अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘भारतामध्ये अनेक देवतांनी विविध अवतार धारण केले. यांमध्ये श्री गणेशाचे प्रमुख ४ अवतार (टीप १), श्रीविष्णूचे दशावतार आणि अन्य देवतांचे विविध अवतार विख्यात आहेत. देवता या निर्गुण-निराकार भगवंताचे सगुण-साकार स्वरूप आहेत. भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक आहे. ‘तो सूक्ष्म स्तरावर कार्यरत असूनही त्याला पृथ्वीवर देहधारणा करून अवतार का घ्यावे लागतात ?’, याचे सविस्तर विवेचन या लेखात केले आहे. यावरून आपल्याला अवतारांच्या कार्यामागील अध्यात्मशास्त्र, तसेच त्यांच्या कार्याचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येईल.

(भाग १)

श्री गणेश

टीप १ – श्री गणेशाचे प्रमुख ४ अवतार : सत्ययुगात ‘महोत्कट विनायक’, त्रेतायुगात ‘गुणेश’, द्वापरयुगात ‘गजानन’ आणि कलियुगात ‘धूम्रकेतू’, हे श्री गणेशाचे ४ प्रमुख अवतार आहेत. ‘धूम्रकेतू’ हा अवतार अजून झाला नसून तो कलियुगाच्या शेवटच्या चरणात (काळात) होणार आहे.

टीप २ – श्रीविष्णूचे दशावतार : मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की. ‘कल्की’ हा अवतार अजून झाला नसून तो कलियुगाच्या शेवटच्या चरणात होणार आहे.

१. धर्माच्या संदर्भातील कार्य करणे  

श्रीकृष्ण

‘भगवंताचा अवतार होण्यामागील मुख्य उद्देश कोणता ?’, हे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायात पुढील २ श्लोकांत सांगितले आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। – श्रीमद्भवगद्गीता, अध्याय ४, श्लोक ७ आणि ८

अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्‍यांचा नाश करण्यासाठी अन् धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.

भावार्थ : सनातन धर्म अपौरुषेय, म्हणजे ईश्वरप्रणित असल्यामुळे ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्या वेळी धर्माची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवण्याचे काम ईश्वरच करत असतो. ती घडी व्यवस्थित बसवण्यासाठी तो सगुण रूपाने अवतरत असतो.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ अ. सज्जनांचे, म्हणजे भक्तांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणे, उदा. श्रीविष्णूचे दशावतार, श्री गणेशाचे चार अवतार, देवीचे अनेक अवतार इत्यादी. 

१ आ. धर्माची वेळोवेळी विस्कटलेली घडी नीट (पूर्ववत्) बसवून धर्मस्थापनेचे कार्य करणे : काळाच्या प्रवाहात जसजशी मानवाची वृत्ती अवनत होत जाईल, तसतसा धर्माचा, म्हणजे सत्त्वप्रधान वृत्तीचा विनाश होत जाऊन तिची परिणती तमप्रधान वृत्तीत होत असते. तमप्रधान वृत्तीलाच ‘धर्मग्लानी’, अशी संज्ञा आहे. ‘तमोगुणाची परिसीमा होऊन सृष्टी दुःखी होऊ नये’, हा धर्माचा मुख्य हेतू असल्यामुळे अशा वेळी भगवंताचा अवतार होतो. धर्माची वेळोवेळी विस्कटलेली घडी नीट (पूर्ववत्) बसवण्याचे कार्य अवतार करत असतो. भगवंत त्याच्या भक्तांसह (साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यासह) पृथ्वीवर अवतरित होतो. यालाच ‘भगवंताचा अवतार त्याच्या व्युहासहित प्रगट होणे’, असे म्हणतात, उदा. श्रीविष्णूचे दशावतार, श्री गणेशाचे चार अवतार, देवीचे अनेक अवतार इत्यादी.

२. युगांच्या संदर्भातील कार्य 

प्रत्येक युगात चार युगांचे उपयुग चालू असते. ही चार युगे त्रिगुणांवर अवलंबून असतात.

‘प्रत्येक युगातील कलियुगामध्ये रज-तम प्रबळ झाल्याने अनाचार, हिंसाचार आणि अधर्म माजतो. त्यामुळे धर्माला ग्लानी आलेली असते. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या चार युगांच्या अंतर्गत येणार्‍या उपकलियुगाचा नाश करून पुन्हा उपसत्ययुगाचा प्रारंभ करण्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो, उदा. कृतयुगाचा शेवट करून सत्ययुगाचा प्रारंभ करण्यासाठी भगवान विष्णूने पहिला, म्हणजे मत्स्यावतार धारण केला होता.’

(साभार : https://www.hindudharmakatha.com/matsya-avatar-ki-katha/)

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : ३१.१.२०२५, दुपारी १ ते १.३०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.