Railways New Rule : रेल्वेचे अनारक्षित तिकीट ‘वॉट्सॲप’वर दाखवणे अवैध : ‘रेल वन’ ॲपमधील मूळ तिकीट दाखवणे अनिवार्य

तिकिटांची बनावट प्रत बनवून होणारी फसवणूक रोखण्यासाठी रेल्वेचा निर्णय

नवी देहली – रेल्वेने अनारक्षित तिकिटांच्या संदर्भात नवा नियम लागू केला असून त्यानुसार आता वॉट्सॲपवर आलेले तिकीट, स्क्रीनशॉट किंवा इतर माध्यमातून ‘शेअर’ (पाठवलेले किंवा आलेले) केलेले तिकीट प्रवासासाठी वैध मानले जाणार नाही. तिकीट तपासणीच्या वेळी प्रवाशांना रेल्वे विभागाच्या ‘रेल वन’ या अधिकृत ॲॅपमधील मूळ तिकीटच दाखवावे लागणार आहे. ते नसल्यास नियमानुसार दंड किंवा इतर कारवाई होऊ शकते.

याखेरीज ज्या भ्रमणभाषवरून तिकीट आरक्षित केले आहे, तोच नोंदणीकृत भ्रमणभाष प्रवासात समवेत असणे आवश्यक आहे. यासह स्वतःचे छायाचित्र असलेले वैध ओळखपत्रही जवळ ठेवावे लागणार आहे. तिकिटांची बनावट प्रत बनवून होणारी फसवणूक रोखण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.