स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २२ जून १९४० या दिवशी झालेल्या भेटीला ८६ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने...
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सावरकर यांच्या रणनीतीच्या आधारे हिंदु महासभेच्या कार्यकारिणीने केलेला ठराव, म. गांधींची लॉर्ड लिनलिथगो यांच्याशी झालेली ब्रिटीशधार्जिणी भेट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु तरुणांना केलेले आवाहन आणि त्यावर केलेले शंकानिरसन अन् सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांच्या भेटीमागील कारण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1053964.html

१०. नेताजी सुभाषबाबू यांनी कारागृहातून जर्मनीला पलायन करणे
अनेक वेळा पूर्वपीठिका जाणून घेणे नितांत आवश्यक असते. केवळ मधलाच भाग सांगितला गेला, तर त्याचा विपरीत अर्थ काढला जातो आणि पुनश्च विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जातात. तशी संधी सावरकर विरोधकांना मिळू नये यासाठी पूर्वपीठिका सांगणे महत्त्वाचे ठरते.
सुभाषबाबू कलकत्त्याला गेल्यावर ते तेथील हॉलवेलचा पुतळा उखडून टाकण्याच्या कामात व्यस्त झाले. ब्रिटीश सरकारने त्यांना पकडून कारागृहात ठेवले. त्यानंतर ब्रिटीश सरकारच्या हातावर तुरी देऊन ते जर्मनीला निघून गेले. सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे हिंदु सैनिक इटली आणि जर्मनी यांच्या हाती सापडले. त्या सहस्रो ब्रिटीश हिंदी सैनिकांना जर्मनीच्या अद्ययावत् शस्त्रास्त्रांनी सज्ज करून भारतीय क्रांतीसेना उभारली. या क्रांतीसेनेच्या सैनिकांना ते ब्रिटीश सैन्यात असल्यामुळे ब्रिटिशांची युद्धनीती पूर्णपणे अवगत झाली होती. ही गोष्ट दृष्टीआड करून चालणार नाही. त्यांच्या या अनुभवाचा लाभ ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठीच पुढे उपयुक्त ठरला. तेच आता सुभाषबाबूंच्या भाषणातून आपल्याला कळणार आहे.
११. सुभाषबाबूंनी क्रांतीसैन्याचे सरसेनापतीपद स्वीकारणे
सुभाषबाबू जर्मनीतून पाणबुडीने जपानने जिंकलेल्या सिंगापूरला गेले. सिंगापूरहून ब्रिटीश सैनिक पळून गेल्यामुळे तिथे उरलेल्या शस्त्रास्त्रांच्या अपार साठ्याने तेथील ४० सहस्र हिंदी सैन्याने जपानच्या पाठिंबामुळे रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी क्रांतीसैन्य उभारले. सुभाषबाबू तिथे पोचल्यावर त्याच सैन्याचे सरसेनापतीपद त्यांनी स्वीकारले. त्याच शस्त्रबळाच्या जोरावर सुभाषबाबूंनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची जागतिक घोषणा केली. हिंदुस्थानचे अस्थायी राज्यशासन स्थापन केले. सिंगापूरहून ‘चलो दिल्ली’ची रणगर्जना करत ती क्रांतीसेना ब्रह्मदेश (आजचे म्यानमार) ओलांडून थेट आसामच्या दाराशी येऊन धडकली. ब्रिटीश सैन्याशी रणक्षेत्रात आपले सैन्य कसे लढले, याविषयीचा सर्व इतिहास सर्वांनाच माहीत आहे.

१२. सावरकर यांची सैनिकीकरणाची चळवळ लाभदायी ठरल्याचे नेताजी सुभाषबाबू यांनी सांगणे
सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे सावरकर यांनी चालू केलेली सैनिकीकरणाची चळवळ कशी लाभदायक ठरली, याकडे मला सर्वांचे लक्ष वेधायचे आहे. सावरकर यांच्या सैनिकीकरणामुळे स्वतंत्र सेनेला सैनिक मिळाले. हे सावरकर यांच्या राजनीतीचे वैशिष्ट्यपूर्ण यश होते. हिंदुस्थानच्या ब्रिटीश सैन्यात सहस्रो हिंदु सैनिकांची भरती करण्यासाठी सावरकर यांनी जे सैनिकीकरणाचे आंदोलन केले, त्यामुळे हे शक्य झाल्याचे विसरून चालणार नाही.
याचविषयी सिंगापूरमधील ‘आझाद हिंद आकाशवाणी’वरून २५ जून १९४४ या दिवशी प्रक्षेपित झालेल्या भाषणात सरसेनापती सुभाषबाबू म्हणाले, ‘काँग्रेसमधील बहुतेक अदूरदर्शी पुढारी ब्रिटीश हिंदी सैन्याला केवळ ‘भाडोत्री’ आणि ‘पोटभरू’ म्हणून सारखे हिणवत राहिले. तरीही उत्साहदायी हे आहे की, वीर सावरकर निर्भयपणे हिंदी तरुणांना ‘सशस्त्र सैन्यात भरती व्हा’, म्हणून सारखे उत्तेजित करत आहेत. ब्रिटीश हिंदी सैन्यात असलेल्या याच हिंदी तरुणांनी आज आमच्या हिंदी राष्ट्रीय सैन्याला युद्धकलेत प्रवीण आणि मुरलेल्या प्रतिपक्षांचा अन् सैनिकांचा पुरवठा होत आहे.’
१३. क्रांतीसैन्याने ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्याचे जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकार जे.सी. ओहसावा यांनी केलेले वर्णन
वर्ष १९५४ च्या ऑगस्ट महिन्यात जे.सी. ओहसावा या जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकाराचे ‘द टू ग्रेट इंडियन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात रासबिहारी बोस यांच्या चारित्र्याविषयी आणि खास करून जपानमधील वास्तव्याविषयी त्यांनी केलेल्या क्रांतीकारक कार्याचा अभूतपूर्व वृत्तांत दिला आहे. दुसर्या महायुद्धात जपानी सैन्य सिंगापूरवर चालून गेले. त्या वेळी तेथील ब्रिटीश हिंदी सैन्याशी जपानची लढाई झाली, तेव्हा सेनापती रासबिहारी बोस यांच्या क्रांतीकारक सैन्याची तुकडी ब्रिटिशांशी लढत होती. या ग्रंथकारांनी या प्रसंगासंबंधीच्या दैनंदिनीतील एक उतारा इथे सांगणे सयुक्तिक ठरेल.
‘फेब्रुवारी महिन्यात जपानने सिंगापूरवर आक्रमण केले. ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांचा अडथळा जबरदस्त होता. जपानमधील सैन्याला अनेक अडथळे दूर करण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागला. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आघाडीवर होते. ब्रिटीश सैनिकांना हिंदुस्थानातील हिंदी सैनिकांविषयी कोणत्याही प्रकारे आपुलकीची भावना नव्हती. त्यासह त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी आत्मीयता नव्हती, हे हिंदी सैनिकांना विशेषत्वाने जाणवले. त्याच क्षणी हिंदी सैनिकांनी सावरकर यांनी सांगितलेला मंत्र तात्काळ उपयोगात आणला. त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रे ब्रिटीश सैनिकांवर चालवली. अशा प्रकारे सावरकर यांच्या सैनिकीकरणाची चळवळ दुसर्या महायुद्धात आकाराला आली. ब्रिटीश सैन्यात सहभागी झालेले हिंदी आणि क्रांतीसेनेतील सैनिक यांनी एकत्रितपणे जेव्हा विजयाच्या घोषणा दिल्या, त्या वेळी जपानी सैनिकांची मती गुंग झाली.’
अशा प्रकारे जपानी सैन्याने सिंगापूर ताब्यात घेऊन स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. क्रांतीकारकांना असे यश मिळत असतांनाच हिंदुस्थानात स्वतःला नि:शस्त्रवादी आणि अहिंसक म्हणवणार्या काँग्रेसने नि:शस्त्र प्रतिकाराचा तिचा मार्ग तसाच चालू ठेवला आणि ही मंडळी ब्रिटिशांना सांगत होती, ‘ब्रिटिशांनो, हिंदुस्थान सोडा; पण तुमचे सैन्य मात्र हिंदुस्थानात ठेवा.’
१४. ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडावा लागण्यामागील ब्रिटीश पंतप्रधान ॲटलींनी सांगितलेले कारण
सावरकर यांची रणनीती यशस्वी झाली होती; म्हणूनच ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानातील स्वतःचा गाशा गुंडाळण्याचे ठरवले. ‘इंडिपेंडन्स ऑफ इंडियन ॲक्ट’च्या वेळी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये साम्राज्य सत्ता सोडण्याचा प्रसंग आल्यामुळे दुःखी कष्टी झालेल्या चर्चिलच्या अनेक प्रश्नांना निरुपायाने उत्तर द्यावे लागले. ब्रिटीश पंतप्रधान ॲटलींनी सरकारच्या मनाच्या सत्यस्वरूपाचे मोजक्या वाक्यात वर्णन करतांना म्हटले, ‘ब्रिटनला सत्तांतर करावे लागत आहे; कारण भारतीय सैन्य ब्रिटीश सरकारशी प्रामाणिक राहिले नाही. भारतावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सैन्य ब्रिटीश सरकार भारतात ठेवू शकत नाही.’ यातून हेच स्पष्ट होते की, सैनिकी दुर्बलतेच्या कारणामुळे ब्रिटिशांना हिंदुस्थानातून काढता पाय घ्यावा लागला.
१५. सावरकर यांच्या सैनिकीकरणामागची राजनीती विरोधकांना कळलीच नाही !
‘अहिंसेचे तत्त्वज्ञान आम्हाला पटल्यामुळे आमचे हृदय परिवर्तन झाले किंवा साम्राज्यवाद हा अन्यायकारक आहे, हे आम्ही स्वच्छेने स्वीकारले. त्यामुळे आम्ही हिंदुस्थान सोडून जात आहोत’, असे ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली म्हणाले नाहीत किंवा ब्रिटिशांच्या संसदेतील कोणताही सभासद असे म्हणाला नाही. ही गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळे ‘सावरकर यांच्या सैनिकीकरणामागची राजनीती त्यांच्या विरोधकांना एक तर कळली नसावी किंवा स्वतःची हार त्यांना मान्य नसावी म्हणूनच त्यांनी सावरकर यांच्या सैनिकीकरणाला विरोध करून ‘रिक्रूटवीर’ म्हणून त्यांची हेटाळणी केली’, असाच निष्कर्ष निघतो.
एवढेच नव्हे, तर ‘सावरकर यांनी क्षमा मागितली आणि स्वतःची सुटका करून घेतल्यावर त्यांनी कोणतेही कार्य केले नाही. केवळ ‘पेन्शन’ (निवृत्तीवेतन) घेत राहिले’, अशी सावरकर यांच्यावर टीका करणार्यांनीसुद्धा याकडे लक्ष द्यावे. म्हणूनच २२ जून १९४० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांच्या भेटीला ८६ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा लेख प्रपंच केला आहे.
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.६.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !