‘२९.६.२०२६ (ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा)) या दिवशी चि. सुमिरा सचिन सहारे हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. चि. सुमिरा हिची तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. सुमिरा सचिन सहारे हिला तिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी
अ. ‘आमच्या लग्नाच्या वेळी जाणवलेली भावसूत्रे मी संतांना आत्मनिवेदन स्वरूपात लिहून पाठवली होती. त्याबद्दल त्यांनी आशीर्वाद स्वरूपात प्रसाद पाठवला होता. त्या वेळी देवीचे नवरात्र चालू होते. ‘त्या प्रसादातील चैतन्यामुळेच माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली’, असे मला वाटत होते. नवरात्र संपल्यावर काही दिवसांतच ‘मी आई होणार आहे’, असे मला आतून जाणवू लागले. आधुनिक वैद्यांनी काही तपासण्या केल्यावर मला गर्भधारणा झाल्याचे समजले. तेव्हा मला कृतज्ञता वाटत होती.
आ. मी कार्यालयात दुचाकी गाडीवरून जात असतांना नामजप करत होते. त्या वेळी ‘नामजपातील चैतन्याचे संरक्षककवच गर्भाभोवती निर्माण झाले आहे’, असा भाव मी ठेवत होते.
इ. जानेवारी २०२२ मध्ये गर्भारपणाच्या चवथ्या मासात मला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा मी नामजपादी उपाय करण्यासह देवाला आणि गुरुदेवांना शरण जात होते. मी त्यांना ‘मला आणि बाळाला तुम्हीच सांभाळा’, अशी प्रार्थना करत होते. मी त्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.
ई. १४.६.२०२२ या दिवशी सकाळी ६ वाजता मला जाग आल्यावर गर्भाची हालचाल नेहमीप्रमाणे होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आपण आता जास्त दिवस वाट पाहू शकत नाही. तुमचे लगेच सिझेरियन करावेच लागेल.’’ आधुनिक वैद्यांनी परिचारिकेला सांगून पुढील प्रक्रिया चालू केली. तेव्हा माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘आता तुम्हीच सगळे सांभाळून घ्या.’ तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘प.पू. गुरुदेव एका आसंदीत बसले आहेत. ते माझ्यासाठी नामजपादी उपाय करत आहेत.’ तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेव, मी तुमच्या कृपाछत्राखाली आले आहे. तुम्हीच मला आणि बाळाला सांभाळून घ्या.’ त्या क्षणी मला माझ्या अस्तित्वाची जाणीव राहिली नाही. माझा ‘जय गुरुदेव’ हा नामजप होऊ लागला.
२. जन्म ते १ वर्ष

अ. सकाळी सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७४ वर्षे) ‘ऑनलाईन’ सत्संग घेत असत. सुमिरा प्रतिदिन सकाळी सद्गुरु जाधवकाकांचा सत्संग शांतपणे ऐकत होती.
आ. सुमिराचा जन्म झाल्यापासून माझ्यामधील ‘ताण घेणे, अती विचार करणे’, हे स्वभावदोष न्यून झाले आहेत. माझी क्षात्रवृत्ती वाढली आहे. माझ्यात शरणागतभाव वाढला आहे. ‘प.पू. गुरुदेव सतत सुमिराच्या समवेत असतात. माझ्या प्रत्येक कृतीकडे गुरुदेवांचे लक्ष आहे’, ही माझी श्रद्धा दृढ झाली आहे.
इ. सुमिरा २१ दिवसांची असतांना तिच्या चेहर्यावर पुरळ उठले होते. मी दुसर्या दिवशी तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेले. मी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७६ वर्षे) यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केले. नंतर ६ दिवसांनी सुमिराच्या चेहर्यावर आलेले पुरळ पूर्णपणे नाहीसे झाले. तिचे लसीकरण झाल्यावरही ती शांत होती.’
– सौ. सिद्धी सचिन सहारे (चि. सुमिराची आई), नागपूर
२ ई. तिच्या पलंगाजवळच्या भिंतीवर सनातन निर्मित गणपतीचे चित्र आहे. ‘सुमिरा त्या चित्राकडे पाहून गणपतीला पुष्कळ वेळ काहीतरी सांगत आहे’, असे जाणवायचे.
२ उ. सात्त्विकतेची आवड : सुमिराला भजनाचा आणि आरतीचा ठेका पुष्कळ आवडतो. अाम्ही भ्रमणभाषवर भजने किंवा आरती लावल्यावर ती गुडघ्यावर बसून टाळ्या वाजवते.
२ ऊ. लाघवी : आम्ही सुमिराला घेऊन ज्या ठिकाणी जातो, तेथील व्यक्ती सुमिराशी बोलतात आणि तिचे लाड करतात. सुमिरा हसत हसत अनोळखी व्यक्तीकडेही जाते.’
– श्री. सचिन सहारे आणि सौ. सिद्धी सचिन सहारे (चि. सुमिराचे वडील आणि आई)
२ ए. जवळीक साधणे : ‘सुमिरा ६ मासांची असतांना वर्धा येथे आईच्या समवेत आली होती. एकदा घरी पुष्कळ पाहुणे आले होते. तेव्हा सुमिरा सगळ्यांकडे जात होती.’ – सौ. स्मिता संजीव हरदास (चि. सुमिराची आजी), वर्धा
२ ऐ. देवाची ओढ : ‘सुमिरा ३ मासांची असल्यापासूनच देवतांची चित्रे ओळखते. ती नामपट्टीवरील श्रीराम आणि मारुति यांचे चित्र पाहून हात उंचावून ‘जय’ असे म्हणते. तिच्या घराजवळच्या एका घराच्या मुख्य दारावर मारुतीचे चित्र आहे. सुमिरा त्याकडे पाहूनही ‘जय’ असे म्हणते. ती आमच्या घरी आल्यावर प्रथम श्रीकृष्णाच्या चित्रातील त्याच्या चरणांना स्पर्श करते. ती आमच्या देवघराच्या दारात बसून टाळ्या वाजवून ‘आरती करायची’, असे सांगते.
२ ओ. ‘सुमिरा तिच्या जन्मापासूनच गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ओळखते’, असे वाटते. ती रडत असतांना आम्ही ‘जय गुरुदेव’, असे म्हटल्यावर ती शांत होते. तेव्हा तिच्या चेहर्यावर आनंद जाणवतो.’ – सौ. प्रांजली विजय ब्रह्मे (सुमिराची मावशी), नागपूर
२ औ. समाजातील व्यक्तींना सुमिराचे वेगळेपण जाणवणे
१. ‘सुमिरा ६ मासांची असतांना आम्ही तिला दत्तजयंतीच्या दिवशी दत्तमंदिरात दर्शनासाठी नेल्यावर तेथील पुजार्यांनी सुमिराला दत्तमूर्तीच्या चरणांशी ठेवले.
२. आम्ही फाल्गुन पंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तेथील पुजार्यांनी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीला घातलेली साखरेच्या गाठीची माळ सुमिराच्या गळ्यात घातली.
३. एकदा आम्ही माहुर येथे श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही रांगेत उभे असतांना एक आजोबा आमच्या जवळ आले. त्यांनी पूजेच्या ताटातील पेढा मला दिला आणि ते म्हणाले, ‘‘हिला हा पेढा भरवा. मला हिच्या रूपात देवीच भेटली.’’
४. एकदा आम्ही नागपूर येथील श्री टेकडी गणपति मंदिरात गेलो होतो. तेव्हा २ महिलांनी सुमिराला प्रसाद आणि दक्षिणा दिली. त्या महिला म्हणाल्या, ‘‘ही बालरूपातील लक्ष्मीदेवी दिसते.’’
– श्री. सचिन सहारे आणि सौ. सिद्धी सचिन सहारे
२ अं. स्वावलंबी : ‘सुमिरा ७ मासांची असल्यापासून रुमालाने तोंड पुसायला शिकली.
२ क. स्वच्छतेची आवड : तिला कापड दिसले की, ती दार, खिडकी, भिंत आणि लादी पुसते.’
– सौ. प्रांजली विजय ब्रह्मे
३. वय – १ ते ४ वर्षे
३ अ. ‘चि. सुमिराची स्मरणशक्ती चांगली आहे.
३ आ. देवाची ओढ : सुमिराला मंदिरात जायला आवडते. ती अधूनमधून देवघरातील देवतांच्या चित्रांसमोर उभी राहून देवतांशी बोलत असते. ती खेळत असतांना ‘प्रसाद हा मज द्यावा देवा’ आणि ‘शांत हो श्री गुरुदत्ता’ हे भजन गुणगुणत असते. तिला श्रीराम, श्रीकृष्ण आणि हनुमान यांच्या संदर्भातील कथा ऐकायला आवडतात.
३ इ. ती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गोष्ट ऐकत झोपते.
३ ई. आम्ही तिला समवेत घेऊन सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कुठल्याही कार्यक्रमात गेल्यास ती शांतपणे एकटी खेळत असते.
३ उ. समंजस
१. मी नोकरी करत असल्याने सुमिरा दिवसभर तिच्या मावशीकडे असते. ‘मावशी भ्रमणभाषवर सेवा करते’, हे सुमिराला ठाऊक आहे. एकदा तिला दूध हवे होते. तेव्हा सुमिराने तिच्या मावसबहिणीला सांगितले, ‘‘तू मला दूध दे. मावशी सेवा करत आहे.’’
२. आम्ही तिला शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन गेलो होतो. तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, ‘‘असे दोन वेण्या घातलेले आणि कपाळाला कुंकू लावलेले बाळ पुष्कळ दिवसांनी पाहिले.’’
३ ऊ. देव, संत आणि सनातनचे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती भाव
१. ती पू. भार्गवराम प्रभु (सनातनचे पहिले बालसंत, वय ९ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ७ वर्षे) यांच्या संदर्भातील ग्रंथ बराच वेळ पहात असते.
२. आम्ही प.पू. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहाण्यासाठी सुमिराला समवेत नेले होते. तेव्हा सोहळा चालू झाल्यावर सुमिरा डोळ्याची पापणी न हलवता एकटक पहात होती. तेव्हा गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ती सांगायची, ‘‘आई, गुरुदेव आहेत.’’ गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ती त्यांना नमस्कार करत होती.
३. ती प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. पात्रीकरकाका यांना ओळखते. तिला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून पुष्कळ आनंद होतो. ती सांगते, ‘‘गुरुदेव किती छान हसतात.’’ कुठेही चरणांचे छायाचित्र दिसल्यास ती म्हणते, ‘‘गुरुदेवांचे चरण आहेत.’’ ती त्या चित्राला नमस्कार करते आणि ‘हाताने फुले वहात आहे’, अशी कृती करते.
४. तिला भीती वाटत असल्यास ती ‘‘श्रीकृष्ण, बलराम ये’’, असे म्हणते.
५. तिला काही लागल्यास ती श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना सांगते, ‘मला लवकर बरी करा.’
६. ती औषध घेतांना नेहमी ‘अच्युतानंद गोविंद’ हा मंत्र म्हणते.
७. सुमिरा प्रतिदिन ‘गुरुदेवा, मला तुमच्या चरणांशी ठेवा. मला शक्ती आणि बुद्धी द्या. माझ्याकडून नामजप आणि साधना करून घ्या. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव !’’, अशी प्रार्थना करते.
४. स्वभावदोष
भ्रमणभाष पहाण्यासाठी हट्ट करणे
– श्री. सचिन सहारे आणि सौ. सिद्धी सचिन सहारे (१३.५.२०२६)
ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना अंतर्मुख करणार्या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (वय ५७ वर्षे) !
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे झालेला अद्वितीय लाभ !