‘ज्येष्ठ शुक्ल नवमी (२३.६.२०२६) या दिवशी पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना पू. रमानंद गौडा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. रमानंद गौडा यांच्या चरणी त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा, सनातनचे ७५ वे संत, वय ५० वर्षे) हे धर्मप्रसार सेवेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत प्रवास करतात. या वेळी पू. रमानंदअण्णा साधकांना ‘साधकांची साधना उत्तम प्रकारे व्हावी, त्यांच्यात आंतरिक परिवर्तन घडावे, त्यांच्यात व्यापकता निर्माण व्हावी आणि गुरुकार्य वाढण्यासह साधकांची आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने व्हावी’, या दृष्टीने मार्गदर्शन करतात. ‘धर्मप्रेमींनी पुढील टप्प्याची साधना करावी आणि हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य स्वतःची साधना म्हणून कशा प्रकारे करावे ?’, या दृष्टीने पू. अण्णा मार्गदर्शन करतात. त्यानंतर ते साधकांच्या पुढील सेवांचे नियोजनही अत्यंत तळमळीने करतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये गुरुकार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
‘२६.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत पू. रमानंदअण्णांचा प्रसार दौरा बेंगळुरू जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. अण्णांकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कु. रेवती मोगेर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३५ वर्षे) बेंगळुरू (कर्नाटक)

१ अ. ‘दौर्याच्या वेळी समवेत असलेल्या साधकांनी कसे शिकावे ?’, याविषयी पू. रमानंद गौडा यांनी साधकांना दौरा चालू होण्यापूर्वी मार्गदर्शन करणे : पू. अण्णांच्या दौर्याच्या वेळी काही साधक २ दिवस, ४ दिवस किंवा एक आठवडा या कालावधीसाठी शिकण्यासाठी येत असत. त्या आधी पू. अण्णा साधकांना ‘वृत्ती अंतर्मुख होण्यासाठी शिकण्याची वृत्ती वाढवायला हवी’, असे सांगतात. ‘प्रत्येक प्रसंग, परिस्थिती, स्वतःच्या चुका, इतरांच्या चुका, सहसाधक, समाज, अनुभूती, संत आणि संतांचे मार्गदर्शन यांतून कसे आणि काय शिकावे ?’, याविषयी पू. अण्णा साधकांना सांगतात. अशा प्रकारे साधकांना आधीच सांगितल्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीत वाढ होत होती आणि साधक सतत शिकत असत, तसेच साधक शिकायला मिळालेली सूत्रे लिहून ठेवत असत.
१ आ. मार्गदर्शनात सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्यासाठी साधकांना अभ्यास करायला सांगणे : प्रत्येक दिवशी रात्री होणार्या सत्संगात पू. अण्णा साधकांना त्यांना दिवसभरात शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्यासाठी सांगत असत. ‘गुरूंनी सांगितल्यानुसार आचरण केल्यासच खरे शिकणे होते. आपण शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत का ?’, याचाही साधकांना अभ्यास करायला पू. अण्णा सांगत असत. यामुळे साधकांमध्ये अंतर्मुखता वाढत असल्याचे दिसून येत होते.
१ इ. मार्गदर्शनातील विषय लिहून घेण्यास सांगणे : ‘मार्गदर्शनातील विषय लिहून घेतांना अधिक शिकता यावे’, यासाठी पू. अण्णा मार्गदर्शन चालू करण्यापूर्वीच साधकांना सर्व सूत्रे एकाच ठिकाणी न लिहिता ४ शीर्षकांखाली (मार्गदर्शनात सांगितलेली सूत्रे, मार्गदर्शनातून शिकलेली सूत्रे, आपण कोठे अल्प पडतो ? आणि कृती करण्यासंदर्भातील सूत्रे) लिहायला सांगतात.
१ ई. साधकांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणे : ‘प्रत्येक साधकाची व्यष्टी साधना पूर्ण व्हावी’, यावर पू. अण्णा भर देत असत. ‘भावजागृतीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करावेत ?’, याविषयीही ते मार्गदर्शन करत असत. यामुळे साधक प्रतिदिन व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणखी उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करत होते. पू. अण्णा साधकांना प्रतिदिन एखादा गुण अंगी येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्याचे ध्येय देत असत. त्या संदर्भात ते साधकांचा आढावाही घेत असत. साधक आनंदाने प्रयत्न करत असत.
१ उ. पू. रमानंद गौडा यांनी स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणे : एका सत्संगात पू. अण्णांनी ‘साधना होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, या संदर्भात स्वत:चे उदाहरण देऊन सांगितले. त्यांनी सांगितले, ‘‘एकदा मी बेंगळुरू जिल्ह्यात प्रवास करत असतांना मला एका सेवेसाठी तातडीने मंगळुरू येथे जायचे होते. त्या वेळी माझ्याकडे वेळ अल्प होता आणि माझ्या पुढील प्रवासाचे नियोजनही झाले होते. माझे मंगळुरू येथे बसने जाण्याचे आणि तेथून परत येण्याचे रेल्वेचे तिकीट आरक्षित केले होते. मला पाठदुखीचा तीव्र त्रास असल्यानेे काही वर्षांपासून मी बसने किंवा रेल्वेने प्रवास करत नव्हतो. या वेळी मंगळुरूला जातांना बस आरामदायी नसल्यामुळे मला बसने प्रवास करतांना पुष्कळ शारीरिक त्रास झाला. माझ्या परतीच्या रेल्वे प्रवासात मी बसलेल्या डब्यातील प्रवाशांचे वर्तन योग्य नव्हते. त्यामुळे डब्यात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण झाली होती.
तेव्हा मी स्वतःच्या मनातील विचारांचे निरीक्षण करत होतो. माझ्या मनात ‘पूर्वी अनेक संतांनी देवाच्या प्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न केले आहेत. देवासाठी संतांनी स्वतःच्या सर्व इच्छा त्यागल्या. या परिस्थितीत देव मला काय शिकवत आहे ? मला सर्व परिस्थितीत आनंदी रहायला शिकायला हवे’, असे विचार येत होते.’’
पू. अण्णांनी या प्रसंगाविषयी सांगितल्यानंतर अनेक साधकांनी विविध प्रसंगांमध्ये स्वतःचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न चालू केला.’
१ ऊ. पू. अण्णांनी अशा प्रकारे विविध स्तरांवर मार्गदर्शन केल्यामुळे ‘सर्वच साधकांमध्ये उत्साह वाढणे, त्यांनी सेवेसाठी अधिक वेळ देणे, दायित्व घेऊन सेवा करणे, व्यष्टी साधना गांभीर्याने करणे आणि स्वतःमध्ये पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे’, असे पालट दिसून येत होते.
१ ए. पू. रमानंद गौडा यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव : पू. अण्णा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात बोलत असतांना त्यांची नेहमीच भावजागृती होते आणि त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. तेव्हा त्यांना काही वेळ बोलताही येत नाही. त्या वेळी त्यांच्या समवेत असलेल्या साधकांचीही भावजागृती होते.
एकदा पू. अण्णांनी सत्संगात सांगितले, ‘‘मला मोक्ष म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही. मला केवळ गुरूंचे चरण हवे आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरूंच्या चरणांची सेवा करत राहीन.’’ तेव्हा त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. ‘पू. अण्णांमध्ये गुरूंप्रती किती उत्कट भाव आहे !’, याचा प्रत्यक्ष अनुभव या वेळी आला.
पू. अण्णा सतत गुरूंचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त करत असतात. यामुळे साधकांमध्येही गुरूंप्रती कृतज्ञताभाव सहजतेने जागृत होतो.’
२. श्री. श्रीकांत चौधरी, बेंगळुरू

२ अ. सखोल अभ्यास करून साधकांना मार्गदर्शन करणे : ‘साधकांना साधनेत पुढे नेण्यासाठी त्यांना कसे मार्गदर्शन करावे ?, जेणेकरून ते अंतर्मुख होऊन पालट घडवून प्रयत्न वाढवतील’, याबद्दल पू. अण्णा अभ्यास करतात. ते सनातनच्या विविध ग्रंथांचा, गुरूंनी साधकांना घडवण्यासाठी केलेले प्रयत्न, साधकांचा शिष्यभाव आणि विविध गुरु-शिष्यांनी केलेले साधनेचे प्रयत्न, अशा विविध उदाहरणांचा अभ्यास करतात. पू. अण्णा ‘कोणत्या विषयानंतर कोणता विषय मांडावा ?’, याविषयी महत्त्वाची सूत्रे लिहितात. पू. अण्णा ‘मनाचा अभ्यास कसा करायचा ? साधकांची मानसिकता, स्वभावदोष आणि अहं यांची लक्षणे, त्यामागील विचारप्रक्रिया, त्याचा साधनेवर होणारा परिणाम; भाव, श्रद्धा, तळमळ, गुरूंची महानता’ अशा विषयांचा अभ्यास करून सूत्रे लिहून काढतात. ते या सूत्रांचा २ – ३ वेळा अभ्यास करतात. ‘पू. अण्णा संत असूनही ते निरंतर अध्ययन कसे करतात ?’, हे यातून शिकायला मिळते.
२ आ. पू. रमानंद गौडा यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया आनंदाने करायला शिकवणे अन् त्याचे साधकांना झालेले लाभ !
१. पू. अण्णा साधकांना ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आनंदाने कशी करावी ?’, याविषयी एकदा शिकवत होते. ते साधकांसाठी घेतल्या जाणार्या रात्रीच्या सत्संगात ‘प्रत्येक साधक कुठे न्यून पडतो ? त्याच्यात कोणते स्वभावदोष आणि अहंचे पैलू आहेत ? त्यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत ?’, याची स्पष्ट जाणीव करून देत होते.
२. साधक एकमेकांना साहाय्य करून मनापासून या प्रक्रियेत सहभागी होत होते. प्रत्येक साधक ही प्रक्रिया ताण न घेता आनंदाने आणि उत्साहाने करत होता. साधकांना स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू समजल्यावर ते त्यांवर मात करण्यासाठी सहजतेने अन् मनापासून प्रयत्न करत होते.
३. ‘साधक अंतर्मुख होत होते आणि सेवा अन् साधना यांत पुढे जात होते’, असे मला जाणवले. मी स्वतःही तसे अनुभवले.’ (क्रमश:)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २५.२.२०२६)
अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !
शांत, स्थिर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असलेले अकलूज येथील श्री. विष्णु जाधव !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !