देशात अगदी अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटना वरवर पहाता स्वतंत्र वाटू शकतात; परंतु जर आपण या बिंदूंची साखळी जोडली, तर त्यातून एक अत्यंत गंभीर आणि व्यापक चित्र समोर येते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे कॉकरोच संदर्भातील वक्तव्य आणि त्यानंतर अवघ्या काही घंट्यांत समाजमाध्यमांवर उभा राहिलेला ‘कॉकरोच जनता पार्टी’सारखा ‘ट्रेंड’ (समाजमाध्यमांवर केलेली चर्चा), भारतात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे जागतिक आरोप, ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये (माध्यम स्वातंत्र्यामध्ये) भारताचा क्रमांक खाली घसरवल्याचे परदेशी अहवाल; ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत’, यावरून होणारी आक्रमक कोंडी आणि काही विशिष्ट व्यक्तींना अचानक राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणून बसवणे, या सर्व घडामोडींकडे केवळ ‘योगायोग’ किंवा स्वतंत्र प्रसंग म्हणून पहाणे, ही घोडचूक ठरेल. आज देश केवळ राजकीय संघर्षाला तोंड देत नसून एका मोठ्या कथानकांच्या युद्धाला (‘नॅरेटिव्ह वॉर’ला), मानसिक प्रभावाच्या युद्धाला (‘सायकॉलॉजिकल वॉर’ला) आणि माहितीच्या गैरवापरातून समाजमन नियंत्रित करण्याच्या जागतिक मोहिमेला तोंड देत आहे.

१. एका शब्दाचे रूपांतर कथानकात
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयीन सुनावणीच्या वेळी काही विघ्नसंतोषी घटकांविषयी बोलतांना ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ हे शब्द वापरल्याचे वृत्त समोर आले. यानंतर काही मिनिटांतच हा विषय समाजमाध्यमांवर वणव्यासारखा पसरवण्यात आला. नकारात्मक वातावरण निर्मिती केली. अनेक मुख्य प्रवाहातील माध्यमे, डिजिटल पोर्टल्स आणि समाजमाध्यमे हाताळणारे असे पद्धतशीर वातावरण सिद्ध केले की, जणू हा देशातील सामान्य युवक, बेरोजगार वर्ग किंवा लोकशाही मार्गाने सरकारविरोधी मत मांडणार्यांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.

नंतर या वक्तव्याचा मूळ संदर्भ वेगळा असल्याचे स्पष्टीकरण आले खरे; परंतु तोपर्यंत जनमानसात चुकीच्या भावना प्रज्वलित झाल्या होत्या, पूर्वग्रहदूषित निष्कर्ष सिद्ध झाले होते आणि डिजिटल जगताने नियोजित कथानक प्रस्थापित केले होते. सत्य बाहेर पडेपर्यंत असत्याने जगभर घोडदौड पूर्ण केलेली असते, हेच आजचे वास्तव आहे.

२. कॉकरोच जनता पार्टी व्यंग कि सुनियोजित मोहीम ?
त्या वक्तव्यानंतर लगेचच ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने समाजमाध्यमांवर एक व्यापक डिजिटल मोहीम चालू झाली. ‘मीम्स’ (व्यंगचित्रे), ‘पोस्ट्स’ (लिखाण), ‘हॅशटॅग’ आणि व्हिडिओ यांचा अक्षरशः पूर आणला गेला. हे सूत्र केवळ विनोदाचे किंवा व्यंगाचे नाही, तर त्यामागील वेग, समन्वय आणि दिशा यांचे आहे. एका छोट्याशा शब्दाच्या आधारे काही घंट्यांत इतका प्रचंड डिजिटल प्रतिसाद संघटितपणे उभा रहाणे, हे आजच्या माहिती व्यवस्थेची विध्वंसक शक्तीचे दर्शक आहे. समाजमाध्यमे आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर ते जनमत, मानवी भावना आणि मानसिक वातावरण कलुषित करणारे सर्वांत प्रभावी व्यासपीठ बनले आहे. अर्धसत्य माहिती, संदर्भाबाहेरच्या भावनिक ध्वनीचित्रफिती, सोयीस्कर संपादन आणि ‘ट्रेंडिंग हॅशटॅग’ यांच्या माध्यमातून समाजाच्या विचारसरणीवर ताबा मिळवला जातो. आजची लढाई केवळ रस्त्यांवर राहिलेली नाही, ती थेट माणसाच्या भ्रमणभाषच्या पडद्यावर आणि पर्यायाने त्याच्या मेंदूत लढली जात आहे.
३. भारताची जागतिक प्रतिमा सतत लक्ष्य का बनते ?
नेमक्या याच कालखंडात काही परदेशी संस्थांकडून भारतातील मानवी हक्क, ‘प्रेस फ्रीडम’, लोकशाही आणि अल्पसंख्यांकांचे अधिकार यांविषयीचे अत्यंत नकारात्मक अहवाल एका पाठोपाठ एक प्रसिद्ध केले जातात. लोकशाहीत विधायक टीका ही आवश्यकच असते; पण प्रश्न असा आहे की, भारताविषयी नकारात्मकता पसरवणारे हे कथानक इतक्या सातत्याने आणि जागतिक स्तरावर एकाच वेळी का रेटले जाते ?
आज जागतिक पटलावर ‘डीप स्टेट’ (अदृश्य शक्ती), माहिती युद्ध, खोट्या कथानकांचे नियंत्रण आणि समजूतीचे व्यवस्थापन हे केवळ बौद्धिक शब्द राहिलेले नाहीत. अनेक देशांमधील राजकीय उलथापालथ, माध्यम मोहिमा, निवडणुकांमधील समाजमाध्यमांचा हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय दबाव तंत्र यांमधून हे वास्तव जगासमोर आले आहे. या नव्या शस्त्रांद्वारे देशांची प्रतिमा डागाळली जाते, समाजात व्यवस्थेविषयी अविश्वास पेरला जातो, टोकदार मानसिक ध्रुवीकरण घडवून आणले जाते आणि लोकांच्या स्वतंत्र विचारशक्तीवर आक्रमण केले जाते.
वेगाने महासत्तेकडे झेपावणारा, स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवणारा आणि जागतिक प्रभाव वाढवणारा आजचा भारत अशा माहिती युद्धाच्या कचाट्यातून सुटू शकत नाही.
४. पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद : प्रश्न कि मोठ्या व्यूहरचनेचा भाग ?
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत’, हे सूत्र सातत्याने ऐरणीवर आणले जाते. लोकशाहीत सरकारला जाब विचारणे आणि प्रश्न उपस्थित करणे, हा जनतेचा अधिकार आहे; परंतु अनेकदा हा एकच मुद्दा अशा टोकाच्या पद्धतीने मांडला जातो की, जणू काही भारतात लोकशाहीचा पूर्णपणे गळा घोटला गेला आहे. वास्तव मात्र याच्या अगदी उलट आहे. भारतात नियमितपणे पारदर्शक निवडणुका होतात, शांततापूर्ण मार्गाने सत्तांतरे होतात, देशाचे सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी सरकारच्या धोरणांविरोधात निकाल देते, समाजमाध्यमांवर नागरिक आणि माध्यमे सरकारवर उघडपणे कडाडून टीका करतात अन् देशातील काही राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे पूर्ण शक्तींनी कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारच्या धोरणांवर ‘टीका करणे’ आणि थेट भारतालाच ‘हुकूमशाही किंवा फॅसिस्ट देश’ म्हणून रंगवणे यात स्पष्ट तफावत आहे. हा निव्वळ लोकशाहीचा पुळका नसून भारताला जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा एकतर्फी आणि संघटित प्रचार आहे.

५. अचानक चमकणारे चेहरे आणि ‘डिजिटल इकोसिस्टम (यंत्रणा)’
आजकाल एखादी सर्वसामान्य व्यक्ती अचानक राष्ट्रीय चर्चेचा मुख्य चेहरा बनते. काही घंट्यांतच त्या व्यक्तीचे व्हिडिओ, मुलाखती आणि लिखाण सर्व समाजमाध्यमांवर ओसंडून वाहू लागते. हे सर्व चक्र पूर्णपणे नैसर्गिक किंवा उत्स्फूर्त असतेच असे नाही; किंबहुना त्यामागे एक मोठी यंत्रणा असते. आज आधुनिक डिजिटल नेटवर्क, ‘अल्गोरिदम’चे गणित, आयटी सेल्स, ट्रोल यंत्रणा, प्रभावशाली माध्यमे आणि एकमेकांशी जोडलेली समन्वित समाजमाध्यमांवरील मोहिमांच्या माध्यमातून विशिष्ट विषयांना जनमानसात कोंबले जाते. येथे आधी समाजमन कलुषित करण्यासाठी ‘भावना’ आणि ‘कथानक’ सिद्ध केले जाते अन् त्यानुसार मग सोयीची ‘तथ्ये’ शोधली किंवा घडवली जातात.
६. हिंदु समाजाने समजून घ्यावे !
भारतातील सामान्य हिंदु समाज हा स्वभावतःच अत्यंत उदार, सर्वसमावेशक, भावनाप्रधान आणि संवेदनशील आहे. धर्म, परंपरा, प्राचीन संस्कृती आणि राष्ट्र यांच्याशी त्याची नाळ भावनिक पातळीवर घट्ट जोडलेली आहे. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धा, परंपरा किंवा अस्तित्व यांच्याशी संबंधित प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया उमटणे पूर्णपणे स्वाभाविक आहे; मात्र आज सामान्य हिंदूला एका दुटप्पी वास्तवाचा प्रकर्षाने सामना करावा लागत आहे. हिंदु समाजाने स्वतःचे न्याय्य हक्क किंवा आघात यांवर आवाज उठवला की, त्याला लगेच ‘कट्टरपंथी’, ‘मूलतत्त्ववादी’, ‘ध्रुवीकरण करणारे’ किंवा ’बहुसंख्यांकवादी’, अशी नकारात्मक लेबले लावली जातात. दुसरीकडे इतर समुदायांच्या संघटित आणि अनेकदा आक्रमक भूमिकेला मात्र ‘हक्क’, ‘अस्तित्वाचा संघर्ष’ किंवा ‘संवैधानिक मागणी’ म्हणून तात्काळ पुरोगामी मान्यता दिली जाते. हा दुटप्पीपणा अस्वस्थता निर्माण करतो.
भारत समर्थक भूमिका

आजच्या बौद्धिक लढाईत स्वतःच्या विचारांचा केंद्रबिंदू कोणताही एक राजकीय पक्ष असण्याची आवश्यकता नाही. पक्ष पालटतात, सरकारे पालटतात, नेते पालटतात आणि ‘ट्रेंड’ पालटतात; मात्र भारत कायम राहील, संस्कृती कायम राहील आणि प्राचीन हिंदु सभ्यता कायम राहील. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, हिंदु संस्कृती आणि सभ्यता यांचा अभिमान बाळगणे, जागतिक खोट्या प्रचाराच्या विरोधात बौद्धिक पातळीवर जागरूक रहाणे आणि देशांतर्गत, तसेच बाह्य मानसिक आक्रमणांविषयी सदैव सजग रहाणे, म्हणजेच भारत समर्थनार्थ भूमिका होय.
– श्री. मकरंद मुळे
श्रीराममंदिर, काशीविश्वेश्वर, तेजोमहल, बेकायदेशीर धर्मांतर, हिंदूंची सुरक्षा, लोकसंख्येचे असंतुलन किंवा हिंदु संस्कृतीशी संबंधित संवेदनशील विषयांकडे नेहमीच संशयाच्या दृष्टीने पाहिले गेले आहे. या पद्धतशीर दुटप्पीपणामुळे आज सामान्य हिंदु समाजात एक सुप्त असुरक्षितता आणि मानसिक दडपणाची भावना निर्माण होत आहे.
७. सजगता आणि विवेक यांची आवश्यकता
आज हिंदु समाजासमोरील सर्वांत मोठे आव्हान हे केवळ बाह्य शत्रूंचे नाही, तर ते अंतर्गत मानसिक आणि वैचारिक पातळीवरचे आहे. या माहिती युद्धाचा सामना करण्यासाठी पुढील सूत्रांची नितांत आवश्यकता आहे –

अ. समाजमाध्यमांवर प्रसारित होणारी प्रत्येक गोष्ट, म्हणजे अंतिम सत्य नव्हे. कोणतेही लिखाण पुढे पाठवण्यापूर्वी ते पडताळून पहाण्याची सवय अंगीकारली पाहिजे.
आ. केवळ भावनिक न होता त्यामागील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारण यांचा हेतू समजून घेतला पाहिजे.
इ. प्रत्येक वैयक्तिक किंवा राजकीय मतभेद यांपेक्षा भारताच्या दीर्घकालीन राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
ई. देशातील प्रत्येक टीका देशविरोधी नसते, हे जितके खरे आहे, तितकेच प्रत्येक नकारात्मक आणि सुनियोजित कथानक निष्पाप किंवा निरपराध नसते, हेही समजून घेतले पाहिजे.
८. लढाई सीमांवर नाही, तर मनात !
आज भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा संघर्ष केवळ भौगोलिक सीमांपुरता किंवा बंदुकीच्या आतंकवादापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता माहितीच्या शस्त्रांद्वारे, समाजमाध्यमांच्या ‘हॅशटॅग’द्वारे, वैचारिक प्रभावाद्वारे आणि पूर्वग्रहदूषित कथानकांच्या माध्यमातून आपल्या घराघरांमध्ये पोचला आहे. सरन्यायाधिशांच्या एका कॉकरोच वक्तव्यावरून पेटवले गेलेले राजकारण हेच अधोरेखित करते की, एका साध्या शब्दाचे काही घंट्यांत देशाच्या मानसिक आरोग्याला वेठीस धरणार्या संघर्षात रूपांतर केले जाऊ शकते.
अशा या कठीण काळात सामान्य हिंदु समाजाने स्वतःच्या महान संस्कृतीविषयी कोणताही न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. भावनिकतेच्या पलीकडे जाऊन आता बौद्धिक आणि वैचारिक सिद्धता ठेवायला हवी. भारताची एकात्मता, संस्कृती आणि राष्ट्रीय हित जपले पाहिजे. जो समाज स्वतःची संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय हित यांविषयी गाफील न रहाता सदैव जागरूक रहातो, तोच टिकून रहातो. जो समाज स्वतःविषयी चालू असलेले हे ‘माहिती युद्ध’ ओळखण्यात चुकतो, त्याकडे दुर्लक्ष करतो; त्याची ओळख, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचे सांस्कृतिक सामर्थ्य काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होत जाते. इतिहास हेच सांगतो; म्हणून उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात असतांना इतिहासात डोकावणे आवश्यक असते. अन्यथा वर्तमान डळमळीत होऊन भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.
– श्री. मकरंद मुळे, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक, ठाणे.
आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?
‘धर्मादाय’ रुग्णालये कागदावर, प्रत्यक्षात मात्र गरिबांची लूट !
भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’