गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला ! 

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.  (लेखांक २१)    

‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’ची प्रक्रिया राबवल्याने आध्यात्मिक लाभासह कलाकाराची आध्यात्मिक उन्नती कशी होऊ शकते ?’, हे आपण मागील लेखात पाहिले. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेचे आणखी एक अंग, म्हणजे ‘सत्संग’ ! या महत्त्वाच्या अंगाविषयी आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

आज काळानुसार रज-तमयुक्त वातावरणामुळे ‘मी माझी साधना एकटा करू शकेन’, अशी समाजाची स्थिती नाही. मनुष्याचा / कलाकाराचा एकट्याचा सत्त्वगुण बाह्य रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यास सक्षम नाही. त्यामुळे रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यासाठी आणि साधनेसाठी कला-उपासकाला आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता निश्चितच आहे. ती त्याला सत्संगाच्या माध्यमातून मिळू शकते. सत्संग हा घटक कला-उपासकाच्या साधनेत एका ‘टॉनिक’चे (बलवर्धकाचे) कार्य करतो. जसे ‘टॉनिक’ व्यक्तीमधील जीवनसत्त्वांची न्यूनता असलेल्या घटकांचे पोषण करण्याचे कार्य करून त्यांचे बलवर्धन करते, तसेच ‘सत्संग’ हा कला-उपासकाच्या साधनेतील न्यूनता भरून काढण्याचे आणि त्याची साधनेत प्रगती होण्यासाठी पोषक वातावरण मिळवून देण्याचे कार्य करतो.

‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील एक अंग म्हणजे ‘सत्संग’ ! या लेखाच्या १८ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘सत्संग म्हणजे काय ? साधक-कलाकार विविध माध्यमांतून सत्संग कसा मिळवू शकतो ?’, यांचे विवेचन जाणून घेतले. लेखाच्या आजच्या भागात आपण सत्संगामुळे साधक-कलाकाराला त्याच्या साधनेत होणारे लाभ जाणून घेणार आहोत.      

(भाग २)   

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1052155.html

१. साधक-कलाकाराला सत्संगाचे होणारे विविध लाभ !

१ अ. वृत्ती सात्त्विक होणे : सत्संगातील दैवी वातावरणामुळे साधक-कलाकारातील रज-तम स्पंदने न्यून होऊन त्याची वृत्ती सात्त्विक होते. त्यामुळे साधक-कलाकारामध्ये दैवी गुणांचा विकास होऊ लागतो, उदा. साधनेची गोडी लागणे, तसेच चिकाटी, सातत्य, सकारात्मकता, तळमळ इत्यादी गुण वाढणे. कलाकाराची सात्त्विकता वाढल्यावर त्याच्या कलेवरही त्याच्या सात्त्विकतेचा परिणाम दिसून येतो.

श्री. जयवंत रसाळ

१ आ. आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होणे आणि ईश्वरावरील श्रद्धा वाढणे : सत्संगामध्ये ईश्वर, अध्यात्म आणि साधना यांविषयी चर्चा होते. त्यामुळे साधक-कलाकाराचे आध्यात्मिक दृष्टीकोन प्रगल्भ होतात. सत्संगात साधक-कलाकार ईश्वरी शक्तीविषयी समजून घेऊ लागतो. त्यामुळे त्याच्या जीवनात घडणार्‍या घटनांकडे पहाण्याचा त्याचा दृष्टीकोन आध्यात्मिक आणि सकारात्मक होऊ लागतो. जीवनात दुःख किंवा अपयश आल्यास ‘हे माझ्या प्रारब्धामुळे घडले’, हे त्याला स्वीकारता येते, तसेच यश मिळाल्यास अथवा ईश्वराची अनुभूती आल्यास हे ‘देवाच्या कृपेमुळे झाले’, हे त्याला समजू लागते. त्यामुळे साधक-कलाकाराची ईश्वरावरील श्रद्धा वाढते.

१ इ. साधनेविषयी मार्गदर्शन मिळून अध्यात्माचा पाया भक्कम होणे : ज्याप्रमाणे आपण संगीताच्या पुढच्या पुढच्या ज्ञानासाठी गुरूंकडे जातो आणि त्यांच्याकडून शिकतो, त्याचप्रमाणे अध्यात्मात पुढे जाण्यासाठी आपल्याला कुणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सत्संगाच्या माध्यमातून साधक-कलाकाराला ‘त्याने साधनेचे कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी, तसेच साधनेच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे साधक-कलाकाराचा अध्यात्माचा पाया भक्कम होऊन तो कलेच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करू शकतो.

१ ई. सत्संगातील सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ होणे : समाजातील अन्य व्यक्तींच्या तुलनेत सत्संगात येणार्‍यांमध्ये सत्त्वगुण अधिक असतो. सत्त्वगुण अधिक असणार्‍या व्यक्ती एकत्र आल्यामुळे सरासरी सामूहिक सत्त्वगुण वाढून वातावरण अधिक सात्त्विक होते. त्या वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ साधक-कलाकाराला होतो. सत्संगामध्ये ईश्वराविषयी चर्चा केली जाते. जेथे ईश्वराचे गुणगान केले जाते, तेथे ईश्वराचे सूक्ष्म रूपाने अस्तित्व असते. त्यामुळे साधक-कलाकाराला सत्संगाचा चैतन्याच्या स्तरावरही लाभ होतो.

१ उ. ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाचे सतत स्मरण रहाणे : कलाकाराला सत्संग लाभत गेल्याने त्याच्या मनावरील साधनेचे संस्कार दृढ होत जातात. साधनेचे हे विचार त्याच्या साधनेसाठी प्रेरणादायक ठरतात. सत्संगामुळे ‘कला हे ईश्वरप्राप्ती करण्याचे एक माध्यम आहे’, हे साधक-कलाकारावर बिंबून तो ईश्वरप्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होतो आणि त्याला ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाचे सतत स्मरण रहाते.

१ ऊ. साधनेचे प्रायोगिक प्रयत्न शिकता येणे : ‘सत्संगात सहभागी अन्य कला-उपासक साधनेचे प्रयत्न कसे करतात ? त्यांना साधना करतांना कोणत्या अडचणी येतात ? त्या अडचणींवर ते कोणते उपाय करतात ?’ इत्यादी सत्संगामध्ये शिकायला मिळते. थोडक्यात पाहिल्यास साधनेचे प्रायोगिक प्रयत्न शिकण्यासाठी सत्संगासारखे दुसरे माध्यम नाही.

१ ए. सत्संगामध्ये आपण जे प्रयत्न किंवा अनुभूती सांगतो, त्याची आध्यात्मिक कारणमीमांसा आपल्याला सत्संगामुळे कळते. त्यामुळे श्रद्धा वाढायला साहाय्य होते.

१ ऐ. वृत्ती व्यापक होणे : ‘सत्संगाला येणारे इतर सहसाधक आपलेच आहेत’, असा भाव निर्माण होतो. त्यातूनच पुढे ‘अवघे विश्वची माझे घर’, असा भाव निर्माण होऊन साधक-कलाकाराची वृत्ती समष्टी साधनेला पूरक अशी, म्हणजे व्यापक होते.

१ ओ. शंकानिरसन होऊन साधनेच्या प्रयत्नांना गती मिळणे : कलाकाराच्या मनात साधनेविषयी काही शंका किंवा प्रश्न असतील, तर सत्संगामध्ये त्यांची उत्तरे मिळू शकतात. साधनेिवषयी विकल्प निर्माण झाला असेल, तर सत्संगात गेल्यामुळे तो नाहीसा होण्यास साहाय्य होते. सत्संगामुळे साधनेच्या प्रयत्नांना दिशा मिळून साधनेला गतीही मिळते.

१ औ. ‘ईश्वरप्राप्ती’ या अंतिम ध्येयापर्यंतच्या वाटचालीसाठीचा ऊजास्रोत म्हणजे सत्संग ! : कलेतून ईश्वराची अनुभूती घ्यायची असल्यास ‘एकाग्रता अन् एकरूपता’, हे दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण गुण आवश्यक आहेत. संगीत-उपासकाला सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अल्पावधीत एकाग्रता साध्य होऊ शकते. ‘कलेतून साधना करतांना कलेतील ईश्वराशी एकरूप होऊन त्याचा दिव्य संग अनुभवणे’, हा खरा कलाकारासाठी अत्युच्च स्तरावरील ईश्वरी सत्संग आहे. ही उच्चतम आनंदावस्था असते. हा ईश्वरी सत्संग लाभल्यावर माया किंवा अन्य विषय यांत सुख न वाटता कलेत केवळ ईश्वराला अनुभवता येऊ लागते.

२. संत कबीर यांनी वर्णिलेले सत्संगाचे महत्त्व !

कबिरा संगत साधु की, ज्यों गंधी की बास ।
जो कुछ गंधी दे नहीं, तो भी बास सुवास ।।
– संत कबीरदास रचित कबीर वचनावली

अर्थ : संतांचा सहवास अथवा सत्संग जणू अत्तर विक्रेत्याच्या सहवासाप्रमाणे आहे. तो आपल्याला काही देत जरी नसला, तरी त्याच्या अत्तराचा सुगंध आपल्याला लाभतच असतो.

३. संगीताविषयीच्या चर्चा, बैठका आणि कार्यक्रम यांतून ‘कला-साधने’विषयीच्या चर्चा होणे आवश्यक असणे

पूर्वी संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, यांसारखे अनेक संत कीर्तनाद्वारे, तसेच भजने आणि अभंग गाऊन भगवंताच्या गुणांचे वर्णन करत. कलेला माध्यम बनवून त्यांनी ईश्वराचा साक्षात्कार अनुभवला. हा त्यांच्यासाठी आणि कीर्तनाला उपस्थित सर्वांसाठी एक दिव्य सत्संगच असे. आज अनेक ठिकाणी ‘संगीताविषयीच्या चर्चा, बैठका, कार्यक्रम इत्यादी होतात; परंतु यात ‘संगीत कलेला माध्यम बनवून ईश्वरप्राप्ती कशी करायची ? किंवा भारतीय कलांमधील दैवीपण कसे अनुभवायचे ?’, याविषयी कुठे बोलले जात नाही. यांमध्ये केवळ कलेविषयीच्या तात्त्विक भागावरच चर्चा होतांना दिसून येते. अशा बैठका, शिबिरे यांच्या माध्यमातून ‘कला-साधने’विषयी चर्चा होणे आवश्यक आहे. यामुळे कला-उपासकाला सत्संग मिळून त्याला कलेकडे साधना म्हणून पहाण्याची प्रेरणा मिळेल.

४. सारांश

‘सत्संगाचे अद्वितीयत्व आणि अनन्यसाधारण महत्त्व’, यांविषयी अनेक भारतीय संतांनी लिखाण केले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘सत्संगा’चे एक विशेष स्थान आहे. ‘सत्संग’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या गुरुकृपायोगाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. हे अंग कलाकाराच्याच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीगत साधनेसहित समष्टी साधनेची बिजे रोवते. सत्संगामुळे दैवी आणि उच्च स्तरावरील आनंद मिळतो. कला-उपासकाला असा सत्संग लाभल्यास आणि सत्संगात सांगितल्याप्रमाणे त्याने प्रयत्न केल्यास त्याची आध्यात्मिक उन्नती दूर नाही. सत्संगाचे महत्त्व सांगून आपल्यामध्ये साधनेची बिजे रोवणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी मी हा लेख कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.’

(समाप्त)

– श्री. जयवंत रसाळ (संगीत विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१०.६.२०२६)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. मनोज सहस्रबुद्धे

संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८

ई-मेल : [email protected]