उत्तरप्रदेश : ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला दोषीला २० वर्षांची शिक्षा

बांदा (उत्तरप्रदेश) – येथील ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासह २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने दंडाची ही संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचा आदेश दिला.

१. ही घटना १० मे २०२३ या दिवशी घडली होती. कमासिन पोलीस ठाण्याच्या सीमेत रहाणारी ७ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. तेव्हा ४० वर्षीय आरोपी तीरथ याने तिचे अपहरण केले. तो मुलीला निर्जन जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केल्यावर आरोपीने त्या तिला अमानुष मारहाण केल. घटनेनंतर तिची हत्या करण्याचा प्रयत्न करत आरोपीने तिच्या गळ्याभोवती फास लावण्याचाही प्रयत्न केला होता.

२. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून १३ मे २०२३ या दिवशी कमासिन पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार, ‘पॉक्सो’ कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी अन्वेषण पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केले होते.

३. ‘पॉक्सो’ न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी उपलब्ध पुरावे, वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि पीडितेची साक्ष यांच्या आधारे २१ पानांच्या निकालात आरोपीला दोषी ठरवले.