छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक

८ गावठी कट्टे, १४ काडतुसे जप्त !

छत्रपती संभाजीनगर – ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त करत १० मुख्य आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ गावठी कट्टे (पिस्तूल) आणि १४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेश उघडे, अजय उपाख्य रोमन शिंदे, राष्ट्रपाल तुपे, आकाश इंगळे, संतोष गायकवाड, निशांत पन्हाळे, किशोर जाधव, आकाश निकम, लखन राठोड आणि आबासाहेब मिसाळ यांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सर्वांत आधी बिडकीन परिसरातून गणेश उघडे याला कह्यात घेतले. त्याच्याकडे १ गावठी कट्टा आणि ५ जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत गणेशने केवळ शस्त्र बाळगले नसून तो एका मोठ्या आंतरजिल्हा ‘डीलर’शी (अवैध हत्यारांचा मुख्य विक्रेता) जोडलेला असल्याचे समोर आले. (या प्रकरणातील सूत्रधारांचाही शोध घ्यायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अवैध शस्त्रांची तस्करी म्हणजे कायदा-सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटाच होय !