तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण

ठाणे, २८ जून (वार्ता.) – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना २८ जूनला भिवंडी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बचाव पक्षाचे अधिवक्ता शैलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली.

कोनगाव पोलिसांनी सापळा रचून बिहारमधील राजू शाव (वय ४५ वर्षे), आकाश कुमार (वय ३० वर्षे) आणि हरियाणातील धीरज सिंग (वय २८ वर्षे) यांना अटक केली होती. आरोपींकडून दीड कोटी रुपयांना विक्रीसाठी आणलेले ४ प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले आहेत. अटकेनंतर तिघांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. अन्वेषणासाठी पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने ती संमत केली. या कोठडीत आरोपींकडून प्रश्नपत्रिका फुटीमागील मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि या टोळीमधील अन्य संबंधित यांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.