निरोगी वृद्धत्वासाठी योग शक्य आहे का ?

‘वर्ष २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ (योगा फॉर हेल्दी एजींग) ही मध्यवर्ती संकल्पना आहे. आपल्याकडे ‘१०० वर्षांहून अधिक काळ जगले’, असा उल्लेख असलेल्या योग्यांची उदाहरणे या ना त्या कारणाने समोर येतात. उदाहरणार्थ योगी चांगदेव, योगी लाहिरी महाशय इत्यादी. आपल्याकडे जुन्या ग्रंथांमध्ये अशी आणखीही उदाहरणे आहेत. वैज्ञानिक दृष्टीने हे शक्य नाही, अशीही सामान्य धारणा असते. या पार्श्‍वभूमीवर ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ खरेच कितपत शक्य आहे ? वयोवृद्ध लोक खरोखरच योग करू शकतात का ? या कल्पनेला काही वैज्ञानिक आधार आहे का ?, असे प्रश्‍न काहींना पडतील. या प्रश्‍नांची उत्तरे आपण या लेखातून पहाणार आहोत. 

१. वृद्ध लोक कितपत योग करू शकतात ?  

योग (योगा) करायचे, तर त्यात पुष्कळ आसने करावी लागतात, ती कठीण असतात इत्यादी प्रकारच्या समजुतींमुळे हा प्रश्‍न असतो. वास्तवात तसे नाही. वय, तसेच व्याधीनुसार करण्यायोग्य अनुरूप आसने उपलब्ध आहेत आणि दुसरे, म्हणजे प्रत्यक्ष नियमितपणे आसने करू लागल्यानंतर स्वत:लाच जे सकृतदर्शनी कठीण वाटत होते, तसे ते कठीण नव्हते, हे स्पष्ट होते. अर्थात् वृद्धांनी योग करतांना तज्ञांचा सल्ला घ्यावा. निरोगी वृद्धत्व यांत वृद्धत्वाची लक्षणे न्यूनतम असणे, म्हणजे निरोगीपणा हे अनुस्यूत आहे.

२. वृद्धत्वाची लक्षणे 

वय वाढते तशी इंद्रियांची क्षमता न्यून होत जाते. त्यामुळे काही लक्षणे दिसू लागतात. उदाहरणार्थ केस गळणे, त्वचेला सुरकुत्या पडणे, विसरणे, पचनक्षमता न्यून होणे, हालचाली मंद होणे, त्या कठीण होणे, पूर्वीसारखे वजन उचलायला न जमणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याचे कारण, म्हणजे संबंधित इंद्रियांच्या मेलेल्या पेशींमुळे झालेली हानी पूर्ववत् भरून निघत नसते. हे अधिक समजण्यासाठी पुढचे सूत्र वाचावे.

३. पेशींच्या स्तरावरील वृद्धत्व 

मनुष्य देह हा विविध प्रकारच्या कोट्यवधी पेशींनी बनलेला असतो. पेशी जितक्या चांगल्या रितीने कार्यरत असतील, तेवढे त्या त्या इंद्रियाचे कार्य चांगले रहाते. यासाठी बहुतांश इंद्रियांमध्ये जुन्या पेशी मृत होऊन त्यांची जागा त्याच प्रकारच्या नवीन पेशींनी घेणे, ही प्रक्रिया अव्याहत चालू असते. उदाहरणार्थ तरुणपणामध्ये प्रत्येक २ ते ४ आठवड्यांनी (अनुमाने १४ ते २८ दिवस) त्वचेच्या पेशी पूर्णपणे पालटल्या जातात. प्रत्येक १ आठवड्यापेक्षाही न्यून वेळात (अनुमाने ३ ते ५ दिवसांत) पचनसंस्थेच्या (विशेषतः लहान आणि मोठ्या आतड्याच्या) आतील आवरणाच्या पेशी पूर्णपणे पालटल्या जातात. प्रत्येक पेशी ५० ते ७० वेळा विभाजित होऊ शकत असते. जीवनात होत असलेले मधुमेहादी विविध प्रकारचे आजार, धूम्रपान, तंबाखू आदी चुकीच्या सवयी आणि मानसिक तणाव, अशा विविध कारणांमुळे देहावर ताण येत असतो.

(या संदर्भातील अधिक माहितीसाठी २१ डिसेंबर २०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !’ या विषयासंबंधीच्या लेखात पुढे दिलेल्या लिंकवर वाचावे. https://sanatanprabhat.org/marathi/865491.html)

हा ताण ‘डी.एन्.ए.’च्या कार्यावर परिणाम करतो. ‘डी.एन्.ए.’ नादुरुस्त झाला की, पेशी मरतात. मग त्या इंद्रियांची क्षमता न्यून होते. यातून जुन्या पेशींची जागा घेणार्‍या नवीन पेशी उत्तम रितीने सिद्ध होत रहाणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. वृद्धत्वामध्ये नवीन पेशी सिद्ध होणे, ही प्रक्रिया हळू होत जाते. हे का होते ?

‘एम्स, देहली’ येथील वैज्ञानिक जगताला थक्क करणारे संशोधन


देहली येथील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान’ (एम्स) येथे वर्ष २०१७ मध्ये ९६ व्यक्तींवर सलग १२ आठवडे प्रयोग करण्यात आले. या व्यक्तींनी प्रतिदिन नियमितपणे प्रार्थना, ‘वॉर्मअप’ (प्रारंभीचे व्यायाम), विविध योगासने, प्राणायाम, ध्यान, ओंकार ध्वनी आणि शांतीमंत्र असे ठरवून दिलेले सत्र केले. 


१. संशोधनातून स्पष्ट झालेले परिणाम : या प्रयोगातून नियमित योग केल्यास मानवी शरिराला विविध प्रकारे लाभ होतात आणि त्यातून ‘निरोगी वृद्धत्वाकडे जायची गुरुकिल्ली – योग’ हे दिसून आले.


१ अ. ‘अमरत्व रसायनात’ वाढ : प्रयोगात सहभागी व्यक्तींच्या रक्तातील ‘टेलोमरेझ’ (Telomerase) ‘एन्झाईम’ची पातळी लक्षणीयरित्या वाढली. या वाढलेल्या ‘टेलोमरेझ’ने ‘टेलोमियर्स’ची डागडुजी तत्परतेने केली आणि त्यांची लांबी सुरक्षित ठेवली, म्हणजेच योगाने शरिराचे जैविक घड्याळ एकप्रकारे उलट फिरवण्यासारखे (Reverse aging) काम पेशींच्या पातळीवर केले. 


१ आ. अन्य रसायनांतील लाभकारी पालट : जीवनातील ताणामुळे शरिरात सिद्ध होणार्‍या पेशींची हानी करणार्‍या रसायनांत घट झाली. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा वाढला. मेंदूतील रक्तवाहिन्या निरोगी राखण्यात साहाय्य झाले. मेंदूच्या पेशींच्या आरोग्यासाठी आवश्यक रसायनांमध्ये (हे जणू मेंदूच्या पेशींसाठी खत असते) वाढ झाली. 


– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

४. जैविक घड्याळ आणि अमरत्वाचे रसायन 

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

पेशींमध्ये गुणसूत्रे (क्रोमोसोम) असतात. त्यांच्यावर त्या त्या पेशीचे कार्य अवलंबून असते. प्रत्येक गुणसूत्रामध्ये ‘डी.एन्.ए.’ असतात. एका पेशीपासून नवीन पेशी सिद्ध होणे, यासाठी माता पेशीतील गुणसूत्रांतील ‘डी.एन्.ए.’ची प्रत कन्या पेशीमध्ये जशीच्या तशी सिद्ध केली जात असते. ‘डी.एन्.ए.’वर कोणताही आघात होऊ नये, यासाठी गुणसूत्रांच्या चारही टोकांना ४ संरक्षक टोप्या असतात. ज्यांना ‘टेलोमियर्स’ म्हणतात. नवीन पेशीसाठी ‘डी.एन्.ए.’ची नवीन प्रत सिद्ध होतांना या ‘टेलोमियर्स’ची हानी होऊन ती आखूड बनत जातात. ‘टेलोमियर्स’ची दुरुस्ती करून त्यांना पूर्ववत् करायचे कार्य ‘टेलोमरेज’ नावाचे रसायन (enzyme) करत असते. हे आपल्या शरिरात नैसर्गिकरित्या सिद्ध होते. जर रक्तातील ‘टेलोमरेझ’ची मात्रा चांगली असेल, तर ‘टेलोमियर्स’ लहान होण्याचा वेग मंदावतो. परिणामी नवीन पेशी सहज सिद्ध होऊन त्या दीर्घकाळ कार्यरत रहातात. सामान्यतः वयानुसार शरिरातील ‘टेलोमरेझ एन्झाईम’चे प्रमाण न्यून होत जाते आणि त्यामुळे स्वाभाविक ‘टेलोमियर्स’ची दुरुस्ती प्रक्रिया अकार्यक्षम बनत ती आखूड होत जातात. एका मर्यादेच्या पुढे ‘टेलोमियर्स’ आखूड झाल्यानंतर त्या पेशीची नवीन पेशी निर्माण करायची क्षमता संपते. ती पेशीही मरून जाते. मग पुढील दुष्टचक्र गती घेते. इंद्रिये वेगाने अकार्यक्षम बनत जातात. थोडक्यात ‘टेलोमियर्स’ हे गुणसूत्रांचे आयुष्य मोजणारे जैविक घड्याळ, तर ‘टेलोमरेझ’ त्या घड्याळाची झीज रोखणारी चावी (अमरत्वाचे रसायन) आहे ! योगामुळे नेमक्या याच प्रक्रियेवर सकारात्मक प्रभाव पडतो.

 

टेलोमियर्सची प्रातिनिधिक आकृती

टेलोमियर्सनी (पांढरे) टोके झाकलेली मानवी गुणसूत्रे (राखाडी)

५. निष्कर्ष 

वृद्धत्वामध्ये होणारी मेंदू आणि शरीर यांची झीज नैसर्गिक असली, तरी योग हा ती झीज रोखणारा अन् शरिराला गुणसूत्रांच्या पातळीवर तरुण ठेवणारा एक प्रभावी वैज्ञानिक मार्ग आहे. योग प्रत्येकाने करावा, जो करील त्याने तो नियमितपणे करावयासाठी हा लेखन प्रपंच ! त्यामुळे तरुणांनी वृद्धत्व शक्य तितके पुढे ढकलण्यासाठी आणि वृद्धांनी वय

वाढले असूनही क्षमता शक्य तितकी राखण्यासाठी अर्थात् निरोगीपणासाठी तरी योग नियमित करावा. यामुळे मानवी जीवनाचे ध्येय, म्हणजे स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करणे, हे योगाचे मूळ उद्दिष्ट साध्य करणे अधिक सोपे बनते; म्हणून मग त्यासाठीही प्रयत्न करावेत.’

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन) रामनाथी, गोवा. (१४.६.२०२६)

वृद्धत्वामध्ये होणारी मेंदू आणि शरीर यांची झीज नैसर्गिक असली, तरी योग हा ती झीज रोखणारा अन् शरिराला गुणसूत्रांच्या पातळीवर तरुण ठेवणारा एक प्रभावी वैज्ञानिक मार्ग आहे.