‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. (लेखांक २१)
‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’ची प्रक्रिया राबवल्याने आध्यात्मिक लाभासह कलाकाराची आध्यात्मिक उन्नती कशी होऊ शकते ?’, हे आपण मागील लेखात पाहिले. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेचे आणखी एक अंग, म्हणजे ‘सत्संग’ ! या महत्त्वाच्या अंगाविषयी आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
आज काळानुसार रज-तमयुक्त वातावरणामुळे ‘मी माझी साधना एकटा करू शकेन’, अशी समाजाची स्थिती नाही. मनुष्याचा / कलाकाराचा एकट्याचा सत्त्वगुण बाह्य रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यास सक्षम नाही. त्यामुळे रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यासाठी आणि साधनेसाठी कला-उपासकाला आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता निश्चितच आहे. ती त्याला सत्संगाच्या माध्यमातून मिळू शकते. सत्संग हा घटक कला-उपासकाच्या साधनेत एका ‘टॉनिक’चे (बलवर्धकाचे) कार्य करतो. जसे ‘टॉनिक’ व्यक्तीमधील जीवनसत्त्वांची न्यूनता असलेल्या घटकांचे पोषण करण्याचे कार्य करून त्यांचे बलवर्धन करते, तसेच ‘सत्संग’ हा कला-उपासकाच्या साधनेतील न्यूनता भरून काढण्याचे आणि त्याची साधनेत प्रगती होण्यासाठी पोषक वातावरण मिळवून देण्याचे कार्य करतो.
आजच्या लेखात आपण ‘सत्संग म्हणजे काय ? कला-उपासकाला सत्संग कसा मिळवता येईल ?’, याविषयीचे तात्त्विक विवेचन पहाणार आहोत. (भाग १)

१. सत्संग म्हणजे काय ?
‘सत्संग’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘सत् + संग’, अशी आहे. सत्संग म्हणजे सत्चा संग ! ‘सत्’ म्हणजे ‘ईश्वर’ आणि ‘संग’ म्हणजे ‘सहवास’. आपल्याला प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास मिळणे अशक्य आहे; म्हणून ईश्वराचे सगुण रूप असणार्या संतांचा सहवास हा सर्वश्रेष्ठ सत्संग असतो. प्रत्येक वेळी आपल्याला संतांचा सत्संग लाभेलच, असे नसते; मात्र जे साधना करणारे साधक आहेत, त्यांचाही सत्संग महत्त्वाचा असतो. सत्संग म्हणजे ईश्वर, अध्यात्म आणि साधना यांसंबंधीची सात्त्विक चर्चा ! सत्संग म्हणजे ईश्वराच्या अनुभूतीच्या दृष्टीने अनुकूल असे वातावरण ! सत्संग म्हणजे साधनेला पोषक असे वातावरण !
२. आजच्या काळातील सत्संगाची आवश्यकता !
मनुष्याचे आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. बाह्य जगतात अनेक प्रलोभने आणि मायेचे आकर्षण वाढवणार्या गोष्टी आहेत. या सर्वांमुळे मनुष्य मायेकडे खेचला जातो. सद्यःस्थिती पहाता मनुष्याची वृत्ती बहिर्मुख झालेली असून ती स्वभावदोष आणि अहंकार या वृत्तीला कारक झाली आहे. अशा प्रसंगी अंतर्मुख होण्यासाठी मनुष्याला (साधक-कलाकाराला) सत्संगाची नितांत आवश्यकता आहे. सत्संगाचे वातावरण साधनेला पोषक असल्याने या माध्यमातून साधक-कलाकाराला वृत्ती अंतर्मुख करणे सहज सोपे जाते, तसेच त्याची बहिर्मुखतेने पहाण्याची दृष्टी न्यून होऊन तो कलेतूनही ईश्वराभिमुख होऊ शकतो.
३. कला-उपासकाला सत्संग मिळवून देणारी विविध माध्यमे !

सत्संग म्हणजे ‘सत्’चा संग ! हा संग विविध माध्यमांतून अनुभवता येऊ शकतो. सत्संग हा केवळ काही जण एकत्रित येऊन अध्यात्माविषयी चर्चा करणे किंवा कीर्तन-प्रवचन ऐकणे, इथपर्यंत मर्यादित नसून दैनंदिन जीवनात कला-उपासक विविध माध्यमांतून सत्संग मिळवू शकतो.
३ अ. संगीताविषयीच्या आणि अध्यात्माला पूरक असलेल्या ग्रंथांचे वाचन : भारतीय कलेची संस्कृती म्हणजे ‘ज्ञानसागर’ आहे. आपल्या महान ऋषींनी अनेक ग्रंथांतून गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांचा गहन अभ्यास सांगून ठेवला आहे, तसेच त्यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. या उद्देशाने अशा ग्रंथांचे वाचन करण्यातूनही कला-उपासक सत्संग मिळवू शकतो. कलांच्या केवळ तात्त्विक विवेचनात्मक ग्रंथांचे वाचन न करता त्याला साधनेसाठी उपयुक्त अशा आध्यात्मिक ग्रंथवाचनाची जोड देणे, हासुद्धा कला-उपासकासाठी एक सत्संग आहे.
३ आ. गुरूंचे मार्गर्शन आणि सहवास : पूर्वीच्या काळी संगीत कला गुरु-शिष्य परंपरेतून शिकवली जात असे. ‘गुरूंची शिष्याला कला शिकवण्याची पद्धत, विविध प्रसंगांतून शिकवणे, त्यांच्यातील संवाद, गुरूंची सेवा करणे’, यांमुळे शिष्याची सर्वांगीण प्रगती होत असे. गुरूंचा शिष्याला लाभलेला हा सत्संगच असे. आताच्या काळातही कला क्षेत्रातील काही गुरु आहेत, जे कला-उपासकाला केवळ कलेतील ज्ञान न देता कलेकडे साधना म्हणून पहाण्याची दिशा देतात. अशा गुरूंचे मार्गदर्शन आणि सहवास हासुद्धा सत्संगच आहे.
आज सर्व कलागुरु हे आध्यात्मिक स्तरावरील असतीलच, असे नाही. त्यामुळे आजच्या काळात कला-उपासकाला कलागुरूंच्या समवेतच आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन मिळवणेही आवश्यक आहे. त्यामुळे त्याला खर्या अर्थाने गुरूंच्या सत्संगाचा लाभ होईल.
३ इ. संतांच्या सान्निध्यात कलेची प्रस्तुती करणे : आज समाजामध्ये अनेक संत आहेत. ‘अशा संतांच्या सान्निध्यात कलेची प्रस्तुती करण्याची संधी मिळणे’, ही कला-उपासकावरील दैवी कृपाच असते. संतांकडून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींचा लाभ कला-उपासकाला होतो. त्याला तेथे आयता (‘रेडिमेड’) सत्संग मिळतो. संतांच्या दैवी ऊर्जेचा लाभ त्याला त्याच्या कला-साधनेसाठीही उपयुक्त ठरतो.
३ इ १. पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पं. (डॉ.) केशव गिंडे यांचे संतांसमोर कला-प्रस्तुती करण्याचे महत्त्व सांगणारे उद्गार ! : ‘संतांच्या समोर कलेची प्रस्तुती करतांना संतांकडून प्रक्षेपित होणार्या दैवी ऊर्जेमुळे कलाकार भारित (चार्ज) होतो. कलाकाराच्या अंतरामध्ये ती ऊर्जा वृद्धींगत होते. याउलट समाजातील लोकांसमोर कलेचे सादरीकरण केल्यामुळे कलाकाराची दैवी ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे कलाकार ‘डिस्चार्ज’ होतो.’
३ ई. मंदिरे, तीर्थक्षेत्रे इत्यादी ठिकाणी कलेचा सराव करणे : मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथील सात्त्विक वातावरण साधनेसाठी पूरक असते. ‘अशा ठिकाणी कलेचे सादरीकरण करणे किंवा कलेचा सराव करणे’, यांमुळे कलाकाराला साधनेसाठी सकारात्मक ऊर्जा (आध्यात्मिक बळ) मिळते. या वेळी त्या वातावरणामध्ये कला-उपासक आणि भगवंत यांचे नाते सिद्ध झालेले असल्याने तो कला-उपासकासाठी एक प्रकारचा सत्संगच असतो.
३ ई १. मंदिरात केलेल्या सरावामुळे झालेल्या लाभाविषयी मान्यवर कलाकारांनी काढलेले उद्गार !
३ ई १ अ. पं. जयतीर्थ मेवुंडी, शास्त्रीय गायक, हुब्बळ्ळी, कर्नाटक : ‘मी बर्याचदा काशी, तिरुपति इत्यादी तीर्थक्षेत्री कार्यक्रमासाठी गेलो की, आवर्जून तेथील मंदिरांमध्ये काही वेळ बसून गायनाचा सराव करतो. त्यामुळे मला त्या ठिकाणी एक वेगळीच दैवी ऊर्जा मिळते आणि ‘ती ऊर्जा वर्षभर माझ्यात टिकून रहाते’, असे मला जाणवते. या सात्त्विक वातावरणाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा लाभ मला माझ्या कला सादरीकरणामध्येही जाणवतो.’
३ ई १ आ. पद्मश्री डॉ. गीता चंद्रन, भरतनाट्यम् नृत्यगुरु, देहली : ‘काही वर्षांपूर्वी वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील श्री राधारमण मंदिरात मला नृत्य-सेवा सादर करण्याची संधी मिळाली. मंदिरातील नृत्य-प्रस्तुतीनंतर माझा कलेकडे पहाण्याचा दृष्टीकोनच पालटला. मला तेथे ‘मी नृत्य का करत आहे ? माझ्या नृत्याचा उद्देश काय आहे ?’, याची खर्या अर्थाने जाणीव झाली. त्या स्थानी मला ‘माझे नृत्य केवळ प्रेक्षकांसाठी नसून मी माझ्या आनंदासाठी, स्वतःच्या समाधानासाठी नृत्य करत आहे’, याची जाणीव तीव्रतेने झाली.’
३ उ. कलेतील देवत्व अनुभवत कलेचा सराव करणे : कलेला साधनेची जोड दिल्याने कलांचा सराव करतांना साधक-कलाकार अंतर्मुुख स्थिती अनुभवत असतो. या वेळी कुणी रागातील स्वरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, कुणी नृत्यातील भाव, मुद्रा यांचा अभ्यास करतो, तर कुणी वाद्यांतून नादानुसंधान अनुभवतो. कलेतील देवत्व अनुभवत कलेचा सराव केल्याने सरावाच्या वेळी ‘मन निर्विचार होणे, डोळ्यांतून अश्रूधारा वहाणे, ध्यान लागणे, एखाद्या देवतेचे दर्शन होणे’, अशा प्रकारच्या विविध अनुभूती कला-उपासकाला येतात. ‘हे क्षण अनुभवणे’, हासुद्धा एक प्रकारचा ‘सत्संग’ असतो. जेथे ईश्वराची अनुभूती येते आणि त्याचा संग अनुभवता येतो, तोसुद्धा एक सत्संग असतो.
३ ऊ. आध्यात्मिक संस्थांच्या सत्संगाला नियमित जाणे : समाजात साधनेविषयी मार्गदर्शन करणार्या अनेक आध्यात्मिक संस्था आहेत. त्यांचेही प्रत्येक आठवड्याला किंवा मासाला सत्संग असतात. ‘अशा सत्संगांमधूनही साधनेविषयी मार्गदर्शन घेणे, शंकानिरसन करून घेणे’, यानेही कला-उपासकाला त्याच्या कला-साधनेत पुढे जाण्यास साहाय्य होते.
३ ए. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शिबिरांमध्ये सहभागी होणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून कलेला साधना जोडण्याची दिशा देणारी शिबिरे घेतली जातात. ‘अशा शिबिरांचा लाभ घेणे’, हासुद्धा एक सत्संगच आहे.
साधक-कलाकाराने आपल्या कलेला सत्संगाची जोड दिल्यास तो शीघ्रतेने ईश्वरी अनुभूतीच्या जवळ जाऊ शकतो. कला-उपासकांनी सत्संगाचे महत्त्व समजून घेऊन वरीलप्रमाणे आपल्या सोयीनुसार सत्संगात रहाण्याचा नियमित प्रयत्न करावा आणि कलेतील ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा.
पुढील भागात आपण ‘सत्संगाचे साधक-कलाकाराला होणारे विविध लाभ’ जाणून घेणार आहोत.’ (क्रमशः)
– श्री. जयवंत रसाळ (संगीत विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१०.६.२०२६)
तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !
वातव्याधी आणि आयुर्वेदातील ‘पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन)’
कतारपासून कोळशापर्यंत : अखेर भारत स्वतःचे ऊर्जेवरील अवलंबित्व सोडू शकेल का ?
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !