कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !

काही वर्षांपूर्वी देशात सोडा; पण कर्नाटकातही कुणी ओळखत नसलेले (अ)परिपक्व व्यक्तीमत्त्ववाले प्रियंक खरगे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर झळकण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘लहान तोंडी मोठा घास’, या म्हणीला शोभणार्‍या प्रियंक खरगे यांच्याविषयी कर्नाटकमधील जनतेला बरीच माहिती आहे, तरी कर्नाटकच्या बाहेरील लोकांना त्यांच्या महानतेविषयी (?) तोंडओळख करण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न…

१. घराणेशाही आणि राजकीय वारसा यांचे पाठबळ

प्रियंक खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र आहेत. भारतीय राजकारणात आणि त्यातही काँग्रेस पक्षात घराणेशाहीचे सूत्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच अनुषंगाने ‘पित्याच्या नावामुळेच मंत्रीपद (गृहखाते, ‘आयटी-बीटी (माहिती-तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान)’, ग्रामीण विकास मंत्री ) मिळाले’, अशी लोकांमध्ये चर्चा होत आहे.

श्री. प्रशांत हरिहर

२. उच्च शैक्षणिक पात्रता नसतांना मंत्रीपद

प्रियंक खरगे यांच्या शैक्षणिक पात्रतेवरही अनेकदा सामाजिक माध्यमे आणि राजकीय वर्तुळ या दोन्हींमध्ये बोट ठेवले जाते. ‘माय नेता’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार खरगे यांनी इयत्ता १० वी आणि ११ वी उत्तीर्ण झाल्याचे, तसेच एक ‘सर्टिफिकेट कोर्स’ (संगणक, कला आणि ‘ॲनिमेशन’ यांविषयीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम) पूर्ण केल्याचे दिसून येते. एवढे साधे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे उच्चशिक्षण झालेले नसतांना त्यांच्याकडे उच्च तंत्रज्ञान क्षेत्राचे (आयटी-बीटी) मंत्रीपद दिले जाण्यावरून अनेकदा प्रश्न विचारले जात आहेत.

३. खरगे यांच्या मतदारसंघातील शैक्षणिक स्थिती 

प्रियंक खरगे हे कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या जिल्ह्यातील चालू वर्ष असलेल्या, म्हणजे २०२६ च्या १० वीच्या निकालाची टक्केवारी संपूर्ण कर्नाटक राज्यात सर्वांत खाली आहे आणि तसे बर्‍याचदा आढळले आहे. असे असतांना आपल्या मतदारसंघातील मूलभूत शिक्षण सुधारण्याऐवजी ते राष्ट्रहितार्थ कार्य करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी स्वतःचा द्वेष व्यक्त करतात.

४. खरगे यांचा रा.स्व. संघाला विरोध आणि मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे संघाविषयीचे कौतुकोद्गार

प्रियंक खरगे हे रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यावर टीका करण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांची विधाने ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा प्रकारची असतात. खरेतर त्यांना राष्ट्र्रीय स्तरावरील राजकीय अनुभव नाही. दुसरीकडे २१ ऑगस्ट २०२५ या दिवशी कर्नाटक सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक विधानसभेत रा.स्व. संघाचे ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ ही प्रार्थना गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. एवढेच नव्हे, तर ‘कर्नाटकमध्ये रा.स्व. संघ कशा प्रकारे कार्य करत आहे, हे मी एक नेता म्हणून अभ्यास केला आहे. संघ प्रत्येक जिल्हा आणि तालुका येथील शाळा कशा प्रकारे नियंत्रणात घेत आहे अन् त्यात मोठ्या प्रमाणात पैसा कसा गुंतवत आहे ? संघवाले मुलांना चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे कौतुकोद्गारही शिवकुमार यांनी काढले होते.

सविस्तर वृत्त वाचा → Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’

थोडक्यात सांगायचे, तर प्रियंक खरगे हे सध्या कर्नाटकच्या राजकारणातील एक असे व्यक्तीमत्त्व आहेत, जे आपल्या विधानांमुळे राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु स्थानिक पातळीवर त्यांच्यावर घराणेशाही, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि मतदारसंघातील विकासकामे यांवरून सातत्याने टीका होत आहे. रा.स्व. संघाच्या अतुलनीय आणि महनीय कार्यासारखे किंचित्ही कार्य न केलेल्या अशा व्यक्तीने विरोध वा टीका करणे, म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करण्याचाच भाग आहे, हे निश्चित !

– श्री. प्रशांत हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२६)