लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १३४

‘संध्याकाळी घरी आल्यावर चप्पल अकस्मात् घट्ट वाटते का ? पायावर बोट दाबल्यावर काही वेळ खड्डा तसाच राहिलेला दिसतो का ? तसेच सकाळी आरशात पहातांना चेहरा थोडा फुगलेला दिसतो का ? तेव्हा आपण सहज म्हणतो, ‘‘थोडी सूज आहे.’’ आपल्या दैनंदिन आयुष्यात ‘सूज’ हा शब्द आपण सहज वापरतो; पण ‘ही थोडी सूज म्हणजे नेमकी काय आणि ती का येते ? ती कधी सामान्य असते आणि कधी धोकादायक (धोक्याची घंटा) ठरते ?’, हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘शरिरातील लसिका प्रणाली आणि तिचे कार्य’, यांविषयी जाणून घेतले आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.      

(भाग ३)

या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1036100.html

१. सूज न्यून करण्यासाठी काही साधे; पण प्रभावी उपाय !

अ. ‘सुजलेला भाग शक्य असल्यास हृदयाच्या पातळीपेक्षा थोडा उंचावर ठेवावा.

आ. नियमित हलका व्यायाम करणे, चालणे, टाचा आणि बोटे यांची हालचाल करणे यांमुळे द्रव परत शरिराच्या प्रवाहात येण्यास साहाय्य होते.

इ. खोल आणि संथ श्वसन केल्याने छातीतील दाब पालटतो अन् लसिका प्रवाह सुधारतो.

ई. आहारात मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.

उ. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याने दाब देणारी ‘इलास्टिक’ पट्टी (Compression sleeve) किंवा ‘बँडेज’ वापरावे. (चित्र क्र. १ पहा)

ऊ. काही प्रकारांत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लसिका ‘ड्रेनेज मसाज’ (Lymphatic Drainage Massage) उपयुक्त ठरू शकतो. ही एक विशिष्ट आणि तंत्रशुद्ध उपचारपद्धत असून ती प्रशिक्षित ‘फिजिओथेरपिस्ट’ किंवा तज्ञ यांच्याकडून करून घ्यावी. घरी स्वतः करतांना केवळ सौम्य ‘पंपिंग’ आणि हलक्या वेदनारहित हालचालींचाच वापर करावा. खोल किंवा जोराचा दाब देऊ नये.

सूचना : ‘सूज सतत वाढणे, तीव्र वेदना होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे’, यांसारखे त्रास होत असतील, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

२. लसिका प्रणाली सक्रीय ठेवण्यासाठी दाबाचे मुख्य बिंदू !

शरिरात लसिका प्रणाली ही जाळ्यासारखी संपूर्ण शरीरभर पसरलेली असते. (चित्र क्र. २ पहा) या जाळ्यातील रेषा लसिकावाहिन्या दर्शवतात, तर त्यावर दिसणारे छोटे गोल बिंदू म्हणजे लसिका ग्रंथी (Lymph nodes) होय. या संपूर्ण जाळ्यामध्ये काही ठिकाणे अशी असतात, जिथे लसिका ग्रंथी अधिक प्रमाणात एकत्रित झालेल्या असतात. हे भाग लसिका प्रवाहासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करतात.

आपण सूज न्यून करणारे प्रभावी उपाय पाहिले. त्या समवेत या काही प्रमुख लसिका बिंदूंवर हलक्या पद्धतीने काम केल्यास लसिका प्रवाह सुधारण्यास साहाय्य होऊ शकते; मात्र हे लक्षात ठेवावे की, लसिका प्रणाली अत्यंत नाजूक असते. ती जोराच्या दाबाला प्रतिसाद देत नाही, तर उलट सौम्य, लयबद्ध आणि वेदनारहित हालचालींना चांगला प्रतिसाद देते.

२ अ. दोन बोटांनी हलका दाब देणे : सर्वप्रथम मानेखाली कॉलर बोनचा वरचा भाग महत्त्वाचा असतो. शरिराच्या वरच्या भागातील बराचसा लसिका प्रवाह शेवटी या भागाकडे येतो.

२ अ १. कृती : मानेखाली २ बोटांनी ५ – ७ वेळा हलका दाब द्यावा. दाब देतांना संथ आणि खोल श्वसन केल्यास अधिक लाभ होतो. (चित्र क्र. ३ पहा)

२ आ. हलक्या गोलाकार हालचाली करणे : यानंतर कानामागील आणि मानेच्या बाजूचे बिंदू सक्रीय करावेत. डोके, चेहरा आणि ‘सायनस’ भागातील लसिका या मार्गाने वाहते.

२ आ १. कृती : या भागावर हलक्या गोलाकार हालचाली ८ – १० वेळा कराव्यात. (चित्र क्र. ३ पहा)

२ इ. काखेत हलक्या पंपिंग हालचाली करणे : काखेतील लसिका बिंदू हेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. हात, छाती आणि स्तन या क्षेत्रांतील द्रव या मार्गाने निचरा होतो.

२ इ १. कृती : काखेत हलक्या ‘पंपिंग’ हालचाली ५ – १० वेळा कराव्यात. जोराचा किंवा खोल दाब देणे टाळावे. (चित्र क्र. ४ पहा)

२ ई. जांघेच्या मुळाशी हलका दाब देणे : जांघेच्या मुळाशी असलेले बिंदू पायांच्या लसिका प्रवाहासाठी महत्त्वाचे असतात.

२ ई १. कृती : या भागावर ५ – ७ वेळा हलका दाब द्यावा. संपूर्ण प्रक्रिया शांत आणि नियंत्रित श्वसनासह करावी. (चित्र क्र. ४ पहा)

२ ऊ. जांघेच्या मुळाशी असलेल्या बिंदूंवर हलक्या पंपिंग हालचाली करणे : गुडघ्याच्या मागेही काही लसिका ग्रंथी असतात; मात्र हा भाग संवेदनशील असल्यामुळे येथे दाब देतांना विशेष काळजी घ्यावी लागते. चुकीच्या पद्धतीने किंवा अधिक दाब दिल्यास वेदना होऊ शकतात. त्यामुळे सामान्यतः या भागावर दाब देणे टाळून जांघेच्या मुळाशी असलेल्या बिंदूंवर हलक्या ‘पंपिंग’ हालचाली केल्या, तरी लसिका प्रवाह सुधारण्यास पुरेसे साहाय्य होते.

ही संपूर्ण प्रक्रिया केवळ ५ मिनिटांत पूर्ण होऊ शकते. नियमितपणे या लसिका बिंदूंवर हलक्या पद्धतीने दाब दिल्यास लसिका प्रवाह सुरळीत ठेवण्यास साहाय्य होते.

३. कुणी करावे ? 

कु. वैदेही राजेंद्र शिंदे

अ. अधिक वेळ बसून काम करणारे

आ. हलकी सूज, जडपणा किंवा थकवा जाणवणारे

इ. हालचाल न्यून करणारे

ई. प्रवास अधिक करणारे

उ. वयोवृद्ध व्यक्ती (स्वतः किंवा मार्गदर्शनाखाली करू शकता.)

४. कुणी टाळावे किंवा तज्ञांच्या सल्ल्याने करावे ?

अ. ताप किंवा तीव्र संसर्ग असल्यास

आ. तीव्र वेदना किंवा अनियंत्रित सूज असल्यास

इ. कर्करोगाचा (कॅन्सरचा) उपचार चालू असल्यास

ई. रक्ताच्या गाठींचा (DVT) संशय असल्यास

उ. हृदयविकार किंवा मूत्रपिंडाच्या गंभीर समस्या असल्यास

वरील लसिका बिंदूंवर हलक्या पद्धतीने काम केल्याने स्थानिक स्तरावर लसिका प्रवाहाला चालना मिळते; पण शरिरातील लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाबाचे बिंदू पुरेसे नसतात; कारण लसिका प्रवाह हा मुख्यत्वे स्नायूंच्या हालचाली आणि श्वसन यांवर अवलंबून असतो. यासाठी नियमित आणि योग्य पद्धतीने केलेले काही सर्वसाधारण व्यायाम लसिका प्रवाह सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.’ लसिका बिंदूंवर हलक्या पद्धतीने दाब दिल्यास लसिका प्रवाह सुरळीत ठेवण्यास साहाय्य होते.’

(क्रमशः)

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२४.३.२०२६)

‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा