तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. आंध्रप्रदेशात साम्यवाद्यांकडून हिंदु राजे आणि संत यांच्याविषयी अपप्रचार

‘भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता. तो कट्टर हिंदु राजा होता आणि अद्वैत सिद्धांताचा समर्थक होता. त्याने तेलुगु राज्यात हिंदु राष्ट्राची स्थापना केली होती. त्याच्या सैन्यात एकही मुसलमान सैनिक नव्हता. त्याने कोणतीही दयामाया न ठेवता इस्लाम धर्मियांचा नरसंहार केला होता. त्याच्याविषयी साम्यवादी इितहासकारांनी अभ्यासक्रमांमध्ये कुठेही माहिती दिली नाही. दुसरे पेडाकोमटी वेमा रेड्डी यांनी अद्वैत तत्त्वज्ञान कवितांच्या स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत पोचवले. त्यानंतर योगी वेमना आणि वीर ब्रह्मेंद्र स्वामी संत होऊन गेले. त्यांच्याविषयी साम्यवाद्यांनी अपप्रचार केला. जेव्हा शत्रू आपल्याशी समोरून लढू शकत नाही, तेव्हा तो विविध षड्यंत्र रचून लोकांमध्ये भ्रम निर्माण करतो आणि आपल्यावर पाठीमागून वार करतो. संतांप्रमाणेच आपल्या धर्मग्रंथांचाही विपर्यास केला जातो. त्यामुळे वर्तमानपत्रे, मासिके आणि सामाजिक माध्यमे यांमध्ये त्यांच्याविषयी खोटी माहिती प्रसिद्ध होते. त्यावरूनच चित्रपटही बनवले जातात आणि कालांतराने पुढची पिढी त्यालाच खरा इतिहास समजायला लागते.

ज्या देशामध्ये नास्तिकता आहे, तेथील समाज अधोगतीला जातो. नास्तिकता पसरल्यानंतर समाजाचे पतन होते. त्यानंतर कुटुंबव्यवस्था ढासळते आणि नंतर अर्थव्यवस्था कोलमडते. त्यामुळे धर्माविषयी जागृती करून हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे आवश्यक आहे.

२. धर्मवीर अध्यात्म वेदिकेचे धर्मकार्य

श्री. कश्यप महर्षि

‘प्रत्येकाला हिंदु धर्म आणि स्वतःचा इतिहास यांच्याविषयी ठाऊक असणे आवश्यक आहे. मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती रुजवण्यासाठी त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक हिंदूने त्याच्याकडे किमान एक धर्मग्रंथ ठेवून त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदूंची हानी होत आहे, हे त्यांना समजले पाहिजे. आम्ही गावपातळीवर जाऊन धर्मावरील आघातांच्या विरोधात लोकांना जागृत करतो, तसेच धर्मांध आणि ख्रिस्ती आक्रमण यांच्या विरोधात कसे लढले पाहिजे, हेही सांगतो. आतापर्यंत आम्ही ३२५ हून अधिक गावांना हिंदुत्वनिष्ठ बनवले आहे. हिंदूंमधील अलिप्तता दूर करणे आणि धर्माचे रक्षण करणार्‍या प्रत्येकाला धर्मवीर बनवणे, हा यामागचा उद्देश आहे. भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा, चालीरीती, विज्ञान आणि धर्मग्रंथांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवतो. भारतीय राज्यघटनेने हिंदूंना दिलेल्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतो. आदिवासी भागातील लोक स्वधर्मापासून लांब जात आहेत. त्यामुळे देवतांच्या मूर्तीपूजनाचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना ख्रिस्ती धर्मांतरापासून लांब ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील घरांवर ‘हरे राम हरे कृष्ण’ यांचे लिखाण करतो. गावागावांत जाऊन घरोघरी भगवा ध्वज फडकवून आणि हिंदूंशी थेट संवाद साधून समाजात चालू असलेले धर्मांतराचे कटकारस्थान उघडकीस आणणे, तसेच अनधिकृत चर्च अन् मशिदी यांच्या बांधकामांच्या विरोधात सरकारी अधिकार्‍यांकडे तक्रारी करणे, हे कार्यही आमची संघटना करते. आम्ही ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदुविरोधी चित्रपट यांच्याविरुद्ध लढलो. प्रत्येक हिंदूला जागृत करण्ो आणि अंतिमतः भारताला हिंदु राष्ट्र बनवणे यांसाठी संघर्ष करणे, हे ‘धर्मवीर अध्यात्म वेदिके’चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी राष्ट्रीय वानर सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या समविचारी संघटनांसमवेतही आम्ही कार्य करत असतो.’

– श्री. कश्यप महर्षि, राज्याध्यक्ष, धर्मवीर अध्यात्म वेदिका, तेलंगाणा.