कवळे येथील शांकर पाठशाळेत ‘श्रीमद् भागवत महापुराण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद !

कवळे (फोंडा), २८ जून (वार्ता.) – गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ संचालित शास्त्र पाठशाळा आणि संस्कृत केंद्र (कवळे), ‘ग्लोबल संस्कृत फोरम’ आणि ‘ग्लोबल विदुषी समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीमद् भागवत महापुराण समग्र चिंतन’ या विषयावर १ दिवसाचे आंतरराष्ट्रीय संगोष्टीचे (परिषदेचे) आयोजन करण्यात आले होते. या सत्राचे प्रास्ताविक सौ. अनघा महेश कापडी यांनी केले. प्रास्ताविक करतांना त्यांनी वर्ष १९१९ पासून कार्यरत असलेल्या या शांकर पाठशाळेच्या गौरवशाली इतिहासाचा आणि वैदिक संस्कृती रक्षणातील योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ वैदिक परंपरेनुसार श्लोक पठण आणि मान्यवरांच्या स्वागताने, तसेच दीपप्रज्वलनाने झाला.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राला देश-विदेशातील अनेक विद्वान, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष (ऑफलाईन), तसेच ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून उपस्थित असलेले गोवा विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. चिन्मय मधु घैसास यांनी भारतीय ज्ञानप्रणाली आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालणारे विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘संशोधनाचा खरा अर्थ ‘पुन्हा शोधणे’ (रिसर्च – Re-search) असा आहे. संशोधकांनी नेहमी नव्या विचारांचा स्वीकार करण्यासाठी त्यांचे मन मोकळे ठेवले पाहिजे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मिळवलेले हळदीचे पेटंट हे आपल्या प्राचीन ज्ञानाचे यश आहे. हनुमानचालिसामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांमधील अंतराचा अन् ‘अगस्त्य संहिते’त रसायनशास्त्राचा अचूक संदर्भ मिळतो. जग अंधारात असतांना आपण पृथ्वीला ‘भूगोल’ म्हणून संबोधत होतो.

पोर्तुगिजांनी भारतात मिरची आणली’, असा इतिहास सांगितला जातो; परंतु १२ व्या शतकात संत चोखामेळा यांच्या अभंगात ‘लसूण, मिरची, कोथिंबिरी…’, असा उल्लेख आढळतो. यावरून भारतात पोर्तुगिजांपूर्वीच मिरची अस्तित्वात असल्याचे सिद्ध होते. भारतातील प्राचीन मंदिरे आणि वास्तू आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही आव्हान देणार्‍या आहेत. संतांचे वाङ्मय केवळ अध्यात्म नसून त्यात सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन दडलेला आहे. आपले पूर्वज वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होते. काळाच्या ओघात आपण जे ज्ञान गमावले आहे, ते शोधण्यासाठी प्राचीन ग्रंथांच्या ओळींच्या पलीकडे जाऊन सखोल संशोधन करणे ही आजची आवश्यकता आहे.’’