स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २२ जून १९४० या दिवशी झालेल्या भेटीला आज ८६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दुसर्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटीश सरकारला साहाय्य केले. त्यांनी भारतातील तरुणांना सैन्यात भरती होण्यास सांगितले; म्हणूनच म. गांधींनी ‘रिक्रूटवीर’ म्हणून सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर यांची रणनीती नेमकेपणाने जाणून न घेता त्यांच्या राजनीतीचा विपरित अर्थ काढला आणि त्यांना दोष दिला गेला. सावरकर यांनी कोणत्याही प्रकारे ब्रिटीश सरकारला कधीच साहाय्य केले नाही. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील जनतेची सावरकर यांनी कधीही दिशाभूल केली नाही कि फसगत केली नाही. गांधींनी ‘एका वर्षात स्वराज्य मिळवून देतो’, असे अभिवचन हिंदुस्थानातील जनतेला दिले; पण ते त्यांना पूर्ण करता आले नाही. ‘माझ्या देहाचे तुकडे होतील; पण मी देशाचे तुकडे करू देणार नाही’, असेही गांधी म्हणाले होते; पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. सावरकर यांच्या नसलेल्या चुका सांगत रहाणे, त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा धुमील करणे, हे न्यायसंगत आणि शिष्टाचार संमत आहे; पण इतरांच्या झालेल्या चुका अन् त्यांचे दोष व्यक्त करणे, याला आपल्या देशात बंदी आहे. त्याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत.
(भाग १)

१. सावरकर यांच्या रणनीतीच्या आधारे हिंदु महासभेच्या कार्यकारिणीने केलेला ठराव
१ सप्टेंबर १९३९ या दिवशी युरोपमध्ये दुसरे महायुद्ध चालू झाले. त्यानंतर १० दिवसांनी मुंबईला सरदारगृहात हिंदु महासभेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर निर्मलचंद चटर्जी, डॉ. वरदराजलु नायडू, डॉ. मुंजे, भोपटकर, चांदकिरण सारडा, भाग्यनगरचे वीर यशवंतराव जोशी, डॉ. परांजपे, बॅरिस्टर जमनादास मेहता असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत दुसर्या महायुद्धावर सावरकर यांच्या रणनीतीच्या अनुरोधाने एक ठराव पारित करण्यात आला तो असा,
‘या महायुद्धात केवळ लोकशाहीच्या रक्षणाच्या परहित बुद्धीने आपण भाग घेत आहोत, अशी घोषणा साम्राज्यवादी देशांनी केली होती. यावर हिंदु महासभेचा अजिबात विश्वास नाही. हिंदुस्थानाला पारतंत्र्यात ठेवणार्या ब्रिटनला खरोखरच तशी तळमळ असेल, तर हिंदुस्थानच्या संबंधात त्याने तशी कृती प्रथम करावी ! हिंदुस्थानचे परचक्रापासून रक्षण करणे, हे हिंदुस्थान आणि ब्रिटन यांचे दोघांचेही उत्तरदायित्व आहे. त्यामुळे पुढील गोष्टी लागलीच कराव्यात…
अ. केंद्रात दायित्व पूर्ण राज्यपद्धत चालू करावी.
आ. जातीय निर्णयातील अन्याय समाप्त करावेत.
इ. हिंदी सेना ही लोकांची सेना आहे, अशी भावना निर्माण करावी.
ई. या हिंदी सेनेचे हिंदीकरण करावे. तिच्यातील ‘लढाऊ’ आणि ‘विनालढाऊ जाती’, असे भेद नष्ट करावेत.
उ. शस्त्र निर्बंध काढावा. संरक्षणाच्या सर्व शाखांत हिंदी लोकांना प्रवेश द्यावा.
ऊ. हिंदुस्थानात सैन्यविषयक कारखाने काढून विमाने मोटारी इत्यादींचे उत्पादन करावे.
ए. ‘सैन्यात हिंदु तरुणांनी भरती व्हावे’, असा आदेश देणारा ठरावही पारित करण्यात आला.’
या वरील ठरावात समाविष्ट असलेला कोणताही मुद्दा ब्रिटीश सरकारला साहाय्य करणारा आहे, असे म्हणता येत नाही. या ठरावानंतर सावरकर यांची हिंदुस्थानातील धारवाड, हुब्बळ्ळी अशा अनेक भागांत ‘युरोपातील महायुद्ध’ या विषयावर भाषणे झाली.

२. सावरकर आणि व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भेटीचा वृत्तांत
सावरकर लोकनेते होते. त्यांची विजिगीषु वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच तेजस्वी वलयाच्या वैभवाने संपन्न असलेले सावरकर देहलीला व्हाईसरॉयला लॉर्ड लिनलिथगो यांना भेटण्यासाठी सोमवार, ९ ऑक्टोबर १९३९ या दिवशी सकाळी १० वाजता गेले. या भेटीत सावरकर लॉर्ड लिनलिथगो यांना म्हणाले, ‘मी अजून क्रांतीकारकच आहे. राजकीय परिस्थिती आणि ताळतंत्र यांच्या आवश्यकतेमुळे सरकारशी सैनिकीकरणाच्या संबंधात सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे सैन्यातील आतापर्यंतच्या हिंदी तरुणांना डावलणार्या दुःस्थितीची अयोग्यता मी तुमच्या दृष्टीस आणून दिली आहे. वायव्य सीमेवर केवळ हिंदु, शीख आणि गुरखा पलटणीच ठेवण्याची कारणे मी तुम्हाला विशद केली आहेत.’
‘हिंदुस्थानवर शत्रूचे आक्रमण पूर्वेकडून होईल’, असे सांगून सावरकर यांनी त्या वेळच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचे सुस्पष्ट विवेचन केले. त्यानंतर त्यांनी लॉर्ड लिनलिथगो यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘या महायुद्धात इंग्लंड देशांच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहे. यावर आमचा विश्वास नाही. सगळे देश स्वतःचा राष्ट्रीय स्वार्थ साधण्यासाठी युद्धात सहभागी झाले आहेत. आम्हीसुद्धा या घटनेकडे स्वार्थाच्या दृष्टीनेच पहात आहोत. हिंदुस्थानच्या हितासाठीच युद्ध संपल्यावर हिंदुस्थानला वसाहतीचा दर्जा आणि त्याची हमी पटावी; म्हणून मध्यवर्ती सरकारमध्ये भारतियांचे बहुमत असले पाहिजे. राज्यव्यवस्थेत ‘एक मनुष्य एक मत’ या तत्त्वाचा अंगीकार करावा. सैनिकी आक्रमणापासून देशाच्या संरक्षणात आम्ही स्वार्थासाठीच सहकार्य करू. सीमा प्रांतात टोळीवाल्यांकडून आणि इस्लामी राष्ट्रांकडून भय आहे. त्यासाठी तिथे प्रचंड हिंदु सैन्यच ठेवावे. देशात ‘रायफल्स क्लब्स’ना मोकळीक देण्यात यावी. हे सहकार्य आम्ही आमच्या लाभासाठी करत आहोत’, असेही सावरकर यांनी स्पष्ट सांगितले होते.
३. म. गांधींची लॉर्ड लिनलिथगो यांच्याशी झालेली ब्रिटीशधार्जिणी भेट
सावरकर यांच्यावर आरोप करतांना गांधींनी काय केले, हे सांगणे नितांत आवश्यक आहे. सावरकर यांना दोष देणारे गांधींची रणनीती ब्रिटीश सरकारला कसे साहाय्य करणारी होती, हे इथे सांगितले गेलेच पाहिजे. गांधीसुद्धा लॉर्ड लिनलिथगो यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या भेटीत गांधी लॉर्ड लिनलिथगो यांना म्हणाले, ‘ब्रिटनच्या पार्लमेंटवर आणि लोकांवर जर्मनांचे बाँब पडून ते उद्ध्वस्त होण्याची कल्पना आम्हाला करवत नाही. या ठिकाणी प्रसंगात आमची स्वातंत्र्याची मागणीच केवळ पुढे रेटून मला ब्रिटीश सरकारला पेचात आणायचे नाही.’
४. काँग्रेस आणि तिचे तत्कालीन गृहमंत्री यांनी गृहविभागाच्या सचिवांकडे व्यक्त केलेला सावरकरद्वेष
‘सावरकर ब्रिटीश सरकारला साहाय्य करत होते’, असा आरोप करणार्यांनी, जुलै १९३७ च्या अखेरीस काँग्रेस मंत्रीमंडळाने आणि कन्हैयालाल मुंशी या गृहमंत्र्यांनी त्या वेळी सावरकर यांच्या भाषणाविषयी गृहविभागाच्या सचिवाला सांगितले, ‘माझ्या मते सावरकर जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढेच धोकादायकही आहेत. ते आता भाषणे करत आहेत. अशा केवळ एका भाषणासाठी बापटांना ७ वर्षांची शिक्षा झाली. अशा प्रकारे, म्हणजे तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आवाहन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सभांमधून सावरकर यांना भाषण करू देण्यात धोका आहे. असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. सावरकर यांना स्वतंत्र राहू देण्यात सरकार फार गंभीर दायित्व स्वीकारत राहील !’ यावरून काँग्रेसला आणि तिच्या गृहमंत्र्यांना सावरकर यांची भूमिका राष्ट्रहिताची असतांनाही ब्रिटिशांना अडचणीत आणणारी आहे, असे वाटत होते, त्याचाच हा पुरावा आहे.
(क्रमशः)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१६.६.२०२६)
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !
राष्ट्रभक्त शास्त्रज्ञ !
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!
ध्यान
हठयोग