स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २२ जून १९४० या दिवशी झालेल्या भेटीला ८६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने...

२२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सावरकर यांच्या रणनीतीच्या आधारे हिंदु महासभेच्या कार्यकारिणीने केलेला ठराव, सावरकर आणि व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भेटीचा वृत्तांत, म. गांधींची लॉर्ड लिनलिथगो यांच्याशी झालेली ब्रिटीशधार्जिणी भेट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1053710.html

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीचा एक क्षण

५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु तरुणांना केलेले आवाहन आणि त्यावर केलेले शंकानिरसन

सावरकर हिंदुस्थानातील तरुणांना सांगत होते, ‘आता दुसरे महायुद्ध लवकरच चालू होत आहे. हे महायुद्ध चालू झाले की, ब्रिटिशांना त्यांच्या देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे सैन्य लागणार आहे. स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी त्यांचे सैन्य हिंदुस्थानात ठेवून घेणे त्यांना अडचणीचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानवरील स्वतःची सत्ता नष्ट होऊ नये; म्हणून ब्रिटिशांना सैन्य बळाची आवश्यकता आहे. हिंदुस्थानातील हिंदु तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्यात भरती व्हावे. ब्रिटीश सरकार स्वतःच तुमच्या हातात शस्त्रास्त्रे देईल, तसेच शस्त्र निर्मितीचे प्रशिक्षणही अधिकृतपणे ब्रिटीश सरकार देईल. हे सर्व तुम्ही मुक्तपणे करू शकाल. या संधीचा लाभ आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला करून घेता येईल.’

सावरकर यांच्या या रणनीतीवर एका तरुणाने प्रश्न केला, ‘ब्रिटीश सरकार आम्हाला सैन्यात भरती करून घेण्यापूर्वी आमच्याकडून बाँड (हमीपत्र) लिहून घेईल, त्याचे काय ?’ तरुणाच्या या शंकेला उत्तर देतांना सावरकर म्हणाले, ‘ब्रिटीश सरकार तुम्हाला जेवढ्या अटी घालेल, त्या सर्व अटी मान्य करा. एकदा तुमच्या हातात शस्त्र आले की, तेच शस्त्र योग्य वेळ येताच ब्रिटिशांच्या नरड्याला लावून तुम्हाला देश स्वतंत्र करता येईल. हे मी व्हॉईसरॉयला सांगूनच तुम्हाला सांगत आहे.’

६. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याविषयी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सांगितलेले कारण

अखेरीस तेच घडले. इंग्रजांचे पंतप्रधान ॲटली यांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचा ठराव पारित करावा लागला. त्या ठरावात स्पष्ट शब्दांत लिहिले होते, ‘हिंदुस्थानचे सैन्य ब्रिटीश सरकारशी एकनिष्ठ न राहिल्यामुळे हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे भाग पडत आहे.’ ब्रिटिशांच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये पारित झालेला हा ठराव सावरकर यांच्या रणनीतीचा विजय होता, याची ग्वाही देतो. असे असतांनाही ‘सावरकर यांनी ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदु तरुणांना भरती होण्याचे आवाहन करून ब्रिटीश सरकारला साहाय्य केले’, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. तो आरोप कसा निराधार आहे, हे आतापर्यंत केलेल्या विवेचनातून सिद्ध होते.

७. हिंदी तरुणांना ब्रिटीश सैन्यात भरती होण्यास सांगण्यामागे सावरकर यांची दूरदृष्टी

सावरकर यांनी केवळ हिंदुस्थानातील हिंदी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामागे जसे देश स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे मूलभूत कारण होते, तेवढेच महत्त्वाचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदी तरुणांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यांची संख्या सैन्यात अधिक असणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या संरक्षणाचे दायित्व राष्ट्रनिष्ठ असलेल्या सैनिकांच्या खांद्यावर देणे क्रमप्राप्त होते. सावरकर यांच्या या सैन्यभरतीच्या प्रेरणेमागे हाही प्रधान हेतू होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले अन् ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

८. सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांच्या भेटीमागील कारण

सावरकर यांना आणखी एक गोष्ट साध्य करायची होती. त्यासाठी सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांची अचानक झालेली भेट ही त्यांचा मनोदय पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरली. २२ जून १९४० या दिवशी त्या वेळचे देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर यांना भेटण्यासाठी अचानकपणे सावरकर सदनात आले. ते सावरकर यांना म्हणाले, ‘मी जीनांना आताच भेटून आलो; पण त्यांनी मला विचारले, ‘मिस्टर सुभाषबाबू तुम्ही कुणाच्या वतीने तडजोडीची बोलणी करण्यास आला आहात?’ सुभाषबाबू जीनांना म्हणाले, ‘काँग्रेसच्या वतीने.’ जीना म्हणाले, ‘पण तुम्हाला तर काँग्रेसने बहिष्कारले आहे.’ सुभाषबाबू म्हणाले, ‘पण ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाचा मी अधिकृत पुढारी आहे ना, त्याच्या वतीने मी बोलू शकतो.’ जीना म्हणाले, ‘परंतु जर तुम्ही मला मुसलमानांचा पुढारी म्हणून हिंदू-मुसलमानांच्या तडजोडी करता भेटत असाल, तर हिंदूंच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार असलेल्या कुणाशी तरी बोलण्यात अर्थ आहे. तुमचा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष स्वतःला हिंदु संस्था म्हणून घेतो आहे का ?’ जीनांच्या या प्रश्नाचे उत्तर देतांना सुभाषबाबू म्हणाले, ‘मी एक हिंदु म्हणून तरी हिंदू-मुसलमान तडजोडीविषयी बोलू इच्छितो.’ जीना म्हणाले, ‘तुम्ही प्रथम सावरकर यांना जाऊन भेटा. हिंदूंचे प्रतिनिधित्व तेच करू शकतात. व्यक्तीने व्यक्तीशी चर्चा करण्यात काही उपयोग नाही. सावरकर आले, तर आपण काही चर्चा करू.’ जीनांच्या या उत्तरामुळे सुभाषबाबू सावरकर यांना भेटायला सावरकर सदनात गेले. सुभाषबाबूंनी भेटण्यासाठी येण्यामागचे कारण सावरकर यांना कळले.

९. सशस्त्र क्रांती करण्याच्या अनुषंगाने सावरकर यांनी नेताजी सुभाषचंद्र यांच्याशी केलेली चर्चा

सावरकर यांनी त्यांना मुख्य सूत्राकडे वळण्यासाठी विचारले, ‘हे सर्व सोडून द्या. यावर चर्चा करण्यापेक्षा आपण अधिक महत्त्वाच्या सूत्रावर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. सध्या महायुद्धाच्या संकटात ब्रिटन सापडले आहे. आपल्यासारखा पुढारी हिंदुस्थानात राहून हॉलवेलचा पुतळा तत्कालीन कलकत्त्याच्या मार्गातून उखडून टाकण्यासाठी चळवळीत गुंतला आहात. अशा अत्यंत क्षुल्लक चळवळीमुळे ब्रिटिशांच्या कारागृहात जाऊन सडत पडण्यात काहीही अर्थ नाही.’ सुभाषबाबू म्हणाले, ‘सावरकर, जनतेत काहीही करून ब्रिटिशांच्या विरोधात संताप निर्माण केला पाहिजे. तेच काम मी करत नाही का ?’

सावरकर यांनी त्यांच्या प्रामाणिक राष्ट्रकार्याचे आणि तळमळीचे कौतुक केले. मग त्यांनी जपानमध्ये वास्तव्य करत असलेल्या रासबिहारी बोस यांच्याशी त्यांच्या चालू असलेल्या पत्रव्यवहाराविषयी सांगितले. यानंतर सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले, ‘आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या न्यायाने ब्रिटिशांच्या हिंदी सैन्यातील काही सैनिक जर्मनीच्या हाती सापडले आहेत. त्या सैनिकातून क्रांतीसैन्य उभे करण्यात आले आहे. जर्मनी आणि जपान यांच्या अद्ययावत् शस्त्रानिशी अन् लढाईत मुरलेल्या सहस्रा हिंदी सैनिकांची हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्णसंधी आपण आता साधू शकतो. अशा वेळी तुमच्यासारख्या पुढार्‍याने हिंदुस्थानात रहाणे उचित नाही. रासबिहारींसारखे अनेक सशस्त्र क्रांतीकारक पुढारी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जपान आणि जर्मनी येथे निसटून गेले. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ब्रिटीश सरकारच्या हातावर तुरी देऊन या देशातून बाहेर पडा. तिकडे जर्मनी आणि इटली यांच्या हाती सापडलेल्या सहस्रो हिंदी सैनिकांचे नेतृत्व तुम्ही करावे. असा सशस्त्र आणि साहसी पराक्रम करण्यासाठी जी दोन माणसे मला समर्थ वाटतात, त्यापैकी तुम्ही एक आहात.’

सावरकर यांचे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर सुभाषबाबू त्यांना म्हणाले, ‘मी प्रथम कलकत्त्याला जातो आणि तिथे काय घडते, ते पहातो. त्यानंतर माझा कोणता पुढचा नक्की कार्यक्रम ते ठरवेन. इकडे आल्यास पुन्हा आपल्याला भेटेन.’ एवढी चर्चा झाल्यावर सुभाषबाबू सावरकर यांचा निरोप घेऊन निघून गेले.

(क्रमश:)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.६.२०२६)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1054374.html