पर्यावरणपूरक चिकणमातीच्या मूर्तींनाच प्राधान्य देणार

पेडणे, २८ जून (वार्ता.) – गोव्यात पर्यावरणाचे रक्षण करणे आणि हरित गणेशोत्सवाला चालना देणे, यांसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींचे उत्पादन अन् विक्री करणार्यांवर यंदा कठोरतेने कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार उमाकांत पोके यांच्या नेतृत्वाखाली चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्या पेडणे तालुक्यातील मूर्तीकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ‘हस्तकला लघुउद्योग विकास महामंडळा’चे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. हे निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचे रक्षण करण्याला सरकार प्राधान्य देते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे पाणी प्रदूषित होते. यामुळे कायद्यानुसार अशा श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणपूरक मातीच्या श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करणार आहे. संबंधित खात्याला आवश्यक सूचना दिल्या आहेत आणि नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’’
चिकणमातीपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्या कलाकारांनी निवेदनात केलेल्या मागण्या
१. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती सिद्ध करावी.
२. सर्व ग्रामपंचायतींकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांची माहिती घ्यावी.
३. मूर्तीकार श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी वापरत असलेल्या वस्तूंची पडताळणी करावी.
४. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा साठा आणि विक्री यांची सातत्याने पडताळणी करावी. एखाद्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती सापडल्यास ती कह्यात घेऊन संबंधित मूर्तीचा निर्माता आणि विक्रेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
५. केवळ पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीं विकण्यास अनुमती द्यावी.
६. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी लोकजागृती मोहीम हाती घ्यावी.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गोव्यात लोकचळवळ उभारण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मूर्तीकारांना दिले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !