साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !

‘कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा हे धर्मप्रसार सेवेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत प्रवास करतात. या वेळी पू. रमानंदअण्णा साधकांना ‘साधकांची साधना उत्तम प्रकारे व्हावी, त्यांच्यात आंतरिक परिवर्तन घडावे, त्यांच्यात व्यापकता निर्माण व्हावी आणि गुरुकार्य वाढण्यासह साधकांची आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने व्हावी’, या दृष्टीने मार्गदर्शन करतात. ‘धर्मप्रेमींनी पुढील टप्प्याची साधना करावी आणि हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य स्वतःची साधना म्हणून कशा प्रकारे करावे ?’, या दृष्टीने पू. अण्णा मार्गदर्शन करतात. त्यानंतर ते साधकांच्या पुढील सेवांचे नियोजनही अत्यंत तळमळीने करतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये गुरुकार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

‘२६.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत पू. रमानंदअण्णांचा प्रसार दौरा बेंगळुरू जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. अण्णांकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. २३.६.२०२६ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1053948.html

पू. रमानंद गौडा

३. श्री. मोहन गौडा, बेंगळुरू (कर्नाटक)

३ अ. पू. रमानंद गौडा यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन : पू. रमानंदअण्णा साधकांना पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले.

श्री. मोहन गौडा

१. आपण केवळ स्वतःसाठी न जगता आपल्या इच्छा न्यून करून ‘इतरांसाठी काय करू शकतो ?’, यासाठी सतत प्रयत्न करायला हवेत.

२. ‘आपल्या समवेत इतर साधक असल्यामुळेच आपल्याला साधना आणि गुरुकार्य एकत्रितपणे करता येते’, त्याबद्दल आपल्याला प्रत्येक साधकाच्या प्रती कृतज्ञता वाटायला हवी. इतर साधकांमधील गुण पाहून ‘ते गुण आपल्यातही वृद्धिंगत व्हावेत’, यासाठी प्रयत्न करावेत.

३. साधक हे गुरूंचेच प्रतिरूप आहेत. त्यांच्याशी आत्मीयतेने आणि प्रेमभावाने वागावे.

४. ‘सहसाधक त्यांना अडचणी असतांनाही परिश्रम घेत आणि संघर्ष करत कसे प्रयत्न करतात ?, तसेच त्यांच्या प्रकृतीनुसार प्रयत्नांमध्ये विविधता कशी असते ?’, हेही शिकायला हवे.

५. इतर साधकांचे काही स्वभावदोष लक्षात आल्यास त्यांना साहाय्य म्हणून त्यांना त्यांचे स्वभावदोष न्यून करण्यास सांगायला हवे.

३ आ. पू. रमानंदअण्णा यांनी केलेले मार्गदर्शन ऐकून साधकांमध्ये झालेले परिवर्तन : ‘वसुधैव कुटुम्बकम्, म्हणजे आपण सर्व जण एकाच कुटुंबातील आहोत’, ही भावना प्रत्येक साधकात निर्माण होत आहे’, असे मला जाणवत होते. साधकांना आधार वाटून त्यांना सेवा आणि साधना करण्यासाठी उत्साह वाटत होता. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे प्रत्येक साधकावर असलेले लक्ष आणि त्यांच्याप्रती असलेली प्रीती साधकांना पू. अण्णांच्या माध्यमातून अनुभवता येत होती.

३ इ. साधकांचे गुण ओळखून साधकांना साधना आणि सेवा करण्यास प्रोत्साहन देणे : ‘पू. अण्णांना एखादा साधक भेटल्यावर किंवा त्यांनी एखाद्या साधकाला सत्संगात पाहिल्यावर ते ‘त्या साधकात कोणते गुण आणि क्षमता आहे ? त्याला कसे पुढे नेता येईल ? तो कोणती सेवा उत्तम प्रकारे पार पाडू शकेल ?’, याचा अचूक अभ्यास करतात. त्यानुसार ते साधकांना सेवा देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.

१. बेंगळुरूमधील एका उच्चभ्रू क्षेत्रात कार्यरत असणार्‍या एका साधकाकडून साधनेचे प्रयत्न अल्प होत होते; मात्र पू. अण्णांनी ‘त्यांच्यात भाव आहे आणि योग्य दृष्टीकोन मिळाल्यास पुढे ते प्रयत्न करू शकतील’, हे ओळखून त्यांना शिकण्यासाठी प्रसार दौर्‍याच्या वेळी यायला सांगितले. ते साधक १ आठवडा पू. अण्णांच्या समवेत होते. तेव्हा ‘स्वतःमधील ‘आळस’ या स्वभावदोषामुळे स्वतःची साधनेत किती हानी झाली आहे ?’, याची त्या साधकांना जाणीव झाली. आता ते दायित्व स्वीकारून सातत्याने सेवा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

२. बेंगळुरूमधील एका साधिकेचे यजमान अधिवक्ता असून ते अनेक वर्षांपासून साधना करत होते; मात्र मागील २ वर्षांपासून काही कारणांमुळे ते साधकांच्या संपर्कात नव्हते. त्यांची साधनेतील रुचीही न्यून झाली होती आणि ते आपल्या पत्नीच्या साधनेलाही फारसे पूरक नव्हते. एकदा ते रहात असलेल्या परिसरात पू. अण्णांच्या सत्संगाचे नियोजन केले होते. पू. अण्णांनी त्या अधिवक्त्यांना सत्संगाला उपस्थित रहायला सांगितले. काही दिवसांनंतर पू. अण्णांनी एका साधकाकडून त्या अधिवक्त्यांना ‘३ – ४ दिवस समवेत येऊ शकता का ?’, असे विचारले. तेव्हा ते अधिवक्ता पू. अण्णांच्या समवेत शिकण्यासाठी आले.

पू. अण्णांच्या सत्संगात राहून त्यांनी अनेक गोष्टी शिकल्यामुळे ३ – ४ दिवसांतच त्यांच्यामध्ये मोठा पालट होऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण झाली. त्यांच्यात साधना आणि सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर पू. अण्णांनी त्यांना एका दुसर्‍या जिल्ह्यात चालू असलेल्या प्रसारदौर्‍याच्या वेळी शिकण्यासाठी यायला सांगितले. त्यांनी तात्काळ होकार देऊन पू. अण्णांच्या प्रसार दौर्‍यात सहभागी होऊन त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पू. अण्णांना मनमोकळेपणाने सांगितले, ‘‘२ वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग त्याच वेळी तुम्हाला न सांगण्याची मी मोठी चूक केली. माझा पुष्कळ वेळ वाया गेला. याबद्दल मला आता पश्चात्ताप होत आहे.’’

३. बेंगळुरूमधील आणखी एक उद्योजक साधक पू. अण्णांच्या समवेत शिकण्यासाठी आले होते. त्यांच्या मनात ‘अध्यात्म, साधना आणि वैयक्तिक जीवन’ यांच्या संदर्भात अनेक प्रश्न होते. पू. अण्णांच्या सत्संगानंतर त्या साधकांच्या मनातील सर्व शंका दूर होऊन त्यांचे समाधान झाले. त्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांचा ताण न्यून झाला. त्यांच्यात ‘साधना आणि सेवा अधिक करायला हवी. त्यामुळे ईश्वराचे साहाय्य मिळते’, ही श्रद्धा दृढ झाली. त्यांनी पू. अण्णांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि आता ते चांगल्या प्रकारे साधना करण्याचा प्रयत्न करत आहेत.

४. एकदा पू. अण्णा एका साधकाच्या घरी गेले होते. तेव्हा ‘त्या साधक दांपत्याच्या मुलीमध्ये साधकत्वाचे अनेक गुण आहेत’, असे पू. अण्णांच्या लक्षात आले. पू. अण्णांनी प्रसारदौर्‍याच्या वेळी त्या मुलीला इतर साधकांच्या समवेत यायला सांगितले. तिनेही होकार दिला आणि साधना शिकत अत्यंत आनंदाने सेवा करण्यास आरंभ केला.

३ ई. ‘साधक साधनेच्या पुढच्या टप्प्यात जावेत’, याचा पू. रमानंद गौडा यांना असलेला ध्यास ! : पू. अण्णा यांच्या समवेत काही जिल्ह्यांत जातांना स्थानिक परिस्थितीनुसार अनुमाने २५ साधक ३ – ४ चारचाकी वाहनांमधून प्रवास करत असत. ‘प्रवासाच्या वेळी प्रत्येक साधकाच्या दृष्टीने ‘वाहन व्यवस्था, त्यांचा निवास, तसेच प्रसाद–महाप्रसाद’ यांची व्यवस्था योग्य प्रकारे झाली आहे का ?, तसेच आहारविषयक पथ्य असलेल्या साधकांच्या दृष्टीने नियोजन केले आहे का ?’, याविषयी पू. अण्णा संबंधित साधकांशी बोलत असत. पू. अण्णांच्या समवेत प्रवास करतांना चैतन्याचा अनुभव येतो. ‘कोणत्या वाहनातून कोणते साधक प्रवास करतील ?’, याची प्रतिदिन ते स्वतः पहाणी करत असत. यामागे ‘प्रत्येक साधकाला संतांच्या समवेत प्रवास करण्याची संधी मिळावी आणि सर्वांना शिकता यावे’, असा पू. अण्णांचा दृष्टीकोन असतो. प्रवास करतांना पू. अण्णा नामजप करणे, गुरूंच्या महानतेविषयी सांगणे, अशा प्रकारे साधकांना अंतर्मुखतेकडे नेत असत. ‘शिकण्यासाठी आलेल्या साधकांना सर्व प्रकारच्या सेवा करता याव्यात आणि ते पुढच्या टप्प्यात जावेत’, या हेतूने पू. अण्णा काही साधकांना सभागृहाच्या सिद्धतेसाठी लवकर पाठवत असत. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनात सेवा करणारे साधक, सूत्रसंचालन आणि इतर सेवा करणारे साधक यांना पू. अण्णा दुसर्‍या गटात पाठवत असत. पू. अण्णा स्वतःच्या समवेत येणार्‍या साधकांचे नियोजन करत असत. त्यामुळे सर्व साधकांना सर्व प्रकारच्या सेवा करण्याची संधी मिळत होती.

साधकांना साधनेत पुढे नेण्याच्या तीव्र तळमळीमुळे पू. अण्णा दिवस-रात्र चिंतन करून प्रयत्न करत असत. त्यामुळे साधकांमध्ये आमूलाग्र पालट झालेला दिसून येत होता.

पू. अण्णांचा दौरा हा एका दृष्टीने साधकांच्या जीवनात नित्य गुरुपौर्णिमा असल्यासारखा होता.

३ उ. हिंदुत्वनिष्ठांना संपर्क करून आणि त्यांना साधना सांगून त्यांच्याशी जवळीक साधणे : पू. अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर प्रत्येक जण धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करत होता. समाजातील हिंदु बांधवांसाठी आयोजित केलेल्या सत्संगाचे दायित्व घेऊन नेतृत्व करणार्‍या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या घरी पू. अण्णा काही वेळा भेट देतात. तेथे पू. अण्णा इतर साधकांनाही समवेत घेऊन जात होते आणि त्यांच्या कुटुंबियांना साधकांचा परिचय करून देत होते. ‘काही साधक व्यवसाय सांभाळून, काही गृहिणी आणि काही साधक नोकरी करत असूनही साधना उत्तम प्रकारे करत आहेत’, असे सांगितल्यावर हिंदुत्वनिष्ठांच्या कुटुंबियांना प्रेरणा मिळत होती.

३ ऊ. ‘संतच साधकांना घडवू शकतात’, या गुरुवचनाची आलेली प्रचीती ! : काही उद्योजक पू. अण्णांना भेटण्यासाठी आल्यावर पू. अण्णा साधकांनाच त्या उद्योजकांशी साधनेविषयी बोलायला सांगत असत. तेव्हा साधक त्या उद्योजकांना संस्था आणि साधना यांविषयी अत्यंत चांगल्या प्रकारे सांगत असत.

पू. अण्णांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे त्या प्रतिष्ठित उद्योजकांना ‘उत्तम साधक’ म्हणून घडवले.

पू. अण्णांचे सत्संग आणि रात्री साधकांना केल्या जाणार्‍या साधनेविषयीचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर त्या उद्योजकांच्या मनात ‘साधनेसाठी तन, मन आणि धन यांचा अधिक त्याग करायला हवा. मी माझ्या व्यवसायातच अडकून पडलो आहे’, अशी भावना निर्माण झाली. ‘ईश्वरासाठी माझ्या मनाचा खरा त्याग झालेला नाही, साधनेत पुढील टप्प्याला जाण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणे आवश्यक आहे’, याची त्यांना तीव्र जाणीव झाली.

३ ए. ‘जो धर्मकार्य करतो, त्याची काळजी ईश्वरच घेतो’, या सुवचनाची आलेली प्रचीती : ‘पू. अण्णांच्या समवेत शिकण्यासाठी अनेक उद्योजक साधक आले होते. आरंभी त्या उद्योजकांना ‘संतांच्या समवेत २ – ३ दिवस राहिल्यास आपल्या व्यवसायावर परिणाम होईल’, असे वाटत होते; मात्र ‘व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे होत आहे’, असे त्या उद्योजकांच्या लक्षात आले. संतांनी सांगितलेल्या ‘जो ईश्वराचे कार्य करतो, त्याची काळजी ईश्वरच घेतो’, या सुवचनाचा त्या उद्योजकांना प्रत्यक्ष अनुभव आला. त्याचप्रमाणे ‘आपण व्यवसाय करत नाही, तर ईश्वरच करतो’, ही जाणीवही त्यांना झाली.

३ ऐ. तत्त्वनिष्ठ राहून आध्यात्मिक दृष्टीकोन देणे : ‘पू. अण्णा समाजातील व्यक्तींना ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. तेव्हा काही जण पू. अण्णांना बुद्धीच्या स्तरावरील प्रश्न विचारतात. पू. अण्णा तत्त्वनिष्ठतेने त्या व्यक्तींना आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. पू. अण्णा करत असलेल्या मार्गदर्शनामुळे समाजातील लोकांमध्येही पालट होत आहे.

३ ओ. पू. रमानंद गौडा मार्गदर्शन करत असतांना आलेल्या अनुभूती : एकदा पू. अण्णा मार्गदर्शन करत असतांना मला व्यासपिठावर पिवळ्या रंगाचा गोलाकार प्रकाश दिसत होता आणि त्याच्या मध्यभागी गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन होत होते. काही जणांना पू. अण्णा श्रीकृष्णाच्या रूपात दिसत होते, तर काही जणांना पू. अण्णांच्या मस्तकाचा भाग पूर्णतः तेजस्वी दिसत होता आणि ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असा अनुभव येत होता.’

४. श्री. जयराम एस्., बेंगळुरू (कर्नाटक)

श्री. जयराम एस्.

अ. ‘पू. अण्णा सत्संगात साधनेच्या संदर्भात सांगत असतांना असतांना ‘ते मलाच सांगत आहेत’, असे वाटले. त्यांचे मार्गदर्शन ऐकून मला ‘बहिर्मुखता आणि अंतर्मुखता’ यांतील भेद समजला. मी अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न करू लागलो.

आ. पू. अण्णांची प्रीती अनुभवून मी भारावून गेलो. त्यांची उत्कट भक्ती पाहून मी त्यांच्या चरणी लीन झालो. ‘पू. अण्णांना समजून घेण्यासाठी मी साधना वाढवायला हवी’, हे माझ्या लक्षात आले.

इ. एकदा मार्गदर्शनात पू. अण्णांनी ‘गुरु’ हा शब्द उच्चारताच पू. अण्णांचा गुरूंप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) शरणागतभाव पाहून ते मला अंजनीपुत्र मारुतिसमान दिसत होते. मीही त्याच भावात लीन झालो.’

(क्रमशः)

(२५.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक