दुसर्या महायुद्धापासून जागतिक अर्थव्यवस्थेवर अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व राहिले आहे. केवळ सत्तापालट आणि लष्करी विस्तार अमेरिकेसाठी पुरेसा नव्हता, हे आतापर्यंतच्या लेखांमधून आपण वाचले आहे. ३ मे या दिवशीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इराणमधील तेलाचे राजकारण, चीनच्या विस्ताराला रोखण्यासाठी गट, अमेरिकेचे हस्तक्षेप, अमेरिकेची आर्थिक धोरणे, अमेरिका लादत असलेले आर्थिक निर्बंध’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036276.html

१. काही देश किंवा जगातील भूभाग येथे अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम
अ. वर्ष १९५४ आणि वर्ष १९६० ते १९९६ पर्यंत ग्वाटेमाला येथे हुकूमशाहीला लष्करी साहाय्य केले, ज्याच्या परिणाम स्वरूप तेथे गृहयुद्ध अन् मानवी हक्कांचे उल्लंघन झाले.
आ. वर्ष १९५८ ते १९६१ या कालावधीत इंडोनेशियात सुहार्तो यांच्या बंडाला पाठिंबा दिला. त्यामुळे साम्यवाद्यांचे हत्याकांड आणि राजकीय अस्थिरता आली.
इ. वर्ष १९७३ मध्ये चिलीमध्ये साल्वाडोर अलेंदे यांचे सरकार पाडले आणि नंतर ऑगस्टो पिनोशे यांची क्रूर हुकूमशाही राजवट लादली गेली.
ई. वर्ष १९८९-१९९० मध्ये पनामात थेट लष्करी आक्रमण करून सरकार उलथवून लावले. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
हे हस्तक्षेप केवळ राजकीय नसून ते आर्थिक हितसंबंधांनी प्रेरित होते. अनेकदा अमेरिकन आस्थापनांच्या व्यापाराला अडथळा ठरणारी धोरणे राबवणार्या नेत्यांना हटवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला.
२. पायाभूत सुविधांचा नाश
अमेरिकेच्या हवाई आक्रमणांमुळे अनेक समृद्ध शहरे भुईसपाट झाली आहेत. इराकचे मोसुल शहर आणि सीरियाचे राक्का शहर वर्ष २०१७ मधील बाँब आक्रमणात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. युगोस्लाव्हियावर वर्ष १९९९ मध्ये करण्यात आलेल्या ७८ दिवसांच्या बाँबच्या आक्रमणात नागरी पायाभूत सुविधा, शाळा, धार्मिक केंद्रे आणि ऐतिहासिक वास्तू यांचा नाश करण्यात आला. या आक्रमणांमुळे झालेली आर्थिक हानी १.५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा (एकावर १२ शून्य) अधिक आहे.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी नंतरचे ‘आतंकवादविरोधी युद्ध’ आणि जागतिक हानी

११ सप्टेंबर २००१ या दिवशीच्या आक्रमणानंतर अमेरिकेने चालू केलेले ‘वॉर ऑन टेरर’ (आतंकवादाच्या विरोधातील युद्ध) हे जागतिक विनाशाचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. ‘कॉस्ट्स ऑफ वॉर’ (युद्धाची किंमत) प्रकल्पाच्या संशोधनानुसार या युद्धामुळे जगाची झालेली हानी अभूतपूर्व आहे. अमेरिकेच्या थेट लष्करी कारवायांनी इराक, येमेन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सोमालिया, फिलीपिन्स, लिबिया आणि सीरिया या देशांमध्ये प्रचंड जीवितहानी झाली. या युद्धामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४५ लाखांहून अधिक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे. ‘विस्थापनाचे संकट’ हा या युद्धाचा सर्वांत भयावह पैलू आहे. किमान ३ कोटी ८० लाख लोक स्वदेशातून विस्थापित झाले आहेत, जे दुसर्या महायुद्धानंतरचे सर्वांत मोठे विस्थापन आहे. ही संख्या प्रत्यक्षात ६ कोटींपर्यंत असू शकते, असेही काही संशोधकांचे अनुमान आहे. – श्री. यज्ञेश सावंत
३. पर्यावरणाचा विध्वंस आणि आरोग्यावरील परिणाम
अमेरिकन लष्करी मोहिमांनी पर्यावरणाची कायमस्वरूपी हानी केली आहे. युगोस्लाव्हिया आणि इराक येथे अमेरिकेने ‘क्षीण युरेनियम’ असलेल्या दारूगोळ्याचा वापर केला. यामुळे भूमीतील पाणी आणि माती प्रदूषित झाली असून तेथील स्थानिक लोकसंख्येमध्ये कर्करोग अन् जन्मजात विकृतींचे प्रमाण वाढले आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी वापरलेल्या ‘एजंट ऑरेंज’ या रसायनाचे परिणाम आजही तेथील पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांवर दिसून येतात. अफगाणिस्तानमध्ये पेरलेल्या भूसुरुंगांमुळे आजही प्रतिवर्षी निष्पाप मुले आणि नागरिक मारले जातात.
४. सांस्कृतिक साम्राज्यवाद आणि स्थानिक संस्कृतींचा र्हास
अमेरिकेचे वर्चस्व केवळ बंदुकीच्या जोरावर नसून ते ‘सॉफ्ट पॉवर’च्या (सैन्याच्या बळावर कारवाई न करता संस्कृती, राजकीय मूल्ये आणि परराष्ट्र धोरण यांवर प्रभाव टाकणे) माध्यमातूनही लादले गेले आहे. हॉलीवूड चित्रपट, अमेरिकन फॅशन आणि अन्न संस्कृती (उदा. मॅकडोनल्ड्स) यांनी जगातील स्थानिक संस्कृतींना गिळंकृत करण्यास प्रारंभ केला आहे. हॉलीवूड चित्रपट जगभरात अमेरिकन मूल्ये आणि जीवनशैलीचा प्रसार करतात. यामध्ये अनेकदा अमेरिकेला ‘न्याय रक्षणकर्ता’ आणि इतर राष्ट्रांना (विशेषतः आशियाई किंवा आफ्रिकन) नकारात्मक भूमिकेत दाखवले जाते.
|
सामंजस्य करार करून तो मोडणारी अमेरिका ! अमेरिकेने विश्वासार्हता गमावण्याचे मुख्य कारण, म्हणजे ती करार करते आणि स्वत:च मोडतेही. याचे सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे इराणच्या समवेत केलेला शांतता करार ! इराणसह करार कधीच होऊ शकणार नाही, असे वाटत असतांनाच एकदम अमेरिका आणि इराण करारासाठी सिद्ध झाल्याची बातमी आली. यानंतर जून २०२६ मध्ये १४ कलमी सामंजस्य करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी केली. या करारानुसार ‘दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण करणार नाहीत’, असे ठरले. त्यामध्ये ‘इराणमधील समृद्ध युरेनियमच्या साठ्याचे काय करायचे ?’, याविषयी मात्र संदिग्धता होती. याविषयी अमेरिकेने ‘इराण याविषयी मर्यादेत राहील आणि अण्वस्त्रे बनवणार नाही’, असे मान्य केल्याचे सांगितले, तर इराणने ‘हा विषय कराराच्या बाहेर आहे’, असे सांगितले. याच सूत्रावरून अमेरिकेने इराणवर आरोप केले की, करार झाला असूनही समृद्ध युरेनियमविषयी तो खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देत आहे. ट्रम्प यांनी ‘अमेरिका इराणच्या उर्वरित नेतृत्वाला कधीही नष्ट करू शकतो’, अशी धमकी दिली आणि ‘इराणने सामंजस्य कराराचा भंग केला’, असा निष्कर्ष काढून ७ जुलै २०२६ या दिवशी अमेरिकेने इराणवर आक्रमण केले. याविषयी अमेरिकेने युद्धबंदी तात्पुरती संपुष्टात आल्याचेही स्वत: घोषित केले. यातून अमेरिकी नेतृत्वाची कुणालाही आणि कोणताही करार न जुमानण्याची वृत्ती, दादागिरी आणि हुकूमशाही वृत्ती दिसते. – श्री. यज्ञेश सावंत (९.७.२०२६) |
अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे इंग्रजी ही जागतिक ‘लिंग्वा फ्रँका’ (संपर्क भाषा) बनली आहे, ज्यामुळे अनेक स्थानिक बोलीभाषा आणि सांस्कृतिक बारकावे नष्ट होत आहेत. जागतिक फॅशन आणि ‘ट्रेंड्स’ हॉलीवूडच्या माध्यमातून ‘सेट’ केले जातात, ज्यामुळे स्थानिक वस्त्रोद्योग आणि परंपरा यांना मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेच्या २ शतकांच्या परराष्ट्र धोरणाचे विश्लेषण केले असता असे स्पष्ट दिसून येते की, ‘शांतता’, ‘लोकशाही’, आणि ‘मानवता’ या शब्दांचा वापर केवळ स्वतःच्या भू-राजकीय हितसंबंधांना लपवण्यासाठी केला गेला आहे. ५०० हून अधिक लष्करी हस्तक्षेप आणि लादलेले आर्थिक निर्बंध यांनी जगाला शाश्वत विकासाऐवजी भयावह विनाशाकडे नेले आहे. इराकमधील २ लाखांहून अधिक मृत्यू, विस्थापित झालेले ३ कोटी नागरिक आणि निर्बंधांमुळे औषधांविना मरणारी इराणमधील लहान मुले, ही अमेरिकी वर्चस्ववादाची भीषण किंमत आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या एकतर्फी कारवायांना उत्तरदायी धरले जात नाही, तोपर्यंत जागतिक शांतता आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे अशक्य आहे. अमेरिकेच्या धोरणांनी उद्ध्वस्त झालेले देश केवळ भौगोलिक सीमा नसून त्या मानवी संस्कृतीच्या झालेल्या अपरिमित हानीच्या खुणा आहेत.
अमेरिका एक असे साम्राज्य ज्याने जगभरातील विश्वासार्हता गमावली आहे, एक असे साम्राज्य जे स्वतःच्या लाभासाठी सहजपणे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करते. साम्राज्ये नेहमी त्याच चुका करतात आणि शेवटी प्रत्येक साम्राज्याचा र्हास होतोच. (क्रमशः)
गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२९.४.२०२६)
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !