते. ‘माझ्याकडून अनेक चुका होतात आणि त्या सद्गुरु नीलेशदादांच्या लक्षातही येतात. कदाचित् ते मला माझी चूक सांगतील का ?’, अशा प्रकारच्या विचारांमुळे माझ्या मनावर ताण असायचा.

२.श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘स्वतःतील स्वभावदोष दूर होण्यासाठी कसे प्रयत्न करावे ?’, याविषयी विचारण्यासाठी काही सूत्रे लिहिणे 

माझ्यात साधकांप्रती प्रेमभाव अल्प आहे. मी प्रसार सेवेला गेल्यावर जिज्ञासूंना संपर्क करतांना माझ्यात कोरडेपणा असतो. मला साधकांप्रती आत्मीयता जाणवत नाही. मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्यापूर्वी त्यांना ‘माझ्यातील स्वभावदोष दूर होण्यासाठी कसे प्रयत्न करावे ?’, हे विचारण्याच्या दृष्टीने काही सूत्रे लिहून ठेवली होती.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात त्यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात आलेली प्रचीती !

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

३ अ. मी रामनाथी आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत गेल्यावर मला प्रकाश दिसला आणि चैतन्य जाणवू लागले. माझे मन आपोआप स्थिर झाले. ‘येथे दिव्य शक्ती आहे’, असे मला जाणवले.

३ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची प्रीती अनुभवून गहिवरून येणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी प्रथम माझ्या बहिणींची विचारपूस केली आणि त्यांच्यासाठी प्रसाद दिला. त्यांनी सांगितले, ‘‘रामनाथी आश्रम हे त्यांचे माहेरच आहे.’’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या बहिणींना आश्रम भेटीचे निमंत्रण दिले. या वेळी मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील प्रीती अनुभवायला आली. ‘इतरांचा विचार कसा करावा ? आत्मियता कशी असावी ?’, याविषयी मला शिकता आले. वास्तविक माझ्या दोन्ही बहिणी इतर संप्रदायानुसार साधना करतात, तरीही ‘गुरु साधकाच्या कुटुंबियांचा किती विचार करतात !’, असे वाटून मला गहिवरून आले.

३ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना काही प्रसंग सांगितल्यावर त्यांनी अचूक उपाययोजना सांगणे आणि त्यांच्यातील सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य ! : ‘मी प्रसंगात साधनेच्या दृष्टीने कुठे न्यून पडतो ?’, याविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुला पाहून सूक्ष्मातून मला जाणवले की, ‘वाईट शक्ती तुला विचारांमध्ये अडकवतात. तू विचार योग्य दिशेने करण्याचा आणि वर्तमानात रहाण्याचा प्रयत्न कर.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला माझी नेमकी अडचण लक्षात आली. त्यानंतर ‘मी विचारांमध्ये कसा गुंततो ?’, या संदर्भातील अनेक प्रसंग माझ्या लक्षात येऊ लागले. ‘गुरु साधकाची नेमकी अडचण कशी जाणतात ? त्यांच्यात सूक्ष्मातून जाणण्याचे सामर्थ्य किती अफाट असते !’, हे माझ्या लक्षात आले.

३ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील चैतन्यामुळे साधकाला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येणे : वास्तविक ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे मला संत आणि साधक यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही; मात्र श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना मी मनातील सर्व सांगितले. त्या वेळी ‘मी माझ्या मनातील सर्वकाही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी कसे बोलून गेलो ?’, हे मला कळलेही नाही. आपण आपली आई किंवा बहीण यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतो. त्याचप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील चैतन्य अनुभवून मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो. ‘त्या गुरुस्थानी असूनही त्यांच्यात किती साधेपणा आहे !’, याची मला त्या वेळी जाणीव झाली.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगानंतर स्वतःत जाणवलेले पालट 

अ. त्यांच्या सत्संगानंतर मला वर्तमानात राहून विचारांवर मात करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

आ. ‘मी काही प्रसंगांत निष्कर्ष काढल्याने माझे मन भरकटल्यास मला कुणीतरी आतून सुचवते आणि मला वर्तमानात रहाण्यासाठी साहाय्य करते’, अशी अनुभूती मला अनेक वेळा आली आहे.

इ. ‘गुरु साधकाला केवळ दिशा देतात’, असे नाही, तर त्याच्या अंतरात पालट होण्यासाठी त्याला बळ देऊन त्याच्याकडून प्रयत्न करून घेतात’, याचीही मला प्रचीती आली.

ई. यानंतर माझे निष्कर्ष काढून ताण घेण्याचे प्रमाणही आपोआप न्यून झाले.

उ. माझ्याकडून चुका झाल्यास माझी त्यातून शिकण्याची वृत्ती वाढली.

५. गोवा येथून वाराणसी येथे आल्यावर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेल्या चुका शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदाने स्वीकारता येणे आणि ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी दिलेल्या दैवी शक्तीमुळे हे शक्य झाले’, असे लक्षात येणे 

मी गोवा येथून वाराणसी येथे आल्यावर मला सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत सेवेनिमित्त दौर्‍यावर जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी सद्गुरु नीलेशदादांनी मला माझ्या काही चुका सांगितल्या. तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मला आतून पुष्कळ आनंद झाला आणि ‘मला प्रयत्न करायला चांगली दिशा मिळाली’, या विचाराने मी उत्साही झालो.

यावर विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी त्याच्या दैवी वाणीतून जी दैवी शक्ती मला दिली, तिच्याच परिणामस्वरूप मला चुकांमधून शिकता आले.’

६. प्रार्थना आणि कृतज्ञता 

सध्या अनेक वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची आठवण येऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात आणि ‘त्यांनी सांगितल्यानुसार किती करू’, असे मला वाटते. ‘त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार माझ्याकडून अपेक्षित प्रयत्न होऊ देत आणि त्यांच्या अनंत उपकारांची माझ्या मनाला अखंड जाणीव राहू दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे. मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४५ वर्षे), वाराणसी आश्रम (४.३.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक