ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

‘महासुदर्शन यागा’च्या पूर्णाहुतीच्या वेळी उपस्थित अन्य पुरोहित, पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि  श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

ईरोड (तमिळनाडू) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमधील श्रीमहाविष्णूच्या कस्तुरी रंगनाथ मंदिरात २२ ते २४ जून २०२६ या कालावधीत ३ दिवसांचा ‘महासुदर्शन याग’ भावपूर्णरित्या पार पडला. सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्रीरंगम् येथील प्रसिद्ध रंगनाथ मंदिरातून आलेल्या २१ वेदपुरोहितांनी हा महायाग केला. या महायागाच्या महापूर्णाहुतीला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित होत्या. या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी श्रीमहाविष्णूला प्रार्थना केली. कस्तुरी रंगनाथ मंदिराचे विश्वस्त श्री. सुंदरराजन् यांनी १ महिना अगोदरच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना या महायागाला उपस्थित रहाण्यासाठी प्रार्थना केली होती.

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

ईरोड शहराचे आध्यात्मिक महत्त्व

दुर्वासऋषींनी तपश्चर्या करून श्रीविष्णूला प्रार्थना केलेले स्थान, म्हणजे तमिळनाडूतील कावेरी नदीच्या काठी असलेले इरोड शहर ! महर्षि दुर्वास यांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या श्रीमहाविष्णूने त्यांना शेषशायी रूपात दर्शन दिले. त्याच ठिकाणी श्रीमहाविष्णूची शेषशायी रूपातील स्वयंभू मूर्ती आहे. या स्थानावर असलेले भव्य मंदिर, म्हणजे कस्तुरी रंगनाथ मंदिर ! या मंदिराच्या भोवती ईरोड शहर आणि ईरोड कापडपेठ वसलेले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

महायागाचे वैशिष्ट्यपूर्ण क्षण

१. या महायागाच्या वेळी एकूण १ लाख सुदर्शन महामंत्राचे पुरश्चरण करण्यात आले.

२. तमिळनाडूच्या विविध पर्वतांवर असलेल्या दैवी वनस्पतींची या महायागात आहुती देण्यात आली.

३. ‘येणार्‍या काळात विश्वावर व्याधीरूपी संकट असल्यास ते दूर व्हावे’, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

४. ‘जीवनात येणार्‍या सर्व अडथळ्यांवर मात करून विजय प्राप्त होऊ दे’, यासाठी सुदर्शचक्राची शक्ती श्री विजयवल्लीदेवीची विशेष पूजा करण्यात आली.