केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २६ मे २०२६ या दिवशी निवृत्त न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. बेकायदेशीर घुसखोरीमुळे होणार्या ‘अनैसर्गिक लोकसंख्याशास्त्रीय पालटां’चा अभ्यास करण्याचे दायित्व तिच्यावर सोपवण्यात आले आहे; मात्र वर्ष १९४७ पासून पाकिस्तान आणि बांगलादेश येथे झालेला लोकसंख्या पालट अन् त्याला कारणीभूत ठरलेले घटक यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

१. फाळणी आणि पाकिस्तानमधील लोकसंख्याशास्त्रीय पालट (वर्ष १९४१-१९५१)

वर्ष १९४१ च्या जनगणनेनुसार आज पाकिस्तानमध्ये असलेल्या भागात हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अनुमाने १४-१५ टक्के होती, तर शिखांचे प्रमाण साधारण ६ टक्के होते. एकत्रितपणे हे दोन समुदाय एकूण लोकसंख्येचा जवळजवळ एक पंचमाश (१/५) भाग होते; मात्र काही वर्षांतच हे लोकसंख्याशास्त्रीय वास्तव नाट्यमयरित्या पालटले. फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय हिंसाचारामुळे पश्चिम पाकिस्तानमधील जवळपास संपूर्ण हिंदु आणि शीख लोकसंख्येला भारतात पळून जाणे भाग पडले. इतिहासकारांच्या अनुमानानुसार वर्ष १९४७ ते १९५१ अनुमाने ४७ ते ५० लाख हिंदु आणि शीख यांनी पश्चिम पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केले.
२. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची सद्यःस्थिती
परिणामी पाकिस्तानमधील हिंदूंची लोकसंख्या फाळणीपूर्व अनुमाने १५ टक्क्यांवरून घसरून वर्ष १९५१ च्या जनगणनेत साधारण १.६ टक्के झाली. आज पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये हिंदूंचे प्रमाण अवघा १ टक्का असून ते प्रामुख्याने सिंध प्रांतात एकवटलेले आहेत. शिखांची लोकसंख्या तर अत्यंत न्यून झाली असून ती केवळ काही सहस्रांवर राहिली आहे.
फाळणीचा हिंसेचा काळ

हे स्थलांतर अत्यंत भयानक हिंसेच्या सावलीत झाले. निर्वासितांना वाहून नेणार्या गाड्या मृतदेहांनी भरून येत होत्या. गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली, महिलांचे अपहरण करण्यात आले आणि लाहोर, रावळपिंडी, मुलतान, कराची अन् इतर शहरांमध्ये शतकानुशतके रहाणारी कुटुंबे अचानक बेघर झाली. फाळणीच्या वेळी झालेल्या मृत्यूंचा अंदाज २ लाखांपासून ते जवळजवळ २० लाखांपर्यंत वर्तवला जातो. सध्याचा जो पाकिस्तानचा भाग आहे, त्यातील मोठ्या भागातून हिंदु आणि शीख यांचे अस्तित्व जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले. – ब्रिगेडियर महाजन (निवृत्त)
३. शत्रू संपत्ती कायदा आणि आर्थिक हानी
एक अत्यंत महत्त्वाचा घटक, म्हणजे मालमत्ता कायदे, ज्यांचा हिंदु नागरिकांना मोठा फटका बसला. वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानने ‘एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट’ (शत्रू संपत्ती कायदा) लागू केला. राष्ट्रीय सुरक्षेचा उपाय म्हणून हा कायदा सादर केला गेला असला, तरी याद्वारे भारतात स्थलांतरित झालेल्या किंवा भारताशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला मिळाला.
४. ‘व्हेस्टेड प्रॉपर्टी ॲक्ट’चे परिणाम
वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ‘व्हेस्टेड प्रॉपर्टी ॲक्ट’ (निहित संपत्ती कायदा) अंतर्गत अशीच प्रावधाने चालू राहिली. संशोधकांच्या मते या कायद्यांनी हिंदूंच्या आर्थिक नाकेबंदीत मोठी भूमिका बजावली आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराला प्रोत्साहन दिले. अभ्यासातून असे दिसून येते की, या प्रावधानांनुसार लाखो एकर भूमी हिंदूंच्या मालकीतून काढून घेण्यात आली.
५. वर्ष १९७१ चे युद्ध आणि हिंदूंचा छळ
पूर्व पाकिस्तानमधील हिंदु लोकसंख्येवर झालेले सर्वांत भीषण आक्रमण वर्ष १९७१ च्या ‘बांगलादेश मुक्ती’ युद्धाच्या वेळी झाले. २५ मार्च १९७१ या दिवशी पाकिस्तानी लष्कराने बंगाली राष्ट्रवादी चळवळ दडपण्यासाठी ‘ऑपरेशन सर्चलाइट’ चालू केले. अमेरिकेचे कौन्सिल जनरल आर्चर ब्लड आणि अनेक आंतरराष्ट्रीय निरीक्षक यांनी हिंदु समुदायांवर झालेल्या पद्धतशीर आक्रमणांची नोंद केली आहे. हिंदूंना बर्याचदा अविश्वासू घटक मानले गेले आणि पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेच्या काही घटकांकडून त्यांना बंगाली राष्ट्रवाद अन् भारताचे समर्थक म्हणून पाहिले गेले.
निर्वासितांचे भारतात पलायन

बांगलादेश सरकारच्या मते या युद्धात अनुमाने ३० लाख लोक मारले गेले. हिंसेचे प्रमाण प्रचंड होते आणि हत्या झालेल्यांमध्ये हिंदूंचे प्रमाण अधिक होते. नोव्हेंबर १९७१ पर्यंत जवळपास १ कोटी निर्वासित भारतात पळून आले होते, ज्यामध्ये बहुतांश हिंदु होते. डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेशाच्या मुक्तीनंतर अनेक निर्वासित परतले; परंतु लाखो लोक कायमचे भारतातच राहिले. त्यामुळे भारताच्या सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय रचनेत कायमचा पालट झाला.
६. स्वातंत्र्योत्तर बांगलादेशातील स्थलांतर (डॉ. अब्दुल बरकत यांचा अभ्यास)
स्वातंत्र्यानंतरही बांगलादेशातील हिंदु लोकसंख्येची घट थांबली नाही. पुढील दशकांमध्येही स्थलांतर चालूच राहिले. ढाका विद्यापिठाचे बांगलादेशी अर्थतज्ञ डॉ. अब्दुल बरकत यांनी या विषयावर एक अत्यंत प्रभावशाली अभ्यास केला. दशकांच्या संशोधनाच्या आधारे बरकत यांनी अनुमान वर्तवले, ‘भेदभाव, असुरक्षितता आणि छळामुळे वर्ष १९६४ ते वर्ष २०१३ या कालावधीत अनुमाने १ कोटी १३ लाख हिंदूंनी बांगलादेश सोडला. त्यांच्या गणितानुसार त्या काळात प्रतिवर्षी सरासरी २ लाख ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी देश सोडला.’
ही आकडेवारी हे दर्शवते, ‘बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरही हिंदूंचे पलायन थांबले नाही, तर ते एका पाठोपाठ एक आलेल्या राजकीय राजवटींच्या काळातही चालूच राहिले.’
७. पाच दशकांतील स्थलांतराची भीषणता
जेव्हा या अनुमानांचे एकत्रित आकड्यांमध्ये रूपांतर केले जाते, तेव्हा त्याची भीषणता स्पष्ट होते. ५ दशकांमध्ये १ कोटींहून अधिक हिंदूंनी बांगलादेश सोडल्याचे अनुमान आहे. यातील बहुतेकांनी भारतात, विशेषतः बंगाल, आसाम, त्रिपुरा, देहली, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये स्थलांतर केले. सर्वच स्थलांतराचे कारण केवळ छळ हेच नव्हते, तरीही सातत्याने होणारी लोकसंख्याशास्त्रीय घट हे दर्शवते की, असुरक्षितता आणि भेदभाव यांनी यात मोठी भूमिका बजावली.
८. पाकिस्तानमधील सद्यःपरिस्थिती आणि सक्तीचे धर्मांतर
पाकिस्तानमधील चित्र थोडे वेगळे आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे हिंदु आणि शीख यांची लोकसंख्या आधीच अत्यंत न्यून झाली होती. त्यामुळे नंतरचे स्थलांतर लहान; परंतु सातत्यपूर्ण लाटांच्या स्वरूपात झाले. मानवाधिकार संघटनांनी प्रामुख्याने सिंध आणि दक्षिण पंजाब येथे हिंदु अन् शीख मुलींचे सक्तीचे धर्मांतर, अपहरण अन् बलपूर्वक विवाह केल्याच्या घटनांची वारंवार नोंद केली आहे.
पूर्व पाकिस्तान (बांगलादेश)मधील लोकसंख्येची घसरण
वर्ष १९५० आणि वर्ष १९६० च्या दशकातील पूर्व पाकिस्तानातून हिंदूंचे पहिले मोठे स्थलांतर वर्ष १९५० मध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावरील हिंदुविरोधी दंगलीनंतर झाले. ढाका, बारीसाल आणि खुलना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे हिंदु समुदायांमध्ये व्यापक भीती अन् असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
९. पाकिस्तानमधील शिखांची स्थिती
पाकिस्तानमधील शिखांच्या अनुभवाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४७ पूर्वी शीख हे पश्चिम पंजाबमध्ये एकवटलेले होते आणि ते या प्रदेशातील एक प्रमुख सामाजिक अन् आर्थिक शक्ती होते. फाळणीनंतर १० ते २० लाख शिखांनी भारतात स्थलांतर केले. आज तिथे केवळ एक लहानसा उर्वरित समुदाय शिल्लक आहे.

१०. अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांकांचे अस्तित्व संपुष्टात
अफगाणिस्तान हा या इतिहासाचा तिसरा आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेला पैलू आहे. शतकानुशतके अफगाणिस्तानमध्ये व्यापार अन् वाणिज्य यांत गुंतलेले लहान; परंतु समृद्ध हिंदु आणि शीख समुदाय होते. अनुमानानुसार वर्ष १९७९ मधील सोव्हिएत रशियाच्या आक्रमणापूर्वी अफगाणिस्तानमध्ये १ लाख ते २ लाख हिंदू आणि शीख असावेत. त्यानंतरच्या दशकांच्या युद्धाने सोव्हिएत ताबा, गृहयुद्ध, तालिबान राजवट, वर्ष २००१ नंतरचा संघर्ष, वर्ष २०२१ मध्ये तालिबानचे पुनरागमन यांनी समुदायांना उद्ध्वस्त केले.
अनेक अफगाण हिंदु आणि शीख यांनी वर्ष १९८० अन् १९९० च्या दशकात भारतात स्थलांतर केले. वर्ष १९९० च्या दशकात तालिबानच्या उदयानंतर आणि वर्ष २०१० च्या दशकात शीख गुरुद्वारे अन् अल्पसंख्यांक संस्था यांवर झालेल्या आक्रमणांनंतर स्थलांतराच्या आणखी लाटा आल्या. आज अफगाणिस्तानमध्ये अगदी मोजकेच हिंदू आणि शीख उरले आहेत. बहुसंख्य लोकांनी एकतर भारतात स्थलांतर केले आहे किंवा इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

११. धर्मांतराचे सूत्र आणि निष्कर्ष
सक्तीच्या धार्मिक धर्मांतराच्या सूत्रावरही काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तान, विशेषतः सिंधमधून येणार्या अहवालांमध्ये अल्पवयीन हिंदु आणि शीख मुलींचे धर्मांतर अन् विवाह यांच्या घटनांची वारंवार नोंद झाली आहे. बांगलादेशात धर्मांतरापेक्षा ‘स्थलांतर’ हा मुख्य लोकसंख्याशास्त्रीय घटक राहिला आहे, जरी तिथेही धार्मिक आकस आणि सक्तीचे धर्मांतर यांच्या घटनांची वेळोवेळी नोंद झाली आहे.
गेल्या ७८ वर्षांत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेला लोकसंख्याशास्त्रीय पालट हा आधुनिक दक्षिण आशियाई इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा; परंतु अल्प अभ्यासलेला विषय आहे. पाकिस्तानच्या मोठ्या भागातून प्राचीन हिंदु आणि शीख समुदायांचे नाहीसे होणे, बांगलादेशातील हिंदु लोकसंख्येची सातत्याने होणारी घट आणि अफगाणिस्तानमधील हिंदु अन् शीख समुदायांचे नामशेष होण्याच्या मार्गावर असणे, या सर्व गोष्टी मिळून एक मोठी ऐतिहासिक घटना बनतात.
प्रत्येक आकडेवारीच्या मागे पूर्वजांचे घर सोडण्यास भाग पडलेल्या कुटुंबांची, शतकानुशतके रहात असलेल्या भूमीवरून उखडून टाकलेल्या समुदायांची आणि अनोळखी वातावरणात स्वतःचे आयुष्य पुन्हा उभे करण्यास भाग पडलेल्या पिढ्यांची कहाणी आहे. म्हणूनच आज दिसणारे लोकसंख्याशास्त्रीय पालट हे केवळ जनगणनेतील आकडे नाहीत, तर ते भारतीय उपखंडाच्या आधुनिक इतिहासातील अत्यंत प्रभावी घटनांचे कायमस्वरूपी अवशेष आहेत.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (६.६.२०२६)


संपादकीय : जसपाल राणा यांच्या जाण्याने …
विस्थापित काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनरागमन कधी ?
एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !