आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari

भारताच्या दौर्‍यावर आलेल्या अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या कृषीमंत्र्यांचे पाकला झोंबणारे विधान

(डी.एन्.ए. म्हणजे डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक)

नवी देहली – भारतात पोचल्याच्या पहिल्या दिवसापासूनच भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि ज्या ज्या लोकांची भेट झाली, त्या सर्वांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. मला अगदी असेच जाणवले की, मी माझ्याच देशात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचा डीएन्ए एकच आहे, असे विधान भारताच्या दौर्‍यावर आलेले अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारमधील कृषी, जलसंधारण आणि पशुपालन मंत्री मौलवी अताउल्ला ओमरी यांनी केले. ते येथे परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ‘इंडिया-अफगाणिस्तान ट्रेड अपॉर्च्युनिटीज इंडस्ट्री इंटरॲक्टिव्ह सेशन’ या संमेलनाला संबोधित करतांना बोलत होते. त्यांनी भारतीय उद्योग जगताला गुंतवणूक, कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, जलसंधारण आणि क्षमता निर्माण या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ओमरी यांनी सांगितले की, हा माझा पहिलाच भारत दौरा आहे आणि येथे  मिळालेला आदर अन् आपुलकी यांमुळे माझे मन जिंकले आहे. आपल्यामधील नाते केवळ मुत्सद्देगिरीचे नाही, तर सामायिक इतिहास आणि संस्कृती यांचे आहे. भारतात मिळालेला सन्मान अफगाणिस्तानच्या लोकांच्या चांगल्या भविष्याची आशा आहे. आमचा अनुमाने ८० टक्के समाज कृषी, जलसंधारण आणि पशुपालन यांवर अवलंबून आहे. आता ही क्षेत्रे आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची वेळ आली आहे आणि भारत या दिशेने एक महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. अफगाणिस्तान आर्थिक विकासासाठी जगातील विविध देशांसमवेत सहकार्य वाढवू इच्छितो.

संपादकीय भूमिका

अफगाणिस्तान ते कंबोडियापर्यंतचा, म्हणजे भारतीय उपखंडातील प्रत्येकाचा डी.एन्.ए. एकच आहे, म्हणजे हिंदूचा आहे. जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनीही त्यांचा आणि भारतियांचा डी.एन्.ए. एकच असल्याचे म्हटले होते; मात्र भारतातील बाटलेले मुसलमान स्वतःला अरबीस्तानातून आलेले मानतात. यातून बाटगे अधिक कडवे असतात, हे लक्षात येते !