१३.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘अवतारांचे धर्माच्या संदर्भातील कार्य आणि युगांच्या संदर्भातील कार्य’ पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1050366.html

३. सृष्टीच्या संदर्भातील कार्ये
३ अ. सृष्टीचे रक्षण करणे : ‘काही वेळा काही विपरीत घटकांमुळे संपूर्ण सृष्टीवर संकट ओढवते. अशा वेळी भगवंत विशिष्ट रूप किंवा अवतार धारण करून सृष्टीचे रक्षण करतो.
३ अ १. शिवाचा ‘नीलकंठ’ अवतार : ‘समुद्रमंथनाच्या वेळी सर्वांत प्रथम हलाहल विष बाहेर पडले. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांचा श्वास बंद पडून त्यांच्यावर मरणांतक संकट ओढवले. अशा वेळी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी शिवाने हलाहल विषाचे प्राशन केले. त्यामुळे शिवाचा कंठ निळा होऊन त्याच्या या रूपाला किंवा अवताराला ‘नीलकंठ’ हे नाव प्राप्त झाले.’ (साभार : https://www.bhaktimaal.com/samudra-manthan-story/)

३ आ. सृष्टीचे पालन-पोषण करणे : काही वेळा वाईट शक्तींची अधर्मी शक्ती प्रबळ झाल्याने सर्वत्र अनाचार माजतो आणि सृष्टीतील प्राणीमात्रांना मरणोन्मुख स्थिती प्राप्त होते. तेव्हा सृष्टीचे पालन आणि पोषण करून समस्त जिवांचे रक्षण करण्यासाठी भगवंताला अवतार धारण करावा लागतो.
३ आ १. पार्वतीमातेने ‘शताक्षी’ आणि ‘शाकंभरी’ ही रूपे धारण करून सृष्टीचे पालन-पोषण करणे : ‘दुर्गासुरामुळे संपूर्ण सृष्टीला अवकळा प्राप्त झाली होती. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडला होता. अशा वेळी सर्व देव-देवता, देवगुरु बृहस्पति आणि देवर्षि नारद यांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. तेव्हा पार्वतीमधून शताक्षीदेवी प्रगट झाली. सर्वत्रचा दुष्काळ पाहिल्यावर तिची करुणा दाटून आली आणि तिच्या १०० नेत्रांतून (शत अक्षांतून) अश्रूधारा वाहू लागल्या. त्यामुळे पृथ्वीवर नद्यांची निर्मिती होऊन समस्त जिवांना पाणी उपलब्ध झाले आणि त्यांचे प्राण वाचले. त्याचप्रमाणे प्राणीमात्रांची भूक शांत करण्यासाठी पार्वतीदेवीने शाकंभरीचे रूप धारण करून त्यांना शाक, म्हणजे भाज्या, फळे इत्यादी उपलब्ध करून दिली.’
(साभार : https://hindi.webdunia.com/religious-stories/shakambhari shatakshi-119012000025_1.html)
४. दैवी कार्य करणे
काही वेळा सृष्टीच्या कल्याणासाठी भगवंताला अवतार धारण करून दैवी कार्य करावे लागते.
४ अ. वेदांचे रक्षण करण्यासाठी श्रीविष्णूने मत्स्यावतार घेऊन ‘हयग्रीव’ दानवाचा नाश करणे : ‘सत्ययुगात ‘हयग्रीव’ या दानवाने ब्रह्मदेव निद्रेत असतांना कपटाने ब्रह्मदेवाच्या हातातून चारही वेद चोरून ते पाताळात नेले. तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातील धर्मज्ञान आणि दिव्य ज्ञान लुप्त झाल्याने अनाचार माजला. त्या वेळी संपूर्ण सृष्टीतील अनाचार थांबवण्यासाठी श्रीविष्णूने पहिला अवतार, म्हणजे मत्स्यावतार धारण करून हयग्रीव दानवाशी युद्ध केले आणि त्याचा वध करून त्याच्या बंदीवासातील चारही वेद मुक्त केले.’ (साभार : https://www.hindudharmakatha.com/matsya-avatar-ki-katha/)
४ आ. समुद्रमंथनाच्या वेळी श्रीविष्णूने कूर्मावतार धारण करणे : ‘देवता आणि असुर यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा समुद्र घुसळण्यासाठी मंदार पर्वत रवीसारखे (टीप) कार्य करत होता आणि वासुकी नागाचा दोरीप्रमाणे वापर होत होता. त्या समुद्राची खोली अधिक असल्यामुळे मंदार पर्वत त्यात बुडू लागला. तेव्हा सर्व देवतांनी श्रीविष्णूला प्रार्थना केली. त्यानंतर श्रीविष्णूने ‘कूर्मावतार’, म्हणजे विशाल समुद्री कासवाचे रूप धारण करून तो समुद्राच्या तळाशी गेला आणि त्याने त्याच्या पाठीवर मंदार पर्वताला धारण केले. त्यामुळे समुद्रमंथनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली.’ (साभार : https://deepawali.co.in/kurma-jayanti-avatar-lord-vishnu-hindi.html)
टीप – रवी – दही घुसळण्याचे लाकडाचे उपकरण.
५. अवतारांच्या संदर्भातील कार्य
५ अ. नवीन अवतार घेऊन अन्य अवताराला साहाय्य करणे

५ अ १. ‘धन्वन्तरि’ अवताराला साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने ‘मोहिनी अवतार’ धारण करणे : ‘श्रीविष्णूने धन्वन्तरीचा अवतार धारण करून समुद्रमंथनातून अमृताचा कलश बाहेर आणला. तेव्हा असुरांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेतला. त्या वेळी धन्वन्तरि अवताराला साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने सुंदर स्त्रीचे, म्हणजे मोहिनीचे रूप धारण करून मोहिनी अवतार घेतला. मोहिनीने अत्यंत चतुराईने असुरांकडून अमृतकलश मिळवला आणि त्यातील अमृत ती देवतांना देऊ लागली. तेव्हा स्वरभानु या असुराने देवाचे रूप धारण केले. तो देवांच्या पंगतीत बसला आणि त्याने अमृत प्राशन केले. हे रहस्य चंद्रदेव आणि सूर्यदेव यांनी मोहिनी अवतारासमोर प्रगट केले. तेव्हा श्रीविष्णूने मोहिनीचे मारक रूप प्रगट करून स्वरभानूवर सुदर्शनचक्र सोडले आणि त्याचा शिरच्छेद केला; परंतु तोपर्यंत स्वरभानूने अमृत प्राशन केले होते. त्यामुळे स्वरभानूचे शिर ‘राहू’ आणि त्याचे धड ‘केतु’ या नावाने विख्यात झाले.’
(साभार : https://hindi.news18.com/news/knowledge/exoplanet-wasp-121b-metal-rain-discovery-roasting-marshmallow-9008209.html and https://hi.wikipedia.org/wiki/मोहिनी_अवतार)
५ अ २. हनुमानाच्या रूपात शिवाने ११ वा रुद्रावतार धारण करून श्रीरामाला साहाय्य करणे : ‘शिवाने हनुमानाच्या रूपात ११ वा रुद्रावतार घेऊन श्रीविष्णूचा सातवा अवतार असलेल्या प्रभु श्रीरामाला सीताशोधार्थ आणि अन्य अवतारी कार्य करण्यासाठी साहाय्य केले. तेव्हा माता पार्वतीने हनुमानाच्या शेपटीच्या रूपात आणि पवनदेवाने हनुमानाच्या गदेच्या रूपात अवतार धारण करून श्रीरामाला साहाय्य केले होते.’ (साभार : https://hindistorylife.in/ram-and-hanuman-story-in-hindi/)
५ अ ३. ‘कल्की’ अवताराला साहाय्य करणार असलेले देवतांचे अवतार : कलियुगाच्या अंती श्रीविष्णूचा दहावा, म्हणजे ‘कल्की’ हा अवतार होणार आहे. या अवताराला साहाय्य करण्यासाठी श्री गणेश ‘धूम्रवर्ण’ किंवा ‘धूम्रकेतु’, म्हणजे श्वेत वर्ण (पांढरी कांती) असलेला अवतार धारण करून साहाय्य करणार आहे. त्याचप्रमाणे श्री वैष्णोदेवी आणि सप्त चिरंजिवांपैकी असलेला हनुमान अन् परशुराम हेसुद्धा कल्की अवताराला साहाय्य करणार आहेत.
५ आ. एका अवताराला शांत करण्यासाठी दुसरा अवतार धारण करणे : भगवंताचा एक अवतार त्याचे अवतारी कार्य करत असतांना त्याची अवतारी शक्ती पुष्कळ प्रगट स्वरूपात ठेवतो. त्यामुळे काही वेळा ती अवतारी शक्ती नियंत्रणाच्या बाहेर जाते. तेव्हा त्या अवताराला शांत करण्यासाठी भगवंताला दुसरा अवतार धारण करावा लागतो.

५ आ १. उग्र नरसिंहाला शांत करण्यासाठी शिवाने ‘शरभा’चे रूप धारण करणे : ‘जेव्हा भक्त प्रल्हादावर हिरण्यकश्यपूने केलेले अत्याचार परमोच्च स्तराला गेले, तेव्हा प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या प्रार्थनेवरून श्रीविष्णु राजमहालातील खांबातून प्रगट झाला. त्याने अजेय असलेल्या हिरण्यकश्यपूशी युद्ध करून त्याचा वध केला. ही प्रक्रिया घडत असतांना नरसिंह अवताराने अत्यंत उग्र रूप धारण केले होते. हे रूप हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही शांत होत नव्हते. तेव्हा श्री महालक्ष्मी, अन्य देवता आणि प्रल्हाद यांनी नरसिंहाला शांत होण्यासाठी प्रार्थना केली; परंतु त्यांच्या प्रार्थना व्यर्थ ठरल्या. नरसिंह अवतारातून प्रक्षेपित होणार्या अग्नीज्वालांमुळे सृष्टीची हानी होऊ लागली. तेव्हा शिवाने ‘शरभा’चे (टीप २) रूप धारण करून उग्र नरसिंहाला गाढ आलिंगन दिले आणि त्याची उग्र अन् प्रगट शक्ती स्वतःमध्ये सामावून घेऊन त्याला शांत केले.’ (साभार : https://www.dailymotion.com/video/x8is8q4)
टीप २ – शरभ : सिंहापेक्षा बलवान असलेला एक प्राणी
५ आ २. कालीमातेला शांत करण्यासाठी शिवाने ‘बटुक’ अवतार धारण करणे : ‘धूम्रलोचन, रक्तबीज इत्यादी असुरांचा संहार करतांना पार्वतीने घेतलेले कालीमातेचे रूप अत्यंत उग्र होऊन अनियंत्रित झाले होते. तेव्हा कालीमातेला शांत करण्यासाठी शिव भूमीवर प्रेतवत् पडून राहिला. जेव्हा पार्वतीने शिवाच्या छातीवर पाय ठेवला, तेव्हा ती भानावर आली आणि तिची उग्र शक्ती शांत झाली.
अशाच प्रकारे अन्य एका असुराचा वध करतांना जेव्हा पार्वतीचे कालीस्वरूप उग्र झाले, तेव्हा कालीमातेला शांत करण्यासाठी शिवाने लहान बालकाचे रूप घेऊन रुदन (रडणे) केले. त्याचे रुदन ऐकून कालीमातेचे लक्ष बाल शिवाकडे गेले आणि तिने त्याला उचलून जवळ घेतले. तेव्हा तिच्यातील वात्सल्य जागृत झाले आणि कालीमातेचे रूप शांत होऊन तिने पुन्हा पार्वतीचे रूप धारण केले. शिवाचे ते बालरूप ‘बटुक’ अवतार म्हणून प्रख्यात झाले.’
(साभार : ‘देवोंके देव महादेव’ या दूरचित्रवाणीवरील मालिकेतून आणि संदर्भ : सुश्री मधुरा भोसले यांना या धारिकेचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५, दुपारी १.३० ते २)
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !