Pakistan Terrorist List : पाकिस्तानमधील २३ व्यक्ती ‘आतंकवादी’ म्हणून घोषित

गृहमंत्रालयाची कारवाई

नवी देहली – भारताच्या गृह मंत्रालयाने पाकिस्तानमधील २३ व्यक्तींना ‘आतंकवादी’ घोषित केले आहे. ही कारवाई ‘अनलॉफूल ॲक्टिव्हिदीज प्रिव्हेंशन ॲक्ट’ (यूएपीए) अर्थात् ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यां’तर्गत करण्यात आली आहे. सरकारी आदेशानुसार हे आतंकवादी जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि इतर संघटना यांच्याशी संबंधित आहेत. या २३ जणांचा आतंकवाद्यांच्या सूचीत समावेश केल्यामुळे त्यांतील आतंकवाद्यांची एकूण संख्या ८० झाली आहे.

१. या २३ आतंकवाद्यांवर जम्मू आणि काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी लोकांची भरती करणे, घुसखोरी, प्रशिक्षण, ड्रोनद्वारे शस्त्रे पोचवणे आणि आक्रमण करण्यासाठी कट रचणे आदी आरोप आहेत.

२. या २३ आतंकवाद्यांपैकी अब्दुल रौफ, हाफीज खालिद वलीद आणि राणा इफ्तिखार यांना लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद याचे जवळचे सहकारी असल्याचे म्हटले जाते. तिघे जण वर्ष २०१६ मध्ये नगरोटा येथील भारतीय सैन्याच्या छावणीवर करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणात, तर दोघे जण वर्ष २०१८ मध्ये सुंजवान येथील सैन्य तळावरील आतंकवादी आक्रमणात सहभागी होते.

३. आतंकवाद्यांच्या सूचीत या व्यक्तींचा समावेश झाल्यामुळे राष्ट्रीय अन्वेषण संस्थेला त्यांचा निधी रोखणे, शस्त्रविक्रीवर बंदी घालणे आणि त्यांची मालमत्ता जप्त करणे आदी अधिकार मिळतील.

४. वर्ष २०१९ मध्ये आतंकवादविरोधी कायद्यातील एका दुरुस्तीद्वारे वैयक्तिक आतंकवाद्यांची सूची बनवण्याचे प्रावधान करण्यात आले होते. या दुरुस्तीपूर्वी केवळ ‘आतंकवादी संघटना’ म्हणून सूचीबद्ध केले जाऊ शकत होते.