हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

नुकतेच एका वृत्तवाहिनीने हिंदूंच्या देवतांचे नाव मद्यालयांना न देण्याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. हे चर्चासत्र बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या सर्व समस्यांवर मूळ उपाय पूर्वीपासूनच सुचवलेला आहे आणि तो म्हणजे व्यक्तीगत स्तरावर धर्माचरण अन् साधना, तसेच समष्टीच्या स्तरावर हिंदु राष्ट्राची स्थापना. यातून गुरुदेवांची महानता आणि सर्वज्ञता लक्षात आली.

किती अन्य पंथीय त्यांच्या श्रद्धास्थानांची अशी विटंबना करतात ? आपण जर चिंतन केले, तर असे लक्षात येते की, हिंदूंना धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्माभिमान नाही आणि त्यामुळे अनेक समस्या हिंदूंना भेडसावत आहे. काळाप्रमाणे हिंदु जागृत होऊन त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत; पण त्याला अपेक्षित असे यश मिळत नाही. याचे कारण असे की, अन्य स्तरावर प्रयत्न करण्यासह त्या समस्येच्या मुळाशी उपाय करणे पुष्कळ आवश्यक आहे.

डॉ. मनोज सोलंकी

हे चर्चासत्र ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आले की, अन्य पंथांचे लोक त्यांच्या देवतांचे नाव मद्यालय किंवा मांस व्यवसायाला देत नाहीत; कारण त्यांच्यामध्ये धर्मशिक्षणामुळे धर्माप्रती अभिमान आहे आणि तसे करणे, हे त्यांना विडंबन अन् पाप वाटते. हिंदूंविषयी मात्र उलट आहे. ते देवतांची नावे मद्यालय किंवा मांस विकणार्‍या दुकानाला देतात अन् पुढे जाऊन ते स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवतात, तसेच चर्चासत्रामध्ये जाऊन स्वतःचे अज्ञान प्रकट करून हिंदूंची दिशाभूल करतात. आज बहुतांश हिंदु जन्महिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देवतांचे विडंबन रोखण्यासाठी अपेक्षा करू शकत नाही.

आपल्याला जर हे कायमस्वरूपी रोखायचे असेल, तर हिंदूंचे प्रबोधन करणे, शासकीय स्तरावर देवतांचे विडंबन रोखण्यासाठी कायदा करण्याविषयी निवेदन देणे आवश्यक आहे. यासह हिंदूंना धर्माचरण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करून त्यांना कर्महिंदू बनवणे आवश्यक आहे, तसेच समाजव्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे.

– डॉ. मनोज सोलंकी, मडगाव, गोवा.

संपादकीय भूमिका

धर्महानी रोखण्यासाठी हिंदूंना धर्माचरण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करून त्यांना कर्महिंदू बनवणे आवश्यक !