Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानाची चोरी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून पोलीस अन्वेषण करत आहेत. या ८ आरोपींपैकी ५ आरोपी हे एकमेकांच्या अतिशय जवळ रहातात किंवा ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांची घरे एकमेकांपासून अवघ्या १०० ते २०० मीटरच्या अंतरावर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते का ? आणि ही चोरी विचारपूर्वक एखाद्या कटाचा भाग म्हणून करण्यात आली होती का ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.

१. अरोपी लवकुश मिश्रा याच्या घराच्या अगदी मागे आरोपी अविनाश शुक्ला याचे घर आहे. म्हणजेच दोघांची घरे एकमेकांपासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर आहेत.

२. आरोपी अनुकल्प मिश्रा याचे घरही येथून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे अनुकल्प मिश्रा याने हे घर साधारण २ वर्षांपूर्वी विकत घेतले होते. ही तिन्ही घरे कौशलपुरी कॉलनीमध्ये आहेत.

३. एवढेच नाही, तर या प्रकरणातील आरोपी मनीष यादव आणि टिन्नू यादव यांची घरेही एकमेकांना लागून आहेत.

४. यातून हा संशय अधिक बळावतो की, चोरीची घटना अचानक घडलेली नव्हती, तर आधीपासूनच नियोजन करून केलेली चोरी असू शकते. या ५ आरोपींमध्ये आधीपासून काही संभाषण होत होते का ? ते एखाद्या विशिष्ट गटाचा भाग होते का ? आणि मंदिरामधील दानाची रक्कम चोरी करण्याची ही पद्धतही त्यांनी मिळून ठरवली होती का ? या दृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत.

५. पूर्ण कटाचे चित्र स्पष्ट व्हावे, यासाठी पोलीस आता त्यांचे भ्रमणभाष ठिकाण (लोकेशन), एकमेकांमधील संभाषण आणि जुने संबंध यांचीही चौकशी करत आहेत.