आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

माजी पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत कुमार दत्ता

नवी देहली – उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीशी संबंधित ‘मनी लॉन्ड्रिंग’ (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आसाम पोलिसांचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत कुमार दत्ता यांची ५३ कोटी २८ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्या आली. यामध्ये गौहत्तीमधील ४ हॉटेल्स, तसेच मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील ‘समर्थ दीप’मधील २ सदनिका यांचा समावेश आहे. दत्ता हे वर्ष २०१९ मध्ये आसाम पोलीसदलातून उपमहानिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. दत्ता यांनी १९९२ ते २०१९ या त्यांच्या सेवाकाळात ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती जमवली, असा आरोप आहे. ‘ईडी’च्या माहितीनुसार दत्ता आणि त्यांची पत्नी यांचे एकूण घोषित उत्पन्न ७ कोटी २३ लाख रुपये होते, तर खर्च ९ कोटी ४ लाख रुपये होता. असे असूनही त्यांच्याकडे ७९ कोटी रुपयांची संपत्ती आढळली.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या सेवाकाळात कसे काम केले असेल ?, हे वेगळे सांगायला नको. पोलीसदलाला हे लज्जास्पद !