उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत बोलतांना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योजकांनी चांगला उद्योग उभा करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने औद्योगिक वसाहतीमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात सोलापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘सोलापूरमधील ड्रायपोर्ट उद्योग हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये राखीव भूखंड देण्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचना उद्योग विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वाढीव पाणी देण्याविषयी महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेला २ वर्षांत २८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.’’

उद्योजकांनी अंतर्गत रस्ते, वीज, सांडपाणी, तसेच अग्नीशमन या समस्यांविषयी मांडलेल्या अडीअडचणी सोडवण्याविषयी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या वेळी उद्योजकांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी मंत्री सामंत यांच्यासमोर मांडल्या. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.