अवैधरित्या मद्यविक्री करणार्‍याला असलदे ग्रामस्थांनी क्षमा मागायला भाग पाडले !

  • गावात मद्यविक्री बंदी असतांनाही केली जात होती मद्यविक्री !

  • पुन्हा मद्यविक्री करणार नसल्याचे आरोपीने केले मान्य !

प्रतीकात्मक छायाचित्र

कणकवली – तालुक्यातील असलदे गावातील शिवाजीनगर येथे अवधूत शामसुंदर वाळके यांच्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री केल्याविषयी कारवाई केली. गावात मद्यबंदी असतांना गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री करणारे वाळके यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर वाळके यांनी मद्यविक्री करत असल्याचे मान्य केले आणि ग्रामस्थांची क्षमा मागितली, तसेच यापुढे गावात मद्यविक्री करणार नसल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले.

अवधूत शामसुंदर वाळके यांच्या शिवाजीनगर येथील गोदामावर कणकवली पोलिसांनी ७ जूनच्या रात्री १२.३० वाजता धाड घातली आणि वाळके यांच्यावर गुन्हा नोंद केला. याविषयी समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वाळके आणि त्यांचा सहकारी सुरेंद्र वायंगणकर यांना चांगलेच खडसावले.

नांदगाव दशक्रोशीतील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच गावातील सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी असलदे ग्रामसभेत मद्यबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र काही व्यक्ती आर्थिक लाभासाठी गावाच्या निर्णयालाच हरताळ फासत आहेत. अवैधरित्या मद्यविक्री करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी पत्रकार भगवान लोके यांनी दिली आहे. मद्यबंदी असतांनाही गावात मद्यविक्री केल्यास ग्रामस्थ शांत बसणार नाहीत, अशी भूमिका सरपंच चंद्रकांत डामरे यांनी स्पष्ट केली.

संपादकीय भूमिका

गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?