Racism In Australia : ऑस्ट्रेलियात काम करणार्‍या भारतीय ट्रकचालकांच्या विरोधात होत आहे वर्णद्वेष !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात काम करणार्‍या भारतीय वंशाच्या ट्रकचालकांना सतत वर्णद्वेषी शिवीगाळ आणि धमक्या यांचा सामना करावा लागत असल्याची घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर ‘क्रिएटर गी’ या खत्यावरून एक ऑडिओ प्रसारित करण्यात आला असून त्यात ऑस्ट्रेलियाचे ट्रकचालक भारतियांविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक भाषेत बोलतांना ऐकू येत आहे.

१. भारतियांना ठार मारण्याच्या धमक्या !

या ऑडिओमध्ये एका व्यक्तीने उघडपणे म्हटले की, भारतियांना मारून टाका. गोर्‍या माणसाच्या बाजूने उभे रहा. यादवी युद्ध (सिव्हिल वॉर) येणार आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना मारून टाकू, त्यांच्या मुलांना पाण्यात बुडवून मारू आणि महिलांना  गुलाम म्हणून विकू.

२. अनेक भारतीय चालकांनी सांगितले की, बिनतारी संदेश यंत्रणेवरून पंजाबी किंवा भारतीय पद्धतीने बोलल्यास त्यांना तीव्र शिवीगाळ सहन करावी लागते. एका चालकाने म्हटले, ऑस्ट्रेलियासारखे उच्चार नसतील आणि भारतीय बोलीभाषा ऐकली की, शिव्या देणे चालू होते. या सततच्या मानसिक छळामुळे अनेक भारतीय चालकांनी या यंत्रणेचा वापरच बंद केला आहे.

३. दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका पेट्रोल पंपावर पंजाबी भाषेत बोलत असलेल्या भारतीय दांपत्याला एका व्यक्तीने ‘इथे इंग्रजी बोला’ असे सांगत शिवीगाळ केली. नंतर तो भारतीय चालकाच्या अंगावर थुंकला. पीडित व्यक्तीने या घटनेला तिच्या आयुष्यातील सर्वांत अपमानजनक घटना म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी भारत सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारकडे निषेध नोंदवत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे !